अश्विनी....
ऑर्कुटवर मैत्री झालेल्यामधील ही अगदी जवळची मैत्रिण. एका मित्रामुळे हिची ओळख झाली. आणि ही नेटवरची ओळख अगदी गाढ मैत्रीत केव्हा रुपांतरीत झाली कळलेच नाही. साधारण २ महिने आम्ही गप्पा मारत होतो चॅटवर. एकमेकींची सुखदुःखे शेअर करीत होतो. माझ्यापेक्षा जराशीच लहान असलेली ही मैत्रिण अत्यंत भावुक होती आणि आहेही. अशाच गप्पांमधुन तीची आई नसल्याने ती आणि तिचे मिस्टर, मुलगा तिच्या माहेरीच राहतात असे समजले. त्यामुळे माहेरपणाला जायचे म्हणजे कुठे जायचे हा प्रश्न कायमच तिच्यासमोर असायचा. मला एक दिवस म्हणाली " शरु मी तुझ्या घरी येउ? माहेरपणाला ४ दिवस? " आयला सॉलीडच... कारण अशा नेटवरच्या ओळखीतुन घरी येते म्हणालेली ही पहिलीच. मी माझ्या नवर्याशी बोलुन सांगुन टाकले तीला की तु कधीही येउ शकतेस आमच्या घरी. आणि मग तीने तीच्या नवर्याशी बोलुन येण्याचा दिवस पक्का केला. एका रवीवारी सायंकाळी तीचे आगमन सांगलीत झाले आणि माझ्या नवर्याबरोबर( माझे मीस्टर सांगलीत नोकरीस असतात) ती घरी आली आणि फ़क्त फ़ोटो मधे पाहिलेल्या आम्ही प्रत्यक्ष पाहत्या झालो :) दारातच एकमेकींच्या गळ्यात पडलो. असे वाटलेच नाही की आमची मैत्री नेटवरची आहे. बालमैत्रिणी भेटलो बरेच दिवसानी असे वाटत होते. मे महिन्याचे दिवस असल्याने आमरसाचा बेत केलेला. मस्त भरपेट हादडुन आम्ही रात्री १ पर्यंत गप्पा मारल्या. गप्पा मारता मारताच झोप लागली म्हणा ना...:) दुसर्या दिवशी मी, आशु, माझी कन्या आणि मीस्टर असे सगळे कोल्हापुरला देवीच्या दर्शनाला गेलो. दर्शन घेउन मस्त हातात हात घालुन बागडत कोल्हापुर हिंडलो. अगदी लहानपण अनुभवले. ती असतानाचे दोन तीन दिवस खरच खुप मजेत गेले. सध्या लहानपणच्या रुसण्याचा अनुभव घेतेय. :(
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा