मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

सारीपाट नशिबाचा

चंदा डोळे पुसतच पिठाच्या गिरणीत गेली. दादु गिरणीवाल्याने न दळलेल्या दळणाचे डबे मोजत चंदाकडे आपादमस्तक पाहिले. त्याच्या नजरेत अपार करुणा होती.
" काय चंदाराणी काय म्हणताय आज आजी नाय आली का?"
" दादु आबा आजीला ताप चढलाय ना म्हणुन आईने मला पाठवलय. "
तिच्या कडेवरचा न आवरणारा पण मोकळाच डबा दादुने घेतला अन म्हणाला, " जा आता शाळेत तु, मी गिरणी बंद करताना घरी पोचवतो डबा अस सांग तुझ्या मायेला. अन मला सांग तु जेवलीस का नाही? "
दादुपासुन तोंड लपवुन हो जेवले म्हणत ती माघारी निघाली. दादु काय समजायचे ते समजला. त्याने किसनाला आपल्या मधल्या नातवाला साद घातली, " आर ये किसना हिकड ये जरा. माझ काम करशील का रे पोरा."
किसन अभ्यास करत बसला होता. दादुची हाक येताच तो लगेचच दादुकडे आला. " काय रे दादु मला कशाला बोलवलस रे? "
" आर पोरा माझं एक काम कर मी पीठ देतो ते घे आणि मधल्या आळीतल्या राजी वयनीकडे पोचते कर. मगाशी चंदा आली होती पण तिला काही डबा पेलायचा नाही म्हणुन म्या तिला घरी धाडलय. आन एक काम कर. तुझ्या आवशीने भाकरी कालवण केल असल त्यातल थोडं चंदासाठी घेउन जा. मी तोवर डबा भरुन ठेवतो. जा तु पटकन ये. "
दादुकडे ज्वारीची आणि गव्हाची अशा दोन वेगवेगळ्या गिरण्या होत्या. खाली सांडलेले पिठ न्यायला रोज यशोदा चंदाची आज्जी यायची. दादु दोनही पिठे वेगवेगळ्या पिशवीत घालुन ठेवायचा. कधी कधी जास्त दळणे आली नाहीत तर सगळ्या डब्यातले मुठ मुठ पिठ काढायचा. त्याला खर तर ही लबाडी वाटायची पण त्याचा नाईलाज असायचा. आपण लबाडी करतोय पण त्यामुळे चार भुकेले जीव त्यावर जगत आहेत हे समाधान दादुला जास्त होते. खरे तर यापेक्षाही काही जास्त करावे असे दादुला नेहमीच वाटे पण त्याच्या कुटुंबाचे पोटही फ़क्त गिरणीवर चाले.

किसन दादुने दिलेले पिठ चंदाने आणलेल्या डब्यात घेउन निघाला एका हातात भाकरी अन कालवण असलेल्या डब्याची पिशवी होती.
राजी मावशी ए राजी मावशी अशी हाक मारतच किसन घरात शिरला. " मावशे हे घे डबा दादुने दिलाय बघ. अन हे आयेने दिलय. चंदाला खाऊ घाल आन शाळेला पाठव. मी येतो थोड्यावेळात तिला न्यायला. आन यशुआज्जी कशी आहे ग मावशे? दादु म्हणत होता ताप भरलाय म्हणे."
" हो रे किसना, सासुबाई आजारी आहेत. मगाशी दिलाय काढा करुन आता येइल ताप कमी. "
" पण दवाखान्यात ने ग तिला संध्याकाळी. " असे म्हणत तो झपाझप घराकडे निघाला.
भाकरी भाजीचा डबा पाहुन चंदा खुश झाली. आता आज उपाशीच नाही जावे लागणार शाळेला या विचाराने तिला जरा बरे वाटले. पण तरीही अर्धीच भाकरी खाउन ती पानावरुन उठली. राजीने पाहिले तर चार भाकर्‍या होत्या डब्यात पण खाणारी तोंडे पण सहा होती. राजी, यशु आज्जी, चंदा, मिनी, गणेश आणि शंकर. मिनी आणि गणेश तासाभरात येतील शाळेतुन आणि शंकर ??? कुठल्या गुत्त्यात जाऊन पडलाय कोण जाणे. केवढं छान सोन्यासारखे घर पण शंकरच्या दारुच्या व्यसनापाई आता सुतळीचा तोडाही घरात नसल्यासारखी घराची अवस्था झाली होती.

विचार करत ती केव्हा भुतकाळात पोचली तिचे तिलाच नाही समजले. सात बहिणी आणि तीन भावंडात आठवा नंबर असलेली राजी दिसायला सर्वात खुप सुंदर. तिचे राव खरे तर राजलक्ष्मी पण सारे लाडाने तिला राजीच म्हणायचे. घरची तशी गरीबीच पण खाऊन पिऊन सुखी असे कुटूंब. शेताच्या तीन एकर तुकड्यात वडिल आणि तिघे भाऊ रात्रंदिवस राबायचे. मोठ्या सार्‍या बहिणींची लग्ने झाली होती. गाव तसे यथा तथाच असल्याने शिक्षणे मात्र कुणाचीही जास्त नव्हती झाली. आणि मुलींना परगावी शिक्षणाला ठेवायचा काळही नव्हता तो. तीन भाऊ मात्र दहावी पर्यंत शिकले, शेजारच्या गावी जाऊन. कधी चालत तर कधी सायकलने. अशातच राजीला जवळच्याच गावातुन मागणी आली. देशमुख घराणे मोठे होते आणि शेतीवाडीही खुप होती. म्हणजे जवळ जवळ शंभर एकर शेती अन तीही बागायती. बर माणसेही चांगली होती. मुलगा दिसायला अगदी राजबिंडा होता. बारावी पास होता. घरी आई वडील अजुन एक भाऊ आणि बहिण. बर बहिणीचेही लग्नाचे वय झाले होते म्हणजे तीही यथावकाश लग्न होऊन सासरी जाणार. म्हणजे घरात माणसेही फ़ार नाहीत. त्यामुळे या घरी राजीला द्यायला घरच्या कुणाचीही हरकत नव्हती. आपली पोर सुखात नांदेल तिथे हा विचार करुन राजीच्या लग्नाचे पक्के करुनच तिचे आई वडिल आणि मोठा भाऊ घरी आले. लग्नात पायातल्या जोडवी पासुन ते माथ्यावरच्या बिंदीपर्यंतच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांनी राजी नुसती मढली होती. लक्ष्मीसारखी दिसत होती. स्वताच्याच भाग्याचा तिला हेवा वाटत होता. शंकरही वरवेषात अजुनच रुबाबदार दिसत होता जणु गावचा राजाच. अर्थात ते खरही होतं म्हणा. पैसा असल्याने म्हणा किंवा इतर कशानेही गावात देशमुख घराणे वरचढच होते. लग्न होऊन देशमुखांच्या घराच्या उंबर्‍यावरचे माप ओलांडुन राजलक्ष्मी देशमुख वाड्यात आली. लवकरच आपल्या स्वभावाने तिने सार्‍यांनाच जिंकुन घेतले.

इकडे तिच्या माहेरी आता वडिलांनाही कष्टाचे काम जमत नव्हते. बर जमीनही चांगली पाणस्थळ होती त्यामुळे जरा कष्ट घेतले की पिकपाणी चांगले यायचे त्यावर वर्षभर गुजराण चालायची. हळु हळु तीनही भावंडे शेतीच करायला लागली. नवे नवे प्रयोग करु लागली. पिकपाणे उत्तम येउ लागले. पैसा अडका गाठीला बांधुन अजुन जमीन विकत घेतली. परिस्थिती पालटु लागली. राजी माहेरी यायची तेव्हा आपल्या माहेरचे पालटत चाललेले रुप पाहुन सुखावुन जायची. आता तिनही भावांच्या बायकाही होत्याच. कधी कधी सार्‍या बहिणी आपापल्या पिल्लाना घेउन माहेरी यायच्या. प्रत्येकीची २/३ कच्चीबच्ची. घर म्हणजे अक्षरशः गोकुळ वाटायचे. राजीलाही यथावकाश तीन मुले झाली. मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवर दोन मुली. सारे कसे सुखात चालले होते. दरम्यान राजेशचे शंकरच्या लहान भावाचे आणि सुमनचेही लग्न झाले. दोघांच्या संसारवेलीवर अनुक्रमे दोन आणि एक अशी फ़ुले उमललेली होती.

" आई ग अग कुठे तंद्री लागलीय तुझी केव्हाचा हाका मारतोय मी. " इती गणेश.
" अरे तु केव्हा आलास रे शाळेतुन? अन मिनी कुठाय? "
" अग ती आत आहे वाढुन घेतेय. तु जेवलीस का? आणि चंदाने काय खाल्ले? आज सकाळी डब्यात तर कसलेच पिठ नव्हते ना तांदळाचा एकही कण नव्हता."
" थांब जरा ज्वारीच्या पिठाचे आंबील करते ते खा तुम्ही दोघे. मी आज्जीला खायला घालते अन येते. सकाळी दादुनी डबा पाठवला त्याच्या मुलाकडुन. ती बायजा सारखं काही न काही देते म्हणुन बरं आहे पण...... "
" आई माहितेय मला तुला नाही आवडत ते. पण मी पण दुकानात लिखाण करुन देतो त्याचे पैसे जास्त नाही मिळत मग काय करणार. आणि बाबा कुठे आहेत ग ? गेले का नेहमीप्रमाणे? आज काय नेलय घरातनं??? "
" ..................... "
" आई तु अशीच नेहमी गप्प बसत जा. बाबांना काही समजाव नं."
" अरे शुद्धीत असतात तेव्हा समजावते तेव्हा घेतात न समजुन पण बाहेर गेले की ये रे माझ्या मागल्या. मी पण कंटाळलेय आता. पण तुम्हा तिघांकडे बघुन ..... " राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.
" आई ग तु नको ना रडु. जरा काही दिवस थांब मी चांगला शिकेन मोठा होईन तुला कशाला काही कमी पडणार नाही बघ. "
" माझं सोनं ग ते " असे म्हणत राजीने गणेशची अलाबला घेतली अन ती उठलीच. गणेश आणि मिनीला वाढुन एकीकडे दादुने पाठवलेल्या ज्वारीच्या पिठाचे आंबील केले. यशोदा आज्जीला आंबील खायला घालुन  माजघरात येउन ती जरा झोपायचे म्हणुन आडवी झाली. पण डोळा कुठला लागायला. परत तिचा जिवनपट हळु हळु डोळ्यासमोर येउ लागला.

चंदाचा जन्म झाला अन तिचे रुपडे पाहुन शंकर आणि राजी दोघेही हरकुन गेले. साक्षात दुसरी राजीच. चंदाच्या बाळलिलांनी घर परत एकदा हरकुन गेले. चंदाचा पहिला वाढदिवस मोठा करायचा असे सार्‍याच देखमुख कुटूंबाने ठरवले. सगळीकडे आमंत्रणं गेली. शेतावरच्या घरात वाढदिवस करायचा असे ठरले. मस्त फ़र्मास बेत होता. शहरातुन आचारी बोलवला होता. जवळ जवळ सर्व गावाला आमंत्रण होते असे म्हणले तरी चालेल. सगळे येउन गेले. अगदी राजीच्या माहेरची पण येउन गेली. राजीचे आई आणी वडील मात्र त्या रात्री थांबले. शेतावरच सर्वांची जेवणे झाल्यावर सगळे गावातील वाड्यात जायला निघाले. शंकर आणि त्याचे काही मित्र मागे थांबले होते. त्याने राजीला सांगितले तुम्ही सगळे जा वाड्यावर मी आज इथेच मुक्कामाला राहतो माझे मित्रही आहेत मुक्कामाला. त्यांना जरा वेगळी पार्टी हवीय त्याची व्यवस्था केलीय मी. राजीही लगेच तयार झाली. कारण आपल्या नवर्‍याला ती चांगलीच ओळखत होती. काही झाले तरी वेडवाकडं काही करणार नाही याची खात्री होती त्यामुळे ती बिनधास्त वाड्यावर निघाली. आणि तसही शंकरचा मुक्काम बरेचदा शेतावरच्या घरात असायचा. आक्षेपार्ह वागणं कधीही नसायचे त्याचे.

सकाळचे नऊ वाजले तरी शंकर वाड्यावर आला नव्हता.  असे आजवर कधीच घडले नव्हते. रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटे पाचला शंकर उठायचाच. उठुन जोरबैठका मारुन घामाघुम झाल्यावर बाहेरच्या झोपाळ्यावर निवांत बसलेला असायचा थोडावेळ. मग सकाळची आन्हिके आवरुन पुजा पाठ करुन मग एक तांब्याभर निरसे दुध प्यायचा. पेपर वाचुन मग गावात फ़ेरफ़टका मारुन तसच शेतावर जाऊन दुपारी दोन वाजता जेवायलाच घरी यायचा. अगदी शेतावर मुक्कामाला गेला तरी त्याच्या सकाळच्या या दिनचर्येत काहीही फ़रक पडला नव्हता. लग्नानंतरच्या एवढ्या वर्षात प्रथमच हे असे घडले होते. उगाचच मनात कुठेतली पाल चुकचुकायला लागली. अकरा वाजत आले तशी राजीची अवस्था केविलवाणी झाली. शंकरचे आई वडिल पण काळजीत पडले. राजेश शंकरचा भाऊ आता मात्र शंकरला बघायला बाहेर पडला. राजेशची बायको मनिषा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आलेली सुमन राजीला धीर देत होते. तासभर गेला असेल नसेल राजेशची जीप दारात उभी राहिली. मागे शेतावरचा एक गडी शंकरला धरुन बसला होता. राजीच्या छातीस धस्स झाले. काय वाढुन ठेवलेय पुढ्यात तिला काही समजेना. ती वार्‍याच्या वेगाने जीपकडे धावली. राजेशने तिला शांत केले म्हणाला, " वहिनी काळजी करु नका, दादा अती दारु पिल्याने बेशुद्ध आहे. बाकी काहीही झालेले नाहीय." आपला नवरा दारु प्यायला हे समजल्यावर ती मटकन खालीच बसली. मनिषा आणि सुमनने तिला धीर देउन आत आणले. जरा पाणी प्यायला दिले. यशोदा एकदा तिच्याकडे अन एकदा आढ्याकडे बघत नुसतीच पडुन होती. अन तिच्याजवळ घरचे मोठे कारभारी विष्णुपंत हतबल होऊन बायकोकडे पहात बसलेले.

दुपारनंतर शंकर शुद्धीवर आला. त्याची त्यालाच लाज वाटायला लागली. उठुन बाथरुमात जाऊन उलट्या केल्या. आंघोळ करुन बाहेर आला तोपर्यंत सर्वजण माजघरात एकत्र आले होते. त्याने सर्वांची माफ़ी मागितली. पुन्हा असे होणार नाही. याची ग्वाही दिली. कुणीच काही बोलले नाही. राजीने सर्वांची पाने घेतली. सकाळपासुन लहान मुले सोडता कुणाच्याच पोटात अन्नाचा कण नव्हता. तरीही सारेजण उगाचच जेवायचे म्हणुन जेवले. झालेल्या प्रकाराने सर्वांचीच अन्नावरुन वासना उडाली होती. ताटावरुन उठुन शंकर खोलीत गेला. आणि बाकी सारेजण आपाप्ल्या खोलीत गेले. मागचे सारे आवरायला राजीला मदत करुन मनिषा आणि सुमनही आपापल्या खोलीत गेल्या. राजी मात्र स्वयंपाकघरात लहानग्या चंदाला घेउन तशीच बसली होती. झाल्या प्रकाराचा विचार करत. अशी कशी काय दारु प्यायची अवदसा आपल्या नवर्‍याला आठवली याचा विचार करुन करुन ति थकली अन बसल्या जागीच तिचा डोळा लागला.

कसल्याशा आवाजाने ती जागी झाली. पाहिले तर नुकतीच चालायला लागलेली चंदा स्वयंपाकघरातल्या कपाटाकडे गेली होती. त्या कपाटाला धरुन ती उभी रहात असताना काहीतरी पडले. अन त्या आवाजाने ती जागी झाली. चंदाला ती घेतच होती कडेवर तेवढ्यात चेहर्‍यावर अपराधी भाव असलेला शंकर तेवढ्यात तिथे आला. " राजी मला माफ़ कर ग. परत असे नाही होणार. मित्रांनी खुपच आग्रह केला ग म्हणुन अगदी घोटभर घेतली मी पण तेवढ्यानेही मला गरगरल्यासारखे झाले. अन मग त्यांनी मला कोल्डड्रींक्स मधुन पाजली ग. माझ्या नाही लक्षात आले ते."
" बर ठीक आहे. "
" नुसते ठीक आहे काय? रागव ग तु माझ्यावर. चिड माझ्यावर. पण अशी शांत नको बसुस. बोल न माझ्याशी. "
"  काय बोलु मी? तुम्ही दारु पिलीत हा माझ्यावर एवढा मोठा आघात आहे की मी तो अजुनही पचवु शकत नाहीय. तरी बर माझे आई बाबा सकाळी पहिल्या गाडीने गावाकडे गेले. नाहीतर तुम्हाला असे पाहुन त्यांना काय वाटले असते अन त्यांच्यासमोर माझी काय अवस्था झाली असती याचा मी विचारच नाही करु शकत."
" हो ग राजी माझी चुक झाली मी मान्य करतो ग. खरच परत असे नाही होणार. "
राजीनेही त्याला मोकळ्या मनाने माफ़ करुन टाकले. परत सारे कसे छान चालु झाले. घडलेल्या या घटनेबद्दल परत कुणीही त्याला टोकले नव्हते. अन तो ही त्याचे नेहमीचे रुटीन पाळत होताच. राजेशही आपल्या नोकरीच्या गावी मनिषाला अन मुलांना घेऊन गेला आणि सुमनही आपल्या मुलांना घेऊन सासरी गेली. वर्षभर कसे अगदी काहीही न घडता सुरळीत गेले.

तसही विष्णुपंतांचा थोडा धाक होताच त्याला. त्यांची करारी करडी नजर शंकरवर होतीच. पण आज विष्णुपंत बाहेरुन आले तेच मुळी अगदी गलीतगात्र होऊन. परशा कायम त्यांच्याबरोबर असायचाच. परशाच्या आधाराने ते घरी आले. राजीला काही त्यांची लक्षणे ठीक दिसेनात. प्रचंड खोकत होते. अन अंग खुप कापत होते. चांगलीच हुडहुडी भरली होती. अंगात खुप ताप भरला होता. परशाला त्यांच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगुन ती बाहेर आली. गणेशला आजीला बोलवायला देवळात पाठवले. आणि शेजारच्या महादुला शेतावर शंकरला बोलवायला पाठवले. घरच्या फ़ोनवरुन गावातल्या डॉक्टरना फ़ोन केला आणि त्यांना ताबडतोब घरी यायला सांगितले. दहा पंधरा मिनीटात डॉक्टर आलेच. अन त्यांच्या पाठोपाठ यशोदा आज्जी आणि शंकरही आले. डॉक्टर विष्णुपंतांना तपासत होते. त्यांच्या चेहर्‍यावर चिंतीत भाव होते पण तरी फ़ार काही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाहीय असे वाटत होते. एक इंजेक्षन देऊन आणि स्वताजवळची औषधे दिली. तसेच मेडीकलमधुन आणायची औषधेही लिहुन दिली. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे चालु ठेवा असे सांगुन ते निघाले. शंकर त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने वडिलांच्या तब्बेतीबद्दल विचारणा केली. जरा काळजीतच होता तो. " अरे शंकर नको काळजी करु. आत्ता तरी साधा ताप वाटत आहे. आपण उद्यापर्यंत पाहु अन मग काय करायचे ते ठरवु. मी दिलेल्या इंजेक्षन आणि औषधाने ताप उतरायला हवा आहे. बघु उद्या मी सकाळी परत येतो."

तो दिवस सगळा काळजीतच गेला सर्वांचा. उपाशी रहायचे नाही म्हणुन सर्वांनी थोडे जेउन घेतले पण जेवणात कुणाचेच मन लागत नव्हते. ताप काही उतरत नव्हता. कुणी ना कुणी त्यांच्याजवळ बसुन कपाळावरच्या पट्ट्या बदलत होतेच. यशोदा आज्जीने तांदळाजी पेज थोडी थोडी चमच्याने भरवली पण अर्धी वाटी पेज फ़क्त पोटात गेली. ताप काही अजुनही कमी होत नव्हता पण तरीही ते चांगले शुद्धीत होते. सर्वांशी बोलत होते हळु हळु. पण तरीही सारेजण काळजीतच होते. रात्री आठच्या दरम्यान विष्णुपंतांनी परत एक वाटीभर पेज पिली. त्यानंतर त्यांना चांगली तरतरी आली. थोडे तक्क्याला टेकुन त्यांना शंकरने बसवले. घरातील लहान मोठी सगळीच त्यांच्याजवळ येऊन बसली. त्यांनाही सर्वांना पाहुन बरे वाटले. " शंकर उद्या जरा जरा राजेश आणि सुमनला बोलवुन घेतोस? अन येताना मुलांनाही घेउन या म्हणावे. " त्यावर शंकर म्हणाला, " बाबा आत्ताच फ़ोन करतो अन उद्या सकाळी यायला सांगतो." त्याने राजेशला फ़ोन करुन मनिषा अन मुलांना घेउन ये बाबा वाट पहात आहेत. जरा बरे वाटत नाहीय. असा फ़ोन केला अन येताना वाटेत थांबुन सुमनला अन भावजींना मुलांसहीत घेउन ये सांगितले. त्यावर राजेश काळजीत पडला. " का रे दादा काय झालय बाबांना? काही काळजीचे कारण आहे का?" " नाही रे  आज सकाळपासुन ताप अन खोकला अचानकच चालु झाला. डॉक्टर येउन गेले. काळजीचे कारण नाही म्हणाले पण ताप मात्र अजुनही उतरला नाहीय. पण सकालपासुन अगदी मलुल होते ते आत्ता जरा उठुन बसलेत अन जरा जरा बोलत आहेत. तेच म्हणाले तुला अन सुमनला उद्या येउन जायला सांग. म्हणुन फ़ोन केला. अन नको काळजी करुस तु. उद्या मात्र लवकर निघा सगळे अन नाश्त्याला इकडेच या. मी सुमनला फ़ोन करुन सांगतोच. "
" ओके ठिक आहे. तसच काही वाटलं तर मला ताबडतोब फ़ोन कर. मी येतोच सकाळी सगळ्यांना घेउन. बाय... "
" बाय. "
रात्री जेउन सारी बच्चेकंपनी झोपली. आळीपाळीने यशोदा आज्जी, शंकर, राजी असे विष्णुपंतांजवळ बसुन होते. परशाही बाहेर पडवीत जागाच होता. त्याचे लहानपण सारे देशमुखांच्या वाड्यातच गेले होते. विष्णुपंत आणि परशा यांच्या वयात दहा बारा वर्षाचे अंतर होते. आणि परशाचे लग्नही विष्णुपंतांच्या वडिलांनीच लावुन देऊन वाड्यातीलच बाजुच्या दोन खोल्या त्यांना रहायला दिल्या होत्या. तो अन त्याची बायको रखमा तिथेच रहात होते. अन त्यांचा मुलगा सुन परगावी नोकरीच्या ठिकाणी. बराच काळ एकत्र असल्याने विष्णुपंत आणि परशा यांच्यात मालक नोकर हे नाते नव्हतेच. तो त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानायचा. त्यांचा सल्ला घ्यायचा आणि तो अमलातही आणायचा. दोघांचाही एकमेकांवर खुप जीव होता. विष्णुपंत आजारी पडल्यापासुन त्यालाही चैन पडत नव्हते. सकाळपासुन त्यानेही काही खाल्ले नव्हते. मधुनच उठुन तो त्यांच्या रुममधे येउन चक्कर मारुन जात होता. आपल्या नवर्‍याची अवस्था रखमाही जाणुन होती. रात्री मात्र तिने आपल्या नवर्‍याला जबरदस्तीने चार घास खाऊ घातलेच.

काहीही विपरीत न घडता रात्र तर पार पडली. पण ताप मात्र उतरायच्या ऐवजी चढायलाच लागला. पहाटे पहाटे पाचला मात्र तापामुळे ते ग्लानीत जायला लागले. आणि त्या ग्लानीत काही काही बोलायला लागले. काय करावे कुणालाच काही सुचेना. एवढ्या पहाटे दवाखान्यात तरी कसे न्यायचे? अन डॉक्टरला बोलवावे की नको अशा विवंचनेत शंकर असतानाच परशा डॉक्टरला घेउनच आला. डॉक्टरनी तपासले अन त्यांच्या चेहर्‍यावर काळजी दिसु लागली. ताप चांगलाच चढला होता. त्यांनी परत एक इंजेक्षन दिले. मात्र ते तिथेच थांबतो म्हणाले. इंजेक्षनचा काय परिणाम होतोय ते पाहुन आपण पुढचा निर्णय घेउ म्हणाले. एव्हाना सात वाजत आले होते. राजेशचा निघाल्याचा फ़ोन सहाला आलाच होता. तासाभरात तो पोचेलच. त्यामुळे त्याला फ़ोनवर काही सांगितले नाही.
साडेसात वाजले आणि दारात गाडी उभी राहिली. परशा गाडीतले सामान काढायला लागला. मुले गाडीतुन उतरुन आत आली अन चंदा मिनी बरोबर त्यांची मस्ती चालु झाली. लहानच असल्याने परिस्थितीचे गांभिर्य त्यांना कुठले समजायला. एकटा गणेशच काय तो थोडा कळता सवरता होता. राजेश मनिषा सुमन आणि तिचा नवरा सतीष सारेच विष्णुपंतांच्या खोलीकडे गेले. एकाच दिवसात त्यांच्या चेहर्‍यावरची रया गेली होती. राजेश अन सुमनने त्यांच्या दोन्ही बाजुला बसत त्यांना हाक मारली. त्यांची काहीच हालचाल नाही. दोघेही अगदी कावरे बावरे झाले. त्यातल्या त्यात सुमन तर जास्तच. अगदीच रडवेली झाली ती. एकुलती एक कन्या असल्याने सार्‍यांचाच तिच्यावर खुप जिव होता. आणि विष्णुपंतांचा तर जास्तच. बापलेकीचे नातेच जगावेगळे. डॉक्टरनी सर्वांनाच शांत रहायला सांगितले. मगाशीच इंजेक्षन दिलेय, त्यामुळे थोडा फ़रक आहे. पण अजुन अर्ध्या तासाच चांगला फ़रक व्हायला हवाय. तेव्हा तुम्ही जरा शांत रहा. काही काळजी करु नका.
अर्ध्या तासाचा तास गेला आणि त्यांनी जरा डोळे किलकिले केले. समोर अस्पष्ट असे दिसणारे चेहरे हळु हळु नीट दिसु लागले. समोर उभ्या असलेल्या शंकरच्या एका बाजुला राजेश आणि दुसर्‍या बाजुला सुमन आणि सुमच्या शेजारी यशोदेला पाहताच त्यांच्या चेहर्‍यावर हलकेसे स्मित उमटले. ते उठायचा प्रयत्न करु लागले. पण डॉक्टर होतेच जवळ त्यांनी त्यांना उठु दिले नाही. पुर्णतः झोपुनच रहायला सांगितले. एव्हाना सारी नातवंडेही जवळ आली होती. त्यांना पडलेला फ़रक बघता डॉक्टर जुजबी सुचना देऊन निघाले. राजीने तोवर तांदळाची पेज करुन आणली होती. ती गरम गरम पेज सुमनच्या हातुन खाल्ली. आणि औषध घेउन ते परत झोपले. आता ताण कमी झाला होता. बाकीच्यांनीही नाश्ता करुन घेतला. राजी आणि मनिषा दुपारच्या स्वैपाकाला लागल्या. स्वैपाक झाल्या झाल्या बच्चेकंपनीला आणि यशोदा आज्जीला वाढुन त्यांची जेवणे उरकुन घेतली. सुमन परत एकदा वडिलांसाठी रव्याची खीर घेउन गेली. ती खाऊन विष्णुपंत नातवंडाशी बसल्या बसल्या गप्पा मारु लागले. इकडे बाकी सारे जेवायला बसले. जेवताना वडिलांचा अचानक आलेला ताप, त्यांची एका दिवसातच डाऊन झालेली तब्बेत हाच विषय होता. तर तिकडे यशोदा नवर्‍याच्या शेजारी बसुन नातवंडाची बडबड ऐकत सुखावुन जात होती. चंदा सर्वात लहान असल्याने ती हट्ट करुन आजोबांच्या मांडीवर बसली. तर मिनी गणेश आणि सुमनची लतिका आणि राजेशचा आर्य आणि मनवा हे आजी आजोबांच्या आजुबाजुला बसत काही गमती जमती ऐकवत होती. मधेच काही हत्ती मुंगीचे विनोद ऐकवुन आजी आजोबा आणि इतरांना ऐकवत होती. परशा आणि रखमाही जेवण करुन तिथे खोलीत येउन बसले होते. सारे कसे छान चाललय असच अगदी. शंकर, राजेश आणि सतीष जेवण करुन अन राजी, मनिषा आणि सुमन मागचे सारे आवरुन विष्णुपंतांच्या खोलीत आले. त्यांनी आपल्या सार्‍या परिवारावर सुखाने नजर टाकली. एवढ्यात राजेशला काय वाटले कुणास ठाउक त्याने पटकन आपल्या मोबाईलवर आई वडील आणि नातवंडे असा एक फ़ोटो काढला. मग काय सगळेच फ़ोटोसाठी पुढे झाले. दोन्ही सुनांबरोबर वेगळा, तीनही मुलांबरोबर वेगळा अगदी परशा आणि रखमा बरोबर पण फ़ोटो काढला. सुख सुख म्हणतात ते अजुन काय ? असे त्यांना वाटुन गेले.
चला रे मुलांनो आता आजोबांना विश्रांती घेउ द्या बरे म्हणत राजी अन मनिषाने मुलांना बाहेर नेले. शंकर आणि राजेशने त्यांना व्यवस्थित झोपवुन अंगावर पांघरुण घातले. अन ते पण बाहेर आहे. सुमन आईबरोबर बोलत बसली हलक्या आवाजात. त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता विष्णुपंत झोपी गेले. चार वाजता त्यांना परत खीर अथवा पेज काय आणु हे विचारण्यासाठी म्हणुन सुमन उठवायला गेली. तिने हाक मारली. पण ते काहीच प्रतिसाद देईनात. चांगलीच गाढ झोप लागलेली दिसतेय थोड्यावेळाने उठवु म्हणत ती परत बाहेर आली. मुले बाहेर झोपाळ्यावर आजीजवळ गोष्ट ऐकत होती. ती पण बसली तिथे आपले बालपण आठवत. अर्धा तास गेला असेल नसेल तोच मुलांनी भुक भुक चालु केले. त्यांना काहीतरी करुन द्यावे आणि वडिलांनाही गरम गरम काही द्यावे म्हणुन आपल्या वहिनीसोबत सुमन स्वैपाकघरात गेली. राजीने एकीकडे तांदळाची उकड बनवली मुलांसाठी आणि फ़ार विचार न करता सुमनने थोडीशी पेज बनवली. ती घेउन ती वडिलांच्या खोलीत गेली. अजुनही वडील उठले नसल्याचे तिने पाहिले. मग तिने त्यांना हलवुन उठवायचे ठरवले. पेज बाजुच्या टेबलवर ठेवली. आणि ती वडिलांना उठवु लागली.  " बाबा चार वाजुन गेलेत, उठा बरे जरा, पेज घ्या म्हणजे औषधे घ्यायला बरे." पण छे ते काही उठेनात. त्यांच्या कपाळावर हात ठेवला तिने अन ती चरकलीच जरा. कपाळ अगदी गार लागत होते. तिने हाकांचा सपाटा लावला.... आई, दादा, राजेश, वहिनी लवकर या. बाबा उठत नाहीत बघा." अन ती रडुच लागली. परशा सहीत सारेच धावत त्या खोलीत आले. सारेच अगदी कळवळुन हाका मारु लागले. पण ओ द्यायला ते होते कुठे? त्यांचे प्राण तर कुडी सोडुन केव्हाच गेले होते. मुलेही आली खोलीत अन आबा उठा की तुम्ही गोष्ट सांगणार आहात ना? उठा न पटकन असे म्हणु लागली. डॉक्टरही फ़ोन केल्यावर दहा मिनीटात हजर झाले. त्यांनी चेक केले अन आय अ‍ॅम सॉरी ते आता या जगात नाहीत असे म्हणत शंकर अन राजेशच्या खांद्यावर थोपटत बाहेर गेले.

कुणाचाच विश्वास बसत नव्हता की थोड्यावेळापुर्वी हसत खेळत बोलणारी व्यक्ती आत्ता आपल्यात नाहीय. घरात एकच हलक्ल्लोळ माजला. कोण कुणाला सावरायचे समजत नव्हते. गणेश सोडता सारी चिल्लीपिल्ली आपापल्या आईला चिकटली होती अन भेदरुन सारे पहात होती. एकटे आबा फ़क्त शांत दिसत होते. हळु हळु सर्वांना विष्णुपंत गेल्याची बातमी सर्वांना समजु लागली. जसे समजेल तसे एक एक जण येत येत सारा गाव लोटला. नाही म्हणलं तरी विष्णुपंत देशमुख गावातले बडे प्रस्थ होते. आणि नुसतेच बडे नाही तर गावातील सर्वांना कशाच्या ना कशाच्या रुपाने त्यांनी मदतही केली होती. सर्वांच्या दर्शनासाठी विष्णुपंतांचा देह बाहेर ओसरीवर आणुन ठेवला. लोकांची रिघ लागली होती. तासा दोन तासातच  राजी आणि मनिषाच्या माहेरचे आणि सुमनच्या सासरचे लोक आले. यशोदाआजीचा एक मोठा भाऊ होता पण तो ही थकला होता आणि हिंडु फ़िरु शकत नसल्याने त्याचा मुलगा आणि सुन आले. सारे आलेच आहेत तर आता थांबण्यात काही अर्थ नाही असा विचार करुन बुजुर्ग मंडळींनी पुढाकार घेऊन पुढील सारी व्यवस्था केली आणि पुढच्या तासाभरात विष्णुपंत देहरुपाने पण या जगात राहिले नाहीत. यशोदा आज्जीला कल्पना आली होती की न कळे पण ती सर्वांसमोर तरी शांत होती. उठुन बाथरुममधे जाऊन तिने दार लावुन घेतले. सौभाग्यालंकारातील मंगळसुत्र कुणी काढले गळ्यातले ते समजले नाही तिला पण कपाळावरची कुंकवाची चिरी डोक्यावर पडणार्‍या पाण्यात मिसळुन जात दिसेनाशी झाली. आणि त्याचबरोबर डोळ्यातले अश्रु पण. तिने मनाशी काही ठरवले आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यावर कुणीतरी पांढरे पातळ पुढे केले. ते नाकारुन ती तशीच ओलेत्याने आपल्या खोलीत आली आणि दरवाजा लावुन घेतला. राजी घाबरली. मनिषा अजुनही एकीकडे सुमनला सावरता सावरता मुलांकडे बघत होती. राजी आपल्या सासुच्या मागोमाग आली. पण दरवाजा आतुन बंद होता. तिने हाका मारल्या पण आतुन काहीही प्रतिसाद आला नाही. आता बोलवावे कुणाला? कारण सारी पुरुषमंडळी तर घाटावर स्मशानात गेली होती. काय करावे हा विचार करतच होती तोवर यशोदा आज्जी बाहेर आली. एकदम शांत. त्यांचे पांढरे कपाळ अन मोकळ्या गळयाकडे पहावत नव्हते. नकळतच तिच्या डोळ्यातुन अश्रु येउ लागले. आज्जी म्हणाली, " राजी मोठी न तु घरची? तुच असे केलेस तर बाकीच्यांना कोण सावरणार ग? माझे दुःख तर डोंगराएवढे आहे ग. माझी इतक्या वर्षाची साथ सोबत अचानक एक दोन दिवसात संपली. पण मला रडुन नाही चालणार ग. मीच रडत बसले तर शंकर, राजेश अन सुमन कडे कोण पाहील? मला तुझी साथ हवीय या सर्वांना सावरायला. देशील न मला साथ? " डोळे पुसत राजीने होकार दिला.

" आई तु आंबील केले आहेस? मला दे न जरा आंबील. आई ए आई. " चंदा केव्हाची हाका मारत होती. ती भानावर आली आणि तिने चंदाला जवळ घेतले. " चंदा रागवलीस का ग माझ्यावर मी सकाळी तुला ओरडले म्हणुन? " " नाही ग आई. तु रागवलीस म्हणुन तर मी दादु आबा कडे गेले. अन मी गेले म्हणुन तर किसनाने डबा आणुन दिला अन मी काही खाऊ शकले न? " " किती शहाणी ग माझी बाय ती. " म्हणत राजीने चंदाची अलाबला घेतली. " पण आई असं किती दिवस आणायचं ग पीठ दादुआबा कडुन? मला नै आवडत. आणि तिथे कोण असेल ना तर कसे बघत असतात माहितेय तुला? " तिच्या केसातुन हात फ़िरवत राझी म्हणाली," हो ग बाळा, माहितेय मला. पण काय करु ग नाईलाज आहे माझा. या गावात मला काम पण नाहीय काही. आणि दुसर्‍या गावात जायचं म्हणजे रहायची सोय करण्यापासुन सगळच ग. पण बाळा जातील हे दिवस पण. भाऊ मोठा झाला न की सारे काही नीट होईल." पाच सहा वर्षाची चंदा परिस्थितीमुळे वयाच्या मानाने खुपच शहाणी झाली होती. मिनी आता सहावीत होती अन गणेश दहावीला होता. तिघही अभ्यासात हुशार होतेच. शाळेत शिकवताना होणारा अभ्यास आणि शाळेतील गुरुजी आणि बाईंनी पुस्तक वह्या बाबतीत केलेले सहाय्य आणि गणेशला मिळणारी स्कॉलरशीप यावर कसे बसे तिघांचे शालेय शिक्षण चालु होते. त्याला काही खिळ बसली नव्हती. पण नुसते तेच असे नाहीना. प्रपंचाला काय लागत नाही? घर स्वताचे असल्यामुळे निवारा होता. पण अन्न आणि वस्त्र याचे काय ? शंकर, राजी आणि यशोदा यांचे फ़ार काही अडले नाही कारण चांगली परिस्थिती असताना भरपुर कपडालत्ता होता. तोच आजवर जपुन जपुन वापरणे चालु होते. प्रश्न होता तो चंदा मिनी आणि गणेशचा. कारण वयानुसार अंगही वाढत होते त्यामुळे असलेले कपडे जोवर बसत होते तोवर काही प्रॉब्लेम नव्हता. पण नंतर? राजीच्या बहिणीं मात्र सणावाराच्या निमित्ताने मुलांना कपडे घेत होत्या. राजीचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही या पद्धतीने. मुलांसाठी ते मात्र राजीने मान्य केले पण इतर कसलीही मदत मात्र तिने घेतली नाही. सासुला पण ते आवडल नसतं याची तिला खात्री होती.

दुपारचे तीन वाजले असतील यशोदा आज्जीने आतुन हाक मारल्यावर ती आत गेली. सासुला उठवुन बसत ती म्हणाली, " काही आणु का करुन तुम्हाला? " " नको ग राजी. खुप करतेय तु. अगदी कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय ते तुझ्याकडुन शिकावे बघ. पण माझ्या तोंडाला चवच नाहीय ग. माझा हा तापही यांचासारखाच मलाही नेतो की काय असे वाटु लागलेय मला. अन नेले तर बरेच होईल एक तोंड तरी कमी होईल ग खायचे. " " आई.......!!!! असे नका म्हणु हो तुम्ही. तुमच्या जिवावरच तर हा सगळा भार मी पेलतेय. तुम्ही गेलात तर मी मोडुन पडेन हो. " असे म्हणत राजी त्यांच्या अधिकच जवळ गेली. आणि गळामिठी घातली. आपल्या सासुचे अंग अजुनच तापलेय हे तिला जाणवले. अन तिने गणेशला डॉक्टरकडे पाठवले. त्याच्याबरोबर डॉक्टर आले आणि तपासुन त्यांनी औषध दिले आणि म्हणाले, " काळजी नका करु उद्या त्या खडखडीत बर्‍या होतील. " त्यांच्याबरोबर राजी बाहेर आली तिने काळजीने विचारले सासुच्या तब्बेतीबाबत आणि पैशाबाबत तेव्हा डॉक्टर म्हणाले, " वहिनी, काकु होतील बर्‍या नका काळजी करु. साधा ताप आहे. आणि पैशाचे म्हणाल तर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर नरकात पण जागा नाही मिळायची मला. माझ्यावर तुमच्या घराण्याचे खुप उपकार आहेत हो. बर मी निघतो आता. उद्या सकाळी दवाखान्यात जाण्यापुर्वी परत येतो. त्यांना हलकाच आहार द्या सध्यातरी. "
राजीने परत एकदा थोड्डेसे आंबील करुन सासुला खायला घातले. गोळ्या दिल्या. मुलांना अभ्यास करायला सांगुन ती सासु शेजारीच आडवी झाली जरा. पण आज झोप रुसलीच होती तिच्यावर......

सासरे गेल्यावर सासुच्या मदतीने राजीने सर्वांनाच सावरले.  म्हणजे किमान सावरल्यासारखे वाटत तरी होते सारे. विष्णुपंतांचे दिवसकार्य झाल्यावर सारेच आपापल्या घरी निघाले. निघताना सुमन आणि राजेश आईच्या गळ्यात पडुन खुप रडले. वारंवार आई काळजी घे असे म्हणत होते. वहिनीला म्हणजेच राजीलाही काळजी घेण्याबाबत सारखे सांगत होते. एकाच गाडीने सारे निघाले. निघेपर्यंतच तीन वाजले. आणि नाही म्हणले तरी नुकतीच घडलेली घटना सर्वांच्याच मनात अजुनही घोटाळत होतीच. तेच विचार मनात चालु होतेच. गाडीत सारेच शांत होते. राजेश गाडी चालवत होता. एवढा घाट ओलांडला की सुमनला तिच्या घरी सोडुन पुढे जायचे या विचारांच्या नादात एका वळणावर समोरुन आलेला भरधाव ट्रक राजेशला कळलाच नाही. अन कळेपर्यंत वेळ निघुन गेली होती. ट्रकने कारला एवढी जोरात धडक दिली की त्या छोट्याशा घाटातुन कार जी खाली दरीत फ़ेकली गेली की कुणालाच काही समजायच्या आतच होत्याचे नव्हते झाले. गाडीतले पेट्रोल सांडुन त्याने पेट घेतला परिणामी गाडीही पेटली. बर फ़ार मोठ्या रहदारीचा रस्ता नसल्याने घडलेली घटना पटकन समजलीच नाही कुणाला. ट्रक ड्रायव्हर तर ट्रक घेउन लगेचच पळुन गेला. खाली कसली आग आहे हे पहायला काही वाहने थांबली असता रस्त्यावरच्या खाणाखुणांवरुन ट्रकने एखाद्या छोट्या वाहनाला जोरात धडक दिली असावी अशी शंका वजा खात्री जमलेल्या लोकांनी व्यक्त केली.  मदतीला जावे तर पेट घेतलेल्या गाडीवरुन कुणी वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. अन खाली जाणे तसही खुप रिस्की होते. तेवढ्यात कुणीतरी इमर्जन्सी नंबर डायल करुन घडलेली घटना कळवली. अर्ध्या तासातच पोलीस व्हॅन एका अ‍ॅम्ब्युलन्स सहीत तेथे आली. एकंदरीत परिस्थिती पाहता कुणीही वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. आणि पोलीसांची आणलेली कुमकही कमी होती. एव्हाना आजु बाजुच्या छोट्या गावात अपघाताची बातमी पसरली होतीच. त्यामुळे तेथील उत्साही तरुण मंडळी आपापल्या गाड्या घेउन अपघातस्थळी दाखल झाली होतीच. त्यांची मदत घेउन खाली उतरायचे असा विचार पोलीस करत होते. पण अजुनही मदत हवीच होती.  अग्नीशामक गाडीही बोलवावी लागणार होती. तर अशी सर्वांची मदत घेउन पोलीस काही तरुणांना घेउन खाली उतरु लागले. तोपर्यंत अग्नीशामक गाडीही तेथे दाखल झाली. सर्व जण योग्य ती काळजी घेऊनच गाडीजवळ जात होते. पाणी मारुन आग पुर्णतः विझवली. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात झोणार होती त्यामुळे जे काही करायचे ते तातडीने करावे लागणार होते. गाडीचा नंबर कळुन येत नव्हता. आणि गाडी जवळजवळ ७० ते ८० टक्के जळाली होती त्यामुळे आत किती लोक असावेत आणि कोण असावेत याचा काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्यात बाजुला कुणीतरी कण्हल्यासारखा आवाज आला. तो आवाज एका तरुणाने ऐकला अन तो त्या दिशेने निघाला. बाजुच्या झुडुपात एक लहान मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. खर म्हणजे ती जिथे पडली होती त्यावरुन ती वाचली कशी याचेच आश्चर्य वाटत होते. तिला तेथुन अलगद बाहेर काढले ती पटकन काका म्हणत त्याला बिलगली आणि बेशुद्ध झाली. तिला तातडीने वर आणुन दवाखान्यात पोचवायची व्यवस्था केली. तेथील बाकीचे सारे सोपस्कार आवरुन पोलीसही अर्धवट जळालेल्या डेडबॉडीज घेउन सरकारी दवाखान्यात गेले. मुलगी शुद्धीवर आल्याखेरीज काहीही समजणार नव्हते.

राजेशचा फ़ोन कसा काय लागत नाही अथवा कुणीही पोहोचल्याचा फ़ोन कसा केला नाही यावरुन सारेच काळजीत होते. राजी आणि तिची सासु सारखे आत बाहेर हेलपाटे घालत काय लागला का फ़ोन असे शंकरला विचारत होत्या. पण छे फ़ोन जणु रुसलाच होता. त्यात रात्री आठच्या दरम्यान जवळच्या घाटात अपघात झालेले समजल्यापासुन कुणाचाच जिव थार्‍यावर नव्हता. वाट पाहुन शेवटी सारेजण चार घास खाऊन घेउ म्हणत जेवायला बसले. जेवण झाल्यावर परत एकदा फ़ोन लावुन पाहिला तर लागतच नव्हता. सुमन घरी पोचली असेल म्हणुन तिच्या घरीही फ़ोन लावला तर तोही कोणी उचलत नव्हते. शेवटी कंटाळुन सारेच झोपी गेले. रात्री बारा वाजुन गेल्यावर दरवाजाची कडी वाजली अन राजीच्या आणि अशोदा आज्जीच्या काळजात धस्स झाले. शंकर आणि मुले मात्र झोपली होती. तिने शंकरला उठवले आणि दाराची कडी वाजत असल्याने सांगितले. शंकरने उठुन दरवाजा उघडला तर दारात पोलीसांना बघुन तो चांगलाच हबकला. यशोदा आणि राजी आता काय पुढ्यात वाढुन ठेवलय या विचाराने मटकन खालीच बसल्या. " शंकर तुम्हाला जरा पोलीस चौकीत आणि दवाखान्यात यावे लागेल." असे पोलीसांनी म्हणताच शंकर जामच घाबरला. " क काय सा साहेब क काय झालय? " शंकर घाबरुनच त त प प करु लागला. त्याला बोलायचे काही सुधरेना. राजी पुढे झाली. तिने धीर करुन विचारले " काय साहेब काय झालय एवढ्या रात्री तुम्ही आलात म्हणजे तसच काही असले पाहिजे. पण जरा नीट सांगाल का सारे." एवढ्यात परशा आणि रखमा पण बाहेर आले होते. " वहिनीसाहेब, संध्याकाळी घाटात अपघात झाल्याची बातमी आली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. एक मुलगी सोडता कुणीही वाचले नाहीय. मुलगी तशी बेशुद्धच आहे पण मधेच थोडावेळ शुध्दीत आली असता तिच्याशी जे काही बोलणे झाले त्यावरुन आम्ही अंदाज बांधला आणि इथे आलो. तुम्ही जर लगेच आतात तर खुप बरे होईल. कारण मुलगी शुद्धीत आली की रडतेय नुसती." रखमाला आपल्या सासुजवळ आणि मुलांजवळ बसवुन पोलीसांच्याच गाडीतुन शंकर, परशा आणि राजी असे तिघही निघाले. राजीला दवाखान्यात एक लेडी कॉन्स्टेबलची सोबत देऊन तिथे सोडुन शंकर आणि परशाला घेऊन जीप सरकारी दवाखान्याच्या दिशेने निघाली.

राजीने ती मुलगी असलेल्या खोलीत महिला पोलीसासहीत पाय ठेवला आणि ती चरकलीच. ती लतिका होती. सुमनची मुलगी. तिच्याजवळ एक तरुण स्त्री होती. ती मायेने तिच्या डोक्यावरुन हलका हात फ़िरवत होती. लतिका असे जोरात ओरडतच ती लतिकाजवळ गेली. एवढ्यात नर्सही आलीच तिथे. राजीला शांत करत ती म्हणाली, " ताई तुम्हीच धीर सोडला तर त्या पोरीने काय करायचे? शुद्धीत येइल तसे नुसते आई आई म्हणत रडतेय. ही कुणाची कोण काहीच समजेना. पोलीसांच्या मदतीने ज्याने हिला इथे आणले त्याने आपल्या बायकोला घराकडुन बोलवुन घेतले आणि इथे थांबायला सांगितले. त्याच या मॅडम. " राजीने त्या स्त्रीला नमस्कार केला आणि म्हणाली, " ताई तुम्ही आणि तुमचे मिस्टर होतात म्हणुन हिला लवकर ट्रीटमेंट मिळाली. खुप उपकार झाले बघा. संध्याकाळपासुन आम्ही फ़ोन लावतोय पण कुणाचाच फ़ोन लागेना. "
वहिनीसाहेब मी खुप लहान आहे. मला ताई म्हणु नका. माझे नाव प्रतिभा. अन उपकाराचे काय हो. लहान पोर ते एकट होतं अन मोठ्या अपघातातुन वाचले हेच नशिब आहे. जवळ कुणीच नव्हतं कारण काहीच ओळख पटेल असे अपघाताच्या ठिकाणी सापडले नाही असे माझे मिस्टर म्हणाले. मग ते अन मी दोघेच इथे. हिला पुर्ण शुद्ध येईपर्यंत आणि हिची ओळख पटेपर्यंत इथे थांबायचे असे ठरवले. आम्ही तुम्हाला ओळखतो पण ही तुमच्यापैकी कुणाची असेल असे वाटले नव्हते. " " अग प्रतिभा आजकाल कुणी कुणासाठी पाच दहा मिनीटे पण थांबत नाही ग. अन तु एवढा वेळ थांबलीस. तुझ्या घरीही असतील न तुझी कच्ची बच्ची. जा तु ती वाट बघत असतील तुमची. मी आहे इथे." " नाही हो ताई मी थांबेन. माझी एक मुलगी आहे. लहान आहे पण तिला आत्यांची सवय आहे. ती त्यांच्याकडेच असते. मी थांबते इथे. आत्या म्हणाल्या पोरगी एवढी गंभीर जखमी आहे तर तिचे नातेवाईक आले तरी तु थांब मदतीला. त्यामुळे मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही नका काळजी करु."
लतिकाजवळ राजी अन प्रतिभा दोघीही थांबल्या. बाहेर प्रतिभाचा नवरा प्रकाशही होताच.

इकडे सरकारी दवाखान्यात मिळालेल्या काही वस्तु आणि अर्धवट जळलेले मृतदेह बघुन शंकरने हंबरडाच फ़ोडला. काय हे होत्याचे नव्हते झाले असे त्याला वाटले. परशा बरोबर होता त्याने सावरले त्याला. पी एम करुन झाले होतेच. थोडीफ़ार पोलीस प्रोसीजर करुन आता सर्व देह ताब्यात घेउन पुढील व्यवस्था करणे एवढेच बाकी होते. त्याला काय करावे सुचत नव्हते. पोलीसांकडुन लतिका तेवढी वाचल्याचे त्याला समजले होते. आता सुमनच्या सासरी कळवायला हवे होते. त्याच्याकडे काही मोबाईल नव्हता त्यामुळे घरी जाणे भाग होते घरच्या डायरीतच सर्व नंबर्स होते. घरी जाता जाता दवाखान्यात लतिका कशी आहे पाहुन जावे तसेच राजीलाही सारे सांगावे म्हणुन तो निघाला. पोलीसांनी शंकरची अवस्था पाहुन त्यांची जीप आणि बरोबर एक मदतनीसही दिला होता. दवाखान्यात आल्यावर तो राजीला जसा भेटला तसा लहान मुलासारखा तिला बिलगुन रडु लागला. आपल्या नवर्‍याचा हळवा स्वभाव राजी जाणुन होती. आता तिलाच कणखर व्हायला हवे होते. पण तरीही आधी ती एक स्त्री होती. त्यामुळे तीलाही दुःखाचा आवेग सहन झाला नाही. ती पण रडु लागली. परशा, प्रतिभा आणि प्रकाशने त्या दोघांना सावरले. शंकर लतिकाची अवस्था पाहुन अजुनच खचला. हे सारे होईपर्यंत चांगलेच उजाडलेले. लतिकाजवळ प्रतिभा आणि राजीला थांबवुन प्रकाश समवेत शंकर आणि परशा घरी गेले. यशोदा आज्जीचा आणि रखमाचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. मुलांना काहीच माहिती नसल्याने ती मात्र निजलेलीच होती.  झाला प्रकार परशा आणि प्रकाशकडुन आज्जीला आणि रखमाला समजल्यावर आज्जीने हंबरडा फ़ोडला. आपला नवरा गेल्यावरसुद्धा तिने मुला नातवंडांसाठी धिराने घेतले होते. पण आता मात्र बांध फ़ुटला. नुकताच नवरा गेला आणि अजुन दिवस उरकले नाहीत तोवर मुलगा, सुन, मुलगी, जावई आणि नातवंडे काळाने ओढुन नेली. कोण कुणाला धीर द्यायचा हा प्रश्नच होता. प्रकाशने पुढाकार घेऊन परशाशी बोलुन डायरीमधील नंबर पाहुन फ़ोनाफ़ोनी केली. गावकर्‍यांची रिघ लागली होती. जो तो हे समजल्यावर दुःखी होत होता. गावातील काही मोठ्यांच्या चर्चेतुन अंत्यदर्शनासाठी कोणतीही डेडबॉडी घरी आणु नये असे ठरले. कारण ते कुणालाही बघवले नसते आणि तसही आता १२ तास उलटून गेले होते. त्यामुळे परस्परच अंत्यसंस्कार करावेत असे ठरले. सुमनचे सासु सासरे पण लगेच येणे शक्य नव्हते अगदी आत्ता लगेच निघाले तरी यायला एक दिवसापेक्षा जास्त वेळ लागला असता. कारण ते विष्णुपंताचे समजल्यावर येउन भेटुन नंतर त्यांच्या मोठ्या मुलाकडे जयपुरला होते. त्यामुळे त्यांनी सारी जबाबदारी शंकरवर सोपवली आणि आम्ही लगेच निघत आहोत तरी उद्या दुपार होईल यायला असे सतिषच्या भावाने सांगितले. त्यामुळे आता जास्त थांबण्यात अर्थ नाही. मनिषाच्य माहेरचे आणि राजीच्या माहेरचे आल्यावर पुढचे सर्व सोपस्कार उरकले.

लतिकाला अजुन किमान चार पाच दिवस तरी दवाखान्यात ठेवावे लागेल असे वाटत होते. तसं फ़ार काही लागल नव्हतं म्हणजे काळजीचे कारण नव्हते. पण मुका मार आणि अंगावर जखमा बर्‍याच होत्या. नशिब की डोक्याला काही इजा झाली नव्हती. आणि कुठेही फ़्रॅक्चर नव्हते. पण ती खुप घाबरलेली असल्याने शुद्धीवर आल्यावर आईचा जप चालु होता. समोर मामीला पाहुन ती आई कुठाय असे विचारुन रडयला लागायची. राजीलाच तिची काळजी घ्यायला हवी होती. मानसीक आधारही द्यायला हवा होता. चंदापेक्षा दोन तीन वर्षानीच ती मोठी होती म्हणजे अवघी आठ नऊ वर्षाची. म्हणजे काही फ़ार मोठी नव्हती. तिचे आई बाबा आता या जगात नसल्याचे तिला सांगणे खुपच अवघड होते. उद्या तिचे तिकडचे आजी आजोबा आल्यावर तिला कसे सांगायचे ते पाहु अन तसही सध्या तिला थोडेफ़ार झोपेतच ठेवणे गरजेचे होते. जागी झाली की दवाखान्यातुनच तिला पेज, खीर, सुप असे नर्स येउन भरवत होती. राजीने मोठ्या भावाशी बोलुन आपल्या वहिनीला ठेवुन घेतले होते. कारण तिला दवाखान्यातुन हलणे शक्य नव्हते. अन घरी कुणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती. सासुबाईंना संभाळणे पण गरजेचे होते. त्या तर अगदी
हवालदिल झाल्या असणार याची तिला खात्री होती अन ती घरी नसल्याने तर जास्तच. खरे तर एकदा तरी घरी जाऊन येणे गरजेचे आहे. मिनी आणि गणेश मोठे आहेत पण चंदा अजुन लहान आहे. आणि आबा गेल्यावर ती सारखी घरभर भिरभिरत असायची आबा कुठे आहेत म्हणत. हे सारे घडले त्यामुळे ती अन अर्थातच मिनी गणेशही बिथरले असतील. सारेच लहान कोण सावरणार त्यांना. पण वहिनीवर घराचा भार सोपवुन ती निश्चिंत झाली. व्हायलाच हवे होते पर्यायच नव्हता. कसा बसा तो दिवस संपला. प्रतिभाने दवाखान्यातली जबाबदारी घेतल्याने तिच्या जेवण खाण्याचा चहाचा प्रश्न नव्हताच अन तसही या घटनेमुळे जात तरी कुठे होते जेवण.

दुसर्‍या दिवशी सकाळी लतिका चांगलीच शुद्धीत आली होती. अन तशी शांत होती. सकाळी दुध अन बिस्कीटे खाल्ली. नंतर नर्सने राजीच्या मदतीने तिचे स्पंजींग केले. कपडे बदलले. त्यामुळे ती अजुनच जरा फ़्रेश झाली. राजीला म्हणाली, " मामी कालपासुन माझे आई बाबा दिसले नाहीत ग कुठे. तु आणि या काकीच आहेत माझ्याजवळ. कुठे आहेत ग ते? मला एवढे लागलय अन ते मला पहायला का नाही आले ग? रागवलेत माझ्यावर? " राजी अवाकच झाली. किती शांत झालीय ही अन समजुतदारपणे बोलतेय. " लतिका बाळा तु विश्रांती घे बर आता. लागलय न तुला. मग बोलु आपण." " नाही ग मामी कालपासुन झोपुन झोपुन कंटाळा आलाय मला. अन मामी मला एक सांग राजेश मामा मनिषा मामी, आर्य आणि मनवा कुठे आहेत? " काय उत्तर द्यावे ते काही राजीला समजेना. ती म्हणाली, " बेटा तुला सांगते सारे काही. पण आता तु झोप बरे. " " नाही ग मामी मला नै झोप येत. आता मी बरी आहे. जरा दुखतय लागलय तिथे. पण तु फ़ुंकर मारतेस न मग बरे होऊन जाते सारे. तुला मी सांगते काल काय झाले ते. "

लतिका सांगु लागली..... मामी आम्ही इथुन निघालो. गाडीत सारेच गप्प होते. मी मागे आईच्या मांडीवर बसले होते. मामा मामी मनवाला घेउन पुढे बसले होते. आर्य आणि बाबा आईच्या शेजारी होते. घाट सुरु झाला आणि समोरुन ट्रक आला आणि त्याने गाडीला धडक दिली. मग आमची गाडी खाली खाली जायला लागली. आम्ही सारे ओरडत होतो. तेवढ्यात मी गाडीच्या बाहेर फ़ेकले गेले. मला खुप लागले होते मला उठता येईना. आणि समोर तर आग दिसायला लागली कसली आग मला समजेना. मला लागल्यामुळे मला उठताही येईना. मी आई आई म्हणुन हाक मारत होते ग पण कुणीच येईना. बर्‍याच वेळाने मग कुणी कुणी माणसे अस्पष्ट दिसायला लागली. कुणीतरी काकांनी माझा आवाज ऐकुन माझ्या जवळ आले आणि मला तेथुन उचलले एवढेच मला माहितेय. पण सांग न मी एकटीच कशी इथे बाकी सारे कुठे गेलेत? सांग ना मामी ... ए मामी सांग ना.......... राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. कसे काय सर्वांनी हे सोसले असेल देव जाणे. आणि हे पिल्लु बापरे.... तिने लतिकाला ‍हृदयाशी घट्ट धरले आणि ती रडु लागली. कसं काय हे सोसले असेल पोरीने देव अन तीच जाणे. लतिका बाळा आपले आबा देवबाप्पाकडे गेले न त्यांना भेटायला गेलेत ते. असे सांगुन ती मोकळी झाली. मनावरचे ओझे तर उतरले तिच्या पण लतिका हा आघात कसा सोसेल हे मात्र समजेना. सतिष सारखा फ़िरतीवर असल्या कारणाने तिला आईचाच सहवास जास्त होता. मामी कडून आई बाबा देवबाप्पाकडे आबांना भेटायला गेलेत हे समजल्यावर मात्र ती जरा शांत झाली. आणि पांघरुण घेऊन झोपली. म्हणजे नुसते डोळेच मिटले. राजीला वाटले आपण सांगायला नको होते. किमान आत्ता तरी नको. पण ज्या काकुळतीने लतिका विचारत होती ते पाहता तिला लगेच सांगणेच योग्य होते असे तिला वाटले. थोड्याच वेळात नर्सही आली आणि प्रतिभाही आली.नर्सशी बोलुन प्रतिभाने घरुन आणलेला मऊ शिरा लतिकाला खाऊ घालायची परवानगी घेतली. शिरा खाऊन झाल्यावर औषधेही तिने घेतली आणि औषधाने की काय पण ती थोड्यावेळात झोपी गेली. डॉक्टरही येऊन गेले. तिच्या जखमा आणि तिची रिकव्हरी पाहता तिला संध्याकाळी घरी घेउन जायला परवानगी दिली. घरच्या वातावरणात ती लवकर बरी होईल असे सांगितले. पोलीसांचा लतिकाला तसा काही त्रास झाला नाही. पण ती जेव्हा राजीला सांगत होती तेव्हा महिला पोलीस तिथे असल्याने त्यांनी सारे ऐकलेच होते. पोलीसांनी आणि तिने रिक्वेस्ट केल्याने दवाखान्याच्या अ‍ॅम्ब्युलन्सने संध्याकाळी लतिकाला घरी आणले. प्रकाश प्रतिभा बरोबर होतेच. घरी आल्यावर मात्र तिने आणलेले उसने अवसान गळुन गेले. लतिका हळु हळु चालत प्रतिभाच्या आधाराने आज्जीच्या खोलीत गेली. आणि आज्जीच्या गळ्यात पडुन रडु लागली. ते दृष्य़ पाहुन सारेच परत रडु लागले. चंदाही आईला बिलगली. शंकर तर चालते बोलते जिवंत प्रेतच जणु अशी अवस्था झाली होती. संध्याकाळी सात नंतर मनिषाच्या सासरची माणसे आली. आजीला पाहिल्यावर लतिका वार्‍याच्या वेगाने पण धडपडत आज्जीकडे गेली. सारेच वातावरण परत शोकाकुल झाले होते.
शंकरची अवस्था पाहता आजीनी कुणाचेही दिवसकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि सुमनच्या सासुसासर्‍यांना त्या म्हणाल्या तुम्ही काय करताय ते पहा. सतिष आणि सुमचे दिवसकार्य कुठे कसे करायचे ते तुम्ही सांगा. सतिषच्या भावाने सांगितले आम्ही चार सहा दिवसात  दिवसात निघु. लतिका तोवर बरी होईल सध्या येथील वातावरण पाहता तिला इथे ठेवणे योग्य होणार नाही. तसच त्यांच्या घरी जाऊन तेथील सामानाचे काय करायचे आणि घराचे काय करायचे याचाही विचार आत्ताच करायला हवा. कारण मला काही सारखे सारखे येणे जमणार नाही एवढ्या लांबुन. आणि आता आई बाबांना पण इथे एकटे ठेवणे शक्य नाही. माझ्या मुलांबरोबर लतिका वाढेल. आणि तसही माझ्या बायकोला लतिकाचा लळा आहेच. थोड्याच दिवसात सारे काही नॉर्मल होईल असा विश्वास आहे. त्याच्या म्हणण्याला त्याच्या आईवडिलांनी पण दुजोरा दिला. अन सारे काही तात्पुरते मार्गी लावुन आठ दिवसात लतिकाला आणि आई वडिलांना घेऊन सतिषचा भाऊ जयपुरला निघाला. जाताना लतिका मामी आणि आजी तसेच चंदा मिनी आणि गणेशच्या गळ्यात पडुन रडली. सारेच भावुक झाले होते.

हे सारे आठवताना राजी पुन्हा त्या अनुभवातुन गेली अन आपसुकच तिचे डोळे ओले झाले. एवढ्यात दरवाजा वाजला म्हणुन ती उठलीच. पाच वाजुन गेले होते. दोन माणसांनी शंकरला दरवाजापाशी आणुन सोडले. राजी बाहेर गेल्यावर " वहिनीसाहेब दादांना घ्या आत. " असे म्हणत ते दोघे निघुन गेले. फ़ुल्ल पिऊन आलेल्या शंकरला तिने गणेशच्या मदतीने आतल्या खोलीत आणुन झोपवले. एवढा आडदांड देह शंकरचा दोन चार वर्षात अगदी चिपाडासारखा झाला होता. आपल्या नवर्‍याकडे पहात असताना तिच्या मनात त्याच्याबद्दल फ़क्त माणुसकीचे भाव होते. ना राग ना लोभ, एक कुंकवाचा धनी बास. काय करणार न राग मनात धरुन? सारे आपल्याच नशोबाचे भोग आहे आणि ते आपल्यालाच भोगायला हवेत हा एकच विचार बास. मुलांकडे बघत जगायचे एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर तिने ठेवले होते त्यामुळे शंकरच्या बाबतीत सर्व भावभावनांच्या पलिकडे ती गेली होती. तिन्हीसांज झालीच होती. देवासमोर दिवा लावायला म्हणुन ती उठली. आणि मुलांना घेउन देवासमोर बसली. दिवा लावुन आणि नमस्कार करुन तिने तिघांनाही शुभंकरोती म्हणायला लावली आणि ती रात्रीच्या स्वैपाकासाठी उठली. सकाळी दादुने दिलेल्या पिठातील कणिक घेउन त्यातच तिखट मीठ घालुन त्याच्या पोळ्या केल्या. म्हणजे वेगळी भाजी नको. गरम गरम पोळी खाल्ली .कीभाजी नसली तरी चालेल असा काटकसरी हिशेब तिने केला. सासुसाठी एक भाकरी केली. त्याबरोबर थोडेसे ताक होते कालचे ते दिले. स्वताही चार घास खाऊन मुलांजवळ येउन बसली. चंदा आणि मिनी शाळेतील काही गमती जमती सांगत होत्या पण त्या तिच्या मेंडुपर्यंत पोचतच नव्हत्या. तिच्या मनाचा वारु भुतकाळात कुठल्या कुठे उधळला होता.

लतिका तिच्या काकाबरोबर गेली. पोचल्याचा फ़ोनही आला दोन दिवसानी. नुकत्याच घडलेल्या घटनांनी घर दार सारे हादरुन गेले होते. कुणी कुणाला सावरायचे हा प्रश्नच होता. शंकर तर अगदी दगडी पुतळा झाल्यासारखाच होता. झोप आली की झोपायचा. जाग आली की उठायचा. राजीच त्याला काही खाउ घालायची. हळु हळु धरुन बाथरुममधे नेउन आंघोळ घालायची. परशा असायचा मदतीला. पण त्यालाही फ़ार होत नव्हते. तो दाखवुन देत नव्हता पण खरे तर मनातुन खचला होता. त्याच्याच आधारावर राजी शंकरच्या बाबतीत जरा निर्धास्त होती. पण हे काही फ़ार दिवस नाही चालले. परशाचा मुलगा आला आणि आई वडिलांना सोबत घेउन गेला. त्यामुळे वाड्यात परशा आणि रखमाची सोबत होती एक आधार होता तो पण गेला.

जोवर परशा होता वाड्यात तोवर वाड्यावर फ़ार कुणी फ़िरकत नव्हते. पण परशा निघुन गेला आणि शंकरचे मित्रमंडळ हळु हळु त्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने वाड्यावर येऊ लागले. त्यांच्या येण्याने शंकरमधे थोडा थोडा बदल होऊ लागला होता. थोडा माणसात आला तो. जरा बोलु लागला. त्याच्या पुर्वीच्या रुटीनप्रमाणे हळु हळु सारे चालु झाले होते. सकाळचा व्यायाम, शेतावर जाणे, मुलांबरोबर खेळणे गप्पा मारणे, आईशी बोलत बसणे, तिची चौकशी करणे, मधेच आठवण आली की लतिकाला फ़ोन करुन तिच्याशी बोलणे. पण या सार्‍याला चार महिन्याचा अवधी गेला. चार महिन्यानंतर एकदा दोन मित्रांना घेउन राजेशच्या घरी जाऊन तेथील सामानाची विल्हेवाट लाऊन आला. म्हणजे जवळ जवळ सारे सामान कुणाला ना कुणाला तरी देऊनच टाकले. कपडे भांडी वगैरे आश्रमात दिले. अन ते घर राजेशच्या कंपनीच्या ताब्यात देऊन त्याच्या ऑफ़ीसची इतर सारी कागदपत्रांची पुर्तता करुन आला. या सार्‍याला आठ दिवस लागले. राजी आणि यशोदाआज्जी पण आता शंकर माणसात आला म्हणुन खुश होत्या. अन मुलेही बाबा बाबा करत त्याच्या अवती भवती होती. अशातच एक दिवस रात्री नऊच्या दरम्यान शंकर घरी आला ते झोकांड्या खातच. राजीला आणि मुलांना त्याचे हे रुप नविनच होते. तो आता आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. ती विमन्स्क अवस्थेतच. आज्जीला तेव्हा काहीच समजले नव्हते. पण सकाळी उठल्यावर राजीचे काहीतरी बिनसले आहे एवढे मात्र समजले. राजी अगदी गप्प गप्प होती. पण तिने राजीला काहीही विचारले नाही. कारण काय ते केव्हा न केव्हा कळणारच होते. एवढ्यात बाथरुममधुन शंकरच्या ओकार्‍यांचा आवाज यायला लागला. तिने गणेशला बोलवले आणि विचारले, " काय रे तुझ्या बाबाची तब्बेत बरी नाही काय रे ? " गणेश उत्तरला, " नाही ग आज्जी काल रात्री ते दारु पिऊन आलेत. त्यामुळे ओकार्‍या करत आहेत. " यशोदा आज्जी पण हादरलीच. नाही म्हणलं तरी आजवर विष्णुपंतांचा ते बोलले नाही कधी तरी धाक होता. मागे जेव्हा तो पिऊन आला होता त्याचवेळी आपल्या मुलाकडे त्यांनी अशा नजरेने पाहिले होते की काही बोलायची गरजच नव्हती. पण आता काय??? तिने त्याला आपल्या खोलीत बोलवुन घेतले आणि त्याला याबद्दल जाब विचारला. तेव्हा " आई अग मित्रांबरोबर गेलो होतो. त्यांनी जरा आग्रह केला म्हणुन थोडीशीच घेतली." त्या आपल्या लेकावर जरा रागवल्याच. " अरे ते मस्त आग्रह करतील म्हणुन काय तु लगेच ग्लास लावायचा का तोंडाला? हेच आम्ही संस्कार केले का? अरे जरा आपल्या वडिलांचा मान राख......................................... " असे बरेच काही बोलल्या. त्यावर तो काहीच न बोलता तिथुन उठला आणि बाहेर पडला. आता हे सारे नित्याचेच होऊन बसले. कुणाच्याच रागाला, अबोल्याला, प्रेमाला तो भिक घालत नव्हता. या दारुच्या नशेत त्याने कुठल्या कुठल्या कागदांवर सह्या केल्या हे एकतर तो जाणे आणि देवच जाणे. पण सारी शेती गेली. उत्पनाचे साधनच गेले आणि खायचे वांदे सुरु झाले. नशिब की घर राजीच्या नावावर केले होते. त्यामुळे निवार्‍याचा प्रश्न नव्हता. नाहीतर डोक्यावरचे छप्परही गेले असते तर मुलांना घेऊन कुठे जायचे हा प्रश्न निर्माण झाला असता. आता तर दारुसाठी शंकर घरातील सामानही हळु हळु घेउन जाऊ लागला होता. पैशाच्या बदल्यात सामान ठेवायचे आणि दारु पिऊन यायचे. अगदी वेळी अवेळी. शुद्धीत असेल तेव्हा जेवायचा आपल्या हाताने घेउन. फ़क्त एक मात्र होते की त्याने दारु पिऊन घरात धिंगाणा केला नव्हता की राजीवर मुलांवर हात उचलला नव्हता हीच काय ती जमेची बाजु म्हणता येइल. स्वैपाकघरात आता अगदीच जुजबी वस्तु उरल्या होत्या हेच का देशमुखांचे घर असा प्रश्न पडावा इतपत. कपाटातला एक दागिना बाहेर गेल्यावर मात्र राजीने शहाणपणा करुन फ़ोन करुन मोठ्या भावाला आणि वहिनीला बोलावुन घेतले आणि घरातले सारे किडुक मिडुक दागिने, चांदीच्या वस्तु त्यांच्या स्वाधिन केल्या. अन जपुन ठेवायला सांगितल्या. जोवर मी स्वता मागत नाही तोपर्यंत कुणालाही हे द्यायचे नाही असे बजावुन ठेवले. भाऊ ते सारे घेऊन गेला आणि आपल्या बहिणीचे हे धन त्याने बॅंकेत ठेवुन टाकले.
एवढा मोठा वाडा आता काय करायचा म्हणुन तिने वाड्यातल्या चारच खोल्या स्वताकडे ठेवुन बाकी दोन दोन खोल्यात तीन भाडेकरु ठेवले. किमान तेवढाच संसाराला हातभार. पण येणार्‍या दीड दोन हजारात काय काय भागवायचे? मुले मोठी होत होती. त्यांच्या गरजा वाढत होत्या. घरातल्या मिठ मिरचीलासुद्धा ते पैसे पुरेनात. मग कपडालत्ता, शाळेच्या सार्‍या वस्तु कुठे कुठे काय काय भागवणार? यशोदा आजीच्या जिवाचे पाणी पाणी होत होते राजीचे होत असलेले हाल पाहताना. एकदा अशीच वैतागुन तिरीमिरीत राजी बाहेर पडली. आणि काही घरात जाऊन कामाबद्दल विचारुन आली. पण देशमुखांची सुन आपण तिला कामाला कसे लावायचे हा विचार करत कुणीच कसलेही काम द्यायला तयार होत नव्हते. अगदी धुणी-भांडी ते स्वैपाक करण्याचीही तिची तयारी होती. पण छे. कुठेच काही जमत नव्हते. रडवेली होऊन ती घरी आली. आल्या आल्या सासुच्या कुशीत शिरुन ती रडु लागली आणि शांत झाल्यावर सारे सांगितले. सुनेची धडपड पाहुन तिला त्या न मिळणार्‍या यशाबद्दल तिला खुप वाईट वाटले. मुलांची रोजची उपासमार होऊ लागली. गणेश खुपच समजुतदार होता पण मिनी आणि चंदा लहानच होत्या तशा अजुन. भुकेने कळवळायच्या. शंकर काय या जगात असुन नसल्यासारखाच होता. त्याला कशाचीच शुद्ध नसायची. एके दिवशी आज्जी उठली अन सरळ दादुच्या गिरणीत गेली. गिरणीत कुणी नाही असे पाहुन तिने दादुला विचारले, " दादु तुझ्या गिरणीत आजुबाजुला पीठ पडते त्याचे तु काय करतोस रे? " दादु म्हणाला, " अग आज्जे मी ते बाहेर टाजुन देतो कारण थोडेफ़ार मिक्स झालेले असते नं.... मग येणारी जाणारी जनावरे ते खातात. का ग आज्जे असं का विचारतेस तु ? " आज्जी बोलाव की न बोलाव या विचारात होती. शेवटी धीर करुन तिने विचारलच, " दादु तुझ्या दोन्ही गिरण्या वेगवेगळ्या आहेत न रे? मग दोन्हीकडचे बाहेर उडलेले पीठ वेगवेगळे पिशवीत बांधुन देशील मला? " असे म्हणताना आज्जीच्या डोळ्यात पाणी भरुन आले होते. ते ती पुसत असताना दादुने पाहिलेच. " काय ग माय काय झालं ग ? तुझ्या डोळ्यात पाणी? "
" हो रे दादु, तुझ्यापासुन काय लपवायचे रे? तुला घरची परिस्थिती माहीती आहेच. अन्नाविणा मुलांचे हाल होत आहेत. राजी काम मागायला गावात फ़िरली पण देशमुखांची सुन म्हणुन कुणीही तिला काम द्यायला तयार होईना. मग काय करणार? म्हणून तुझ्याकडे आले. हे गोळा केलेले पीठ, तेवढच काहीतरी करुन घालता येईल मुलांना. " " आज्जे देईन मी तु काळजी नको करुस. सकाळी लवकर येत जा म्हणजे रात्री उशीरपर्यंत गिरणी चालु असते ते पीठ गोळा करुन ठेवत जाईन मी." अशा तर्‍हेने रोज आज्जी दादुकडुन पीठ आणु लागली. तेवढ्यात सुद्धा मुले खुश होऊ लागली. पण याची कसलीही फ़िकीर शंकरला नव्हतीच. आपला जिवनपट आठवता आठवता शंकरचा विचार करता करता राजीला केव्हा डोळा लागला समजलच नाही.

सकाळी तिला जाग आली तीच मुळी खुप उशीरा. आज्जी उठुन कामाला लागली होती. तिला उगाचच कानकोंडे झाले. " आई तुम्हाला बरे नाहीय तर कशाला उठला तुम्ही मला हाक मारायची नं... " " अग राजे कालच्या औषधाने मला खुप फ़रक पडलाय. अन काल तुला आजिबात झोप नव्हती लागली. रात्रीपण उशीरा झोपलीस. म्हणलं कशाला उठवायचे." राजी उठुन कामाला लागली. ज्वारीच्या पिठाची उपम्यासारखी उकड करुन सासुला आणि मुलांना खायला दिली. थोडी उकड शंकरसाठी ठेवुन तिनेही थोडे खाऊन घेतले अन ती स्वैपाकाला लागली. अधुन मधुन कुणी ना कुणीतरी जुन्या उपकाराची जाणीव ठेवत आणि यशोदा आज्जी आणि तिला वाईट वाटणार नाही याची काळजी घेत शेतातली पालेभाजी, फ़ळभाजी आणुन द्यायचे. ती ते पुरवुन पुरवुन वापरायची. भाडेकरुंच्या आलेल्या पैशातुन मीठ मिरची तेल तांदुळ असे काही बाही किरकोळ यायचे. ज्या घरात दुधाच्या घागरी असायच्या त्याच घरात विकतचे पावशेर दुध अन ते सुद्धा विकतचे यायचे. दिवस असेच चालले होते. गणेश मात्र चांगला अभ्यास करत होता. दुकानात कामही करत होताच. यंदा दहावी होती त्याची. तुटपुंज्या अभ्यासाच्या साहित्यावर आणि मित्रांनी दिलेल्या वह्या पुस्तके यांच्या मदतीने अन स्वताच्या मेहनतीने दहावीला तो बोर्डात पहिला आला. सगळीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण आता काय करायचे हे मात्र नक्की होत नव्हते. कारण एकच पैसा. त्याला स्वताला इंजीनीयरींगला जाण्यात इंटरेस्ट होता. पण फ़ी आणि बाहेरगावी रहायचे म्हणजे तो खर्च याचे गणित कसे जमणार याच विवंचनेत तो आणि राजी होते. गणेशचा मामा आणि मामी त्याचे अभिनंदन करायला आलेच होते तेव्हा त्यांच्याकडे राजीने विषय काढला. " दादा मला वाटते आता माझ्या दागिन्यांची गरज लागेल असे वाटतेय. काहीही झाले तरी मी माझ्या तीनही मुलांना चांगले शिकवणारच. गणेशला इंजीनीयरींगला जायचय. पण पैशा अभावी त्याचे ते स्वप्न मी धुळीस नाही मिळु देणार. "
" हो राजी, मी त्याच हेतुने आलेलो आहे तुझ्याकडे. म्हणल भाच्याचे अभिनंदनही करता येईल आणि तुझ्याशीही बोलता येईल."
" बर बोल काय म्हणतोस तु. "
" हे बघ राजी, गणेश पहिला आलाय बोर्डात तेव्हा त्याला कोणत्याही कॉलेजात अ‍ॅडमिशन मिळेल. गव्हर्नमेंट कॉलेजात जर त्याने डिप्लोमा इंजीनियरींग ला अ‍ॅडमिशन घेतली तर तीन वर्षात हा कोर्स पुर्ण होईल. अन तसही या कोर्सची फ़ी फ़ार नाहीय. ते मी देतो आत्ता. त्यासाठी दागिन्याला हात लावायची गरज नाही. आजवर आमची मदत तु कायमच नाकारत आलेली आहेत. मी काहीही बोललो नाही पण आता मात्र तुझे काहीही ऐकणार नाही. फ़ार तर कर्ज समजुन घे ही रक्कम आणि जेव्हा गणेश कमवायला लागेल तेव्हा मला परत कर. एवढे तरी ऐक माझे."
यशोदा आज्जीही तिथेच होत्या. त्यांनीही डोळ्यानेच होकार भरला. मग राजी त्यासाठी तयार झाली. शाळेतील एका शिक्षकांच्या मदतीने जवळच्याच शहरातील एका कॉलेजमधे डिप्लोमा इंजीनियरींगच्या सिव्हील विभागात त्याने अ‍ॅडमिशन घेतली. रहायची व्यवस्था मामीच्या बहिणीकडे झाली दोन महिन्यासाठी. त्याचे कॉलेज रुटीन चालु झाले. शहरातील वातावरणाची सवय झाली. त्या वातावरणाचा डोळे उघडे ठेवुन तो अभ्यास करु लागला. जिथे रहात होता त्यांच्या बरोबर काही बोलणे केले आणि एक निश्चय करुनच तो महिन्याभरात परत आपल्या गावी आला.
आईला हाका मारत म्हणाला, " आई आज्जी जरा इकडे या मला तुमच्याशी बोलायचेय." नाही म्हणले तरी महिन्याभरातल्या शहरी वातावरणाची छाप त्याच्या वागण्या बोलण्यात पडली होती. " आई ऐक मी काय म्हणतोय ते....... हे बघ आपण सारे शहरात शिफ़्ट होऊया. मी एका खोलीत रहात आहे. मामीच्या बहिणीकडे. त्यांच्याशी बोलुन मी अजुन एक खोली मिळवलीय. म्हणजे दोन खोल्या आहेत. आतच बाथरुम आहे पण संडास मात्र कॉमन आहे. मावशी त्यांच्या ओळखीने तुला काही कामे देतील. माझ्या काही मित्रांना डबे हवेत. ते तु घरी बनवुन द्यायचेस. आणि मावशी म्हणतात तिथे घरी जाऊन स्वैपाक करायचा. चंदा आणी मिनीच्या शाळेच्या अ‍ॅडमिशनची जबाबदारी मावशींचे मिस्टर घेतो म्हणालेत. आपण सारेच एकत्र राहु. मलाही घरचे जेवण मिळेल. आणि मुख्य म्हणजे बाबा. त्यांना तिथे जाऊन काही फ़रक पडतोय का बघु काही औषधे पण मिळतात म्हणे तिथे. आणि मुख्यतः त्यांची इथली संगत सुटेल." आपल्या लेकाचे हे आत्मविश्वासपुर्ण बोलणे ऐकुन राजी आणि गणेशची आज्जी भारावुनच गेल्या. काय तो निर्णय लगेच घेणे भाग होते. भावाशी फ़ोनवर बोलावे की काय असे तिला वाटले. आता घरात काही फ़ोन नव्हता. काही विचार करुन ती गणेशला म्हणाली, " बाळा तुझे म्हणणे मला पटतय पण एकदा मामाशी बोलुन बघुया का? " " चालेल आई, चल आपण गावात जाऊ आणि बुथवरुन लगेच फ़ोन करु." आज काय ते सोक्षमोक्ष लावायचाच याच उद्देशाने तो घरी आला होता. राजीने सासुकडे पाहिले. तिनेही डोळ्यानेच संमती दिली. मग तीने बुथवरुन भावाला फ़ोन लावला. तिनही भावांशी बोलली. भावांनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. दोघेही घरी आले. आणि मग दोन चार दिवसात सामानाची बांधाबांध करुन, मुलींचे शाळेचे दाखले काढुन घेउन शनिवारी  सकाळच्या पहिल्या गाडीने निघायचे असे ठरले. अर्थात सामान असे ते काय होते? एका पोत्यात भांडी कुंडी, एका ट्रंकेत सर्वांचे कपडे, आणि अंथरुण पाघरुणाची एक वळकटी बास. त्याला तासभर फ़ार फ़ार तर दोन तास बास होते. मुख्य काम होते ते शाळेच्या दाखल्याचे. ते काम गणेशने पुढच्या दोन दिवसात केले. या कशाचीही खबर शंकरला नव्हती. शुक्रवारी मात्र गणेशने गोड बोलुन शंकरला घरातच गुंगवुन ठेवले. बाहेर जाऊ दिले नाही. राजी पण त्याच्याशी नीट बोलली. बर्‍याच वर्षानी सारे एकत्र जेवले त्या दिवशी. उद्या आपण गावाला जायचेय असे त्याला सांगुन ठेवले. भाडेकरुंना पण कल्पना देऊन ठेवली. आणि भाड्यासाठी महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कुणी ना कुणी येईल अर्थातच गणेश किंवा राजी. तेव्हा भाड्याचे पैसे तयार ठेवावेत असे सांगितले.

शनिवारी पहिल्या एसटीने सारीजण शहरात रवाना झाली. पोचयला ११ वाजुन गेले. मावशींनी सार्‍यांचाच स्वैपाक तयार ठेवला होता. खोलीमधे सामान ठेवुन मावशींकडेच सारे जेवले. दुपारी जरा विश्रांती झाल्यावर मुली आणि सासुच्या मदतीने सारे सामान लावले. घरातला असलेला शिधाही बरोबर आणला होता. पण मावशींनी बजावले होते दोन तीन दिवस नका स्वैपाक करु. मी येथुन जेवण देते. दोन दिवसात जरा सेट व्हा. कामाचेही बघु. अन मग सुरुवात करा तुम्ही. रविवारी मावशींनी त्याच्या किराणावाल्याशी बोलुन या कुटुंबाला महिन्याला पुरेल असा किराणा उधारीवर घेउन दिला. आणि तुमचे रुटीन बसले की मग आमचे भाडे द्यायला लागा असे सांगितले. राजीला खरच त्या देवदुतच वाटल्या. मुलीही जरा हरकल्या होत्या. पण नवी शाळा नव्या मैत्रिणी कसे काय जमणार या काळजीत होत्या. अर्थातच दोघीही जग्न्मैत्रिणी होत्या. कुणाशीही पटकन सुर जुळायचे दोघींचेही. मावशींच्या मिस्टरांनी बोलुन ठेवले होतेच त्यामुळे लगेचच सोमवारपासुन शाळाही सुरु झाली. त्यांच्या ओळखीने शाळेतुनच जुने युनिफ़ॉर्म आणि पुस्तके मिळाली. वह्याही मिळाल्या पण त्याचे मात्र पैसे द्यावे लागणार होते. पण ते त्यांनी स्वता भरले. मिनीची शाळा सकाळची होती तर चंदाची शाळा दुपारची. गणेशचे ही कॉलेज चालु झाले. मावशींबरोबर जाऊन राजीनेही आपली कामे फ़िक्स करुन टाकली. मंगळवारपासुन ती कामे पण चालु झाली. यशोदा आज्जीला हे सारे राजीच्या चांगल्या कामाचेच चांगल्या वागण्याचेच अन ति घेत असलेल्या कष्टाचे फ़ळ आहे असे मनोमन वाटत होते.

यशोदा आज्जी घरचे सारे काम बघायची आणि त्यामुळेच राजीनेही अजुन चार कामे वाढवली. राजीच्या हाताला चांगली चवही होतीच त्यामुळे तिला सणावाराच्याही ऑर्डर मिळु लागल्या. आता चार पैसे हातात रहात होते. त्यामुळे मनासारख्या चार गोष्टी मुलांसाठी ती करु शकत होती. मावशींच्या वाड्यातील तिच्या शेजारीच राहणारे एक बिर्‍हाड नोकरीनिमित्त्य घर सोडुन गेले होते. तिने त्या दोन खोल्यांबद्दल मावशींना विचारले. आणि त्या दोन खोल्याही तिने भाड्य़ाने घेतल्या. मुली मोठ्या होत होत्या. गणेशलाही अभ्यासाला स्वतंत्र खोली असावी असे तिला वाटत होते. आत्ताच्या दोन खोल्यात नाही म्हणल तरी अडचण व्हायची पण इलाजच नव्हता. पण आता तसे नव्हते.... या सात आठ महिन्यात राजीने आपल्या मेहनतीने आणि काटकसरीने गाठीला चार पैसे गोळा केलेले होते. आणि मुळात तिला आता चांगलाच आत्मविश्वास आला होता. आपण याआधीच का गाव सोडले नाही असे वाटले. अन हे असे वाटायचे कारण म्हणजे शंकर. या सात आठ महिन्यात त्याने दारुला स्पर्शही केला नव्हता. नाही म्हणले तरी पहिला महिनाभर अस्वस्थ होता तो. तलफ़ यायची त्याला नाही असे नाही. पण मावशींच्या यजमानांना म्हणजे शिवरामपंतांना सारे काही माहिती होते. आता मुलगाच सारा धंदापाणी संभाळत असल्याने ते तसे घरातच असायचे त्यामुळे शंकरकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. तो कुठे बाहेर जायला निघाला तरी एका माणसाला त्याच्या मागावर सोडायचे. पण शंकरनेही त्याला काय वाटले कोण जाणे पण शहरात आल्यापासुन दारुच्या दुकानाची पायरी चढली नाही. बाहेर पडला की तो देवळात दोन दोन तास बसायचा आणि घरी यायचा. घरी आला की आईने वाढुन दिलेले जेवून झोपायचा. असच एकदा दरवाजात बसलेल्या शंकरला बघुन शिवरामपंतांनी हाक मारली. " या शंकरराव... बसुया जरा गप्पा मारत. " शंकरही जरा बुजतच त्यांच्याकडे गेला. शंकरला बोलता ठेवत त्याच्याकडुन सारी माहिती काढुन घेतली. शेतीवाडी कशी गेली. त्याला काय काय काम येते तसेच त्याचे शिक्षण किती वगैरे वगैरे. शंकर ही गावातील बडी असामी होती हे माहित असल्याने विचारु का नको या विचारात असलेल्या शिवरामपंतांनी शेवटी शंकरला विचारलेच. " शंकरराव तुम्ही मोठी असामी होतात गावातील पण सारे होत्याचे नव्हते झाले. बर आता झाले ते झाले. त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. गेले महिनाभर मी तुमचा अंदाज घेतोय. मी काही काम दिले तुम्हाला तर तुम्ही कराल? " शंकरचे डॊळे लकाकले. तसही त्याला आता लाज वाटत होती घरी बसुन खाण्याची. बायको कमावतेय आणि आपण आयते खातोय हा विचारांचा भुंगा गेले काही दिवस त्याला स्वस्थ बसु देत नव्हताच. त्याने काय काम आहे हे न विचारताच लगेच होकार भरला. मग शिवरामपंतांनी मुलाशी बोलुन त्यांच्या कारखान्यातील एका युनीटवर लक्ष ठेवायचे काम त्याच्यावर सोपवले. सुरुवातीला त्या युणीटचे कामगार वेळेवर येतात का नाहीत, काम चोख करतात का, काम करताना मधेच थांबुन गप्पा मारतात का अशी जुजबी कामे सोपवली. महिन्याभरात त्याचे कितपत लक्ष आहे कामावर हे पाहुन खुश झालेल्या शिवरामपंतांच्या मुलाने सुजयने त्या युनीटचे अजुन काही काम सोपवले. शेतावर गड्यांकडुन गोड बोलुन प्रसंगी कठोर वागुन काम करवुन घेण्यात शंकर वाकबगार असल्याने त्याला हे फ़ारसे अवघड वाटले नाही. आणि अशा तर्‍हेने त्याचा वेळही जाऊ लागला आणि चार पैसेही हाती आले. आणि सुजयला घरचा हक्काचा विश्वासु माणुस मिळाला. पहिला पगार हातात आल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रु आले. थोडे दुखाश्रु थोडे आनंदाश्रु. दुखाश्रु या साठी की लाखोत लोळलेल्या शंकरला अशी नोकरी करावी लागत होती. जे होते ते आपण दारुत सारे घालवले. आणि आनंदाश्रु या साठी की आता आपण बायकोला जरा हातभार लावु शकु. पहिला पगार बायकोच्या स्वाधिन केल्यावर राजीला पण मनापासुन आनंद झाला. आणि यशोदा आज्जी???? ती तर मागचे सारे विसरुन त्याच्याशी धरलेला अबोला सोडुन आनंदली. त्याची अलाबला घेतली. आता या सुखाला कुणाची दृष्ट नको लागायला असे म्हणत त्याला जवळ घेतले. अन तोही लहान मुलासारखे आईच्या कुशीत शिरुन रडु लागला. तिनेही त्याला थांबवले नाही.

गणेशही डिप्लोमा फ़र्स्टक्लास मधे पास झाला. मिनी दहावी झाली होती. आणि चंदाही सातवीत गेली होती. चंदा जात्याच हुशार होती त्यामुळे चौथीत तिने स्कॉलरशीप मिळवली होती. आता सातवीतही ती मिळवायची याचा निर्धार केला होता. सर्वांचेच या तीन चार वर्षात छान रुटीन बसले होते. राजीच्या फ़राळाच्या पदार्थांना दिवाळीत खुप मागणी असायची. राजीही मग अशीच एक गरजु बाई मदतीला घेउन सारे काही पार पाडत होती. सासुची मदत असायचीच. अधुन मधुन गावदेवीच्या जत्रेला शंकर सोडुन सारे जात होतेच. तो नाही म्हणायचा तिकडे जायला अन कुणी आग्रहपण करत नव्हते. न जाणो त्यावेळचे ते मित्र परत भेटले अन परत सारा प्रकार चालु झाला तर???...... घरचे भाडे येत होतेच पण एक वेगळा तापही चालु झाला होता. खोल्या सोडायला कुणी तयार नव्हते. आहे ते आम्ही विकत घेतो जो काय असेल बाजारभाव त्याने आम्हाला द्या असे तीनही कुळे म्हणत होती. राजी आणि यशोदा आज्जीने विचार करुन गणेशशी आणि शंकरशी बोलुन काय असेल तो विषय मिटवुन टाकावा असे ठरवले. त्यानुसार आहे ते सगळेच घर विकुन टाकले आणि गावचा संबंधच संपवुन टाकला. चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणीच जास्त असल्याने कुणालाही त्याबद्दल फ़ारसे वाईट वाटले नाही. आलेले पैसे चंदा आणि मिनीच्या नावे बॅंकेत ठेवले. त्यांच्या लग्नाला उपयोगी येतील म्हणुन.

गणेशलाही डिप्लोमा झाल्यावर लगेच चांगला जॉब मिळाला एका बिल्डरकडे. पण त्याचे डिगरी करुन स्वताचा बिझनेस चालु करायचा असे स्वप्न होते. पण डिगरीला लागणारा पैसा आणणार कुठुन? त्यामुळे त्याने जॉब पत्करला. समर्थ असोसिएटस च्या मालकांना बापु कुलकर्ण्यांना ही कल्पना होती. त्याचे वर्षभरातले काम बघुन आणि त्याची डिगरी करायची इच्छा बघुन ते म्हणाले तुझ्या डिगरीला मी मदत करतो पण तु माझ्याकडचा जॉब नाही सोडायचास. काही विचार करुन आणि आईशी बोलुन त्याने डिगरीला अ‍ॅडमिशन घेतली. वेळ मिळेल तसे साईट्स वर जाणे. मालकांना त्यांच्या कामात मदत करणे हे कॉलेज संभाळत चालुच ठेवले. डिगरीला तो युनिव्हर्सिटीत तिसरा आला. सर्वांनाच आनंदी आनंद झाला.

राजीने मावशींना विचारुन त्यांच्या घराच्या टेरेसवर छोटी पार्टी ठेवली होती. घरी पुजाही घातली होती. सारा स्वैपाक तिने स्वता जातीने बनवला होता. मावशी त्यांच्या घरचे, बापु कुलकर्णी आणि त्यांच्या घरचे तसेच आई वडील, आपले तीनही भाऊ आणि तीनही वहिन्या आणि भाचरे यांना बोलावणे केले. लतिकाशीही अधुन मधुन संपर्क असयचाच पण ती जयपुरला असल्याने ती आणि तिच्याघरची काही आली नाहीत. पण आमच्या खुप खुप शुभेच्छा आहेत असे त्यांनी कळवले. संध्याकाळी सारेच टेरेसवर जमले. सर्वांनी गणेशला शुभेच्छा दिल्या. काही गिफ़्ट्स दिले. या सार्‍यात एक नवा गोड चेहरा मात्र गणेशला चांगलेच निरखत होता. बापु पुढे झाले आणि त्यांनीही गणेशला शुभेच्छा दिल्या. आणि ते बोलु लागले, ’ गणेश हा एक मेहनती मुलगा आहे. तसेच तो एक उत्तम बिझनेसमन होऊ शकेल ही माझी खात्री आहे. त्याच्यासारखा मोठ्यांना मान देणारा, हुशार आणि निगर्वी मुलगा मी अजुनपर्यंत पाहिला नाही. कॉलेजच्या काळात अनेक प्रलोभने समोर येत असतात. त्यात बरीच मी मी म्हणणारी मुले वाहुन जात असतात. पण हा मुलगा काही औरच आहे. अभ्यास एके अभ्यास करत याने सर्वातच सरशी मारली आहे. माझे त्याच्यासाठी असलेले गिफ़्ट म्हणजे माझा सारा बिझनेस त्याने संभाळुन आता मला विश्रांती द्यावी. तसेच राजी वहिनी आणि शंकर भाऊ तुम्हाला आणि गणेशलाही पसंत असेल तर माझ्या मुलीचा रेवा चा तुम्ही स्विकार करावा. माझी रेवाही चांगली शिकलेली आहे. सी ए करतेय. या बिझनेसमधे त्याला उत्तम साथ देईल. पण अर्थातच तुमचा नकार असेल तरी माझा गणेशला बिझनेस सुपुर्द करायच्या निर्णयात माघार नाही हे पण लक्षात असु द्या. तुम्ही विचार करुन सांगा. " त्यांनी असे म्हणल्यावर मग गणेशचे आणि इतर सार्‍यांचेच लक्ष रेवाकडे गेले. सर्वांनाच ती आवडली. पण गणेशने स्पष्ट शब्दात तिच्याशी आणि बापुंशी आधी बोलेन अन मगच माझा निर्णय सांगेन असे सांगिअतले आणि ते सर्वांनाच मान्य झाले. हसत खेळत जेवणे झाली. सर्वांचे तृप्त चेहरे पाहुन राजीचेही समाधान झाले.

गणेशनेही बापुंशी आणि रेवाशी बोलुन आपल्या सार्‍या शंका क्लीअर करुन घेउन होकार दिला. आणि महिन्याभरातच रेवाने गणेशच्या घराचे माप ओलांडले. भावाकडुन आपले दागिने मागुन घेउन त्यातील मुलींसाठी काही शिल्ल्क ठेवुन आणि लतिकाला काही दागिने आजोळची भेट म्हणुन देउन बाकी सारे रेवाच्या स्वाधीन केले. हो लतिका आज कितीतरी वर्षांनी आपल्या आजोळी आली होती. गणेशच्या लग्नासाठी. कितीतरी वर्षांनी ती आपल्या मामा मामीला आज्जीला आणी भावंडांना भेटत होती. सुमन, सतीष, राजेश मनिषा आर्य आणि मनवा यांच्या आठवणीने सारेच हेलावले होते. मोठी झालेली लतिका अगदी सुमनची कार्बन कॉपीच वाटत होती. ती मुद्दाम पंधरा दिवसाची सवड काढुनच आली होती. आपल्या मामा मामीशी आणि भावंडांशी आणि आता झालेल्या नव्या वहिनीशी खुप खुप बोलायचे होते.  यथावकाश गणेशने आपले स्वताचे मोठे घर घेतले. मिनी आणि चंदाचेही योग्य स्थळी लग्न करुन दिले. लतिकालाही कुणी कशाचीही उणीव भासु दिली नाही.... ना आजोळच्या घराने ना तिच्या काका काकुंनी आता पुर्वीच्या दुःखाचे सावटही कुणाला नको होते. पण आठवणी ह्या आठवणीच असतात कधी कधी चोरपावलाने यायच्याही पण सारे सुख पाहुन मागच्या पावली परत फ़िरायच्या. सारे सुख पाहुन अशोदा आज्जीनेही सुखासमाधानाने या जगाचा निरोप घेतला होता. शंकरही आता तो जे युनीट चालवत होता त्याचा मालक झाला होता. पण राजीने मात्र अजुनही आपले काम चालु ठेवले होते. ज्यामुळे आपण आज इथवर पोचलो ते काम बंद करणे तिला शक्य नव्हते रादर ते कृतघ्नपणाचे वाटले असते. म्हणुन तिने ते चालु ठेवायचा निर्णय घेतला होता. अर्थात कुणाच्या घरी जात नव्हती ती स्वैपाकाला. पण जवळच जागा घेऊन एक युनीट तिने चालु केले होते. अजुन काहीजणींना रोजगार मिळेल म्हणुन म्हणुन आहे ते काम थोड्या मोठ्या प्रमाणात चालु केले होते. त्यावर १० जणींची कुटुंबे चालत होती.
गणेश अणि रेवाही खुप आनंदात होते. जास्त करुन रेवा. कारण आईसारखी माया करणारी सासु आणि बापुंसारखेच प्रेमळ सासरे शंकरच्या रुपात मिळालेले असताना तिला अजुन काय हवे होते? गणेश, मिनी, चंदा आणि लतिका कायम एकमेकांच्या संपर्कात रहात होते. आपल्या मुलाबाळांसहीत कधी मधी एखादे गेटटुगेदर करत होते. अन हे सारे राजी अन शंकर आनंदाने अनुभवत होते. सुख सुख म्हणतात ते हेच अन या सुखाला आता कुणाचीही दृष्ट नको लागायला असे म्हणत मनोमन देवाला नमस्कार करत होते.

गुरुवार, १७ जुलै, २०१४

भेट तुझी माझी



ही माझी पहिलीच कथा आहे आणि कथा  पुर्णतः काल्पनीक आहे. सदर कथेत घातलेल्या काही कविता या आंतरजालावरील मला आवडलेल्या  कवितांपैकी आहेत.


अनुराधा आज खुप खुश होती. आज सध्याकाळी तिला हर्षीत भेटणार होता फ़ायनली. हो फ़ायनलीच म्हणायला हवे. गेले दोन ते अडीच वर्षे ते एकमेकांच्या संपर्कात होते. कधी फ़ोनवरुन तर कधी सोशल साईट्स वर. आज ऑफ़ीसला जाताना कोणत्या रंगाचा ड्रेस घालावा याबाबत ती खुप कन्फ़्युज झालेली होती. कारण ऑफ़ीसमधुन परस्परच ती हर्षुला भेटायला जाणार होती. हर्षुला कोणत्या रंगाचा ड्रेस जास्त आवडेल यावर विचार करुन करुन ती जाम थकली, कारण त्याला सगळेच रंग आवडतात असे त्याने एकदा बोलताना सांगितलेले. या विचारातच ती त्याची अन आपली ओळख कशी अन कुठे झाली यात हरवुन गेली.

आपले ग्रॅज्युएशन संपवुन अनु नुकतीच एके ठिकाणी नोकरीस लागली होती. ग्रॅज्युएशन करता करता कंप्युटर्सचे छोटे मोठे कोर्सेस पण केले होते त्यामुळे तिला एका छोट्या फ़र्म मधे नोकरी मिळायला फ़ारशी काही अडचण आली नाही. फ़र्म छोटी असल्याने बहुविध कामे तिला करायला लागायची. पण मुळातच कष्टाळु असलेल्या अनुला कोणत्याच कामाचा बोजा वाटला नाही की कोणतेही काम शिकायला कमीपणा वाटला नाही. सुरुवातीचे काही दिवस ती फ़ोन अटेंड करणे, फ़र्म मधे असलेल्या लोकांची हजरी मांडणे, वेळ पडल्यास बॅंकेत जाणे, आलेले अन जाणारे कुरीयर पहाणे आणि त्याच्या नोंदी ठेवणे एवढेच काम ती करत होती. पण तिच्या कामाचा उरक आणि ग्रास्पींग कपॅसिटी पाहता तिच्यावरच्या कामाची जबाबदारी वाढु लागली. अन आधीची किरकोळ कामे नव्याने आलेल्या मुलीवर सोपवली गेली. थोडक्यात अनुचे प्रमोशन झाले ते ऑफ़ीसर म्हणुनच. ऑफ़ीसर झाल्यावर अर्थातच टेबलवर कंप्युटर आला त्याला नेट कनेक्षन आले. बर फ़र्म काही फ़ार मोठी नसल्याने मोठ्या कंपन्यांमधे जसे सोशल साईट्स बॅन असतात तसे काहीच नव्हते. पण अनुने अजुन तरी आपले कोणत्याच सोशल साईटवर अकाउंट काढले नव्हते.

अशातच एकदा आपली कामे संपवुन खुर्चीत मागे मान टाकुन निवांत बसलेली असतानाच तिचा फ़ोन वाजला. फ़ोन होता कविताचा...

"हाय अनु कशी आहेस? अन आहेस कुठे तु काहीच संपर्क नाही ग आपला बरेच महिन्यात.".... इती कविता

कविताचा आवाज ऐकुन अनुचे मन काही क्षण कॉलेजचा फ़ेरफ़टका मारुन आलेच...

"हाय कवे मी मस्त मजेत आहे, तु कशी आहेस ग??? माझ्या नोकरीमुळे कुणालाच भेटायला फ़ारसे जमत नाही ग. अन तुला माहीतच आहे आईची तब्बेत बरी नसते त्यामुळे सुट्टीचा दिवस मी पुर्णवेळ आईसमवेत असते. माझ्याशिवाय कोण आहे ग तीला??? बाबा अन दादा एका कार अपघातात गेले हे तुला माहिती आहेच. त्या दोघांच्या आठवणीने ती थोडी हळवी झाली क्षणभर. बाकी बोल आज कशी काय आठवण आली माझी?"

अग अनु तुझा कुणाशीच काही कॉंटॅक्ट नाही ना अन आपला ग्रुप नेहमीच तुला मिस करतो म्हणुन आम्ही सगळ्यांनी ठरवलय की अगदी नेहमी भेटायला जरी नाही जमले तरी आपण सोशल साईट्सच्या माध्यमातुन एकमेकांच्या संपर्कात राहु. तेवढच तुलाही तुझ्या नेहमीच्या रुटीनमधे बदल होईल."

अनुला अजुनही तिच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध होत नव्हता.

" कवे म्हणजे ग काय???"

"अग बयो आम्ही फ़ेसबुक आणि ऑर्कुटसारख्या सोशल साईट्सवर खुप धमाल करतो. कधी एकमेकांना मेसेजेस पाठवुन संपर्कात राहतो तर कधी ग्रुपचॅट मधे मजा मस्ती करतो. ए अनु तु पण ये ना ग या सोशल साईट्स वर."

अन अशा तर्‍हेने अनुचा ऑर्कूट आणि फ़ेसबुकवर श्रीगणेशा सुरु झाला. आणि अनु तिच्या ग्रुपच्या परत संपर्कात आली. अशा तर्‍हेने एकमेकांशी संपर्क ठेवणे यात तिला खुप मजा वाटु लागली. कविता बरोबरच सुलु, आशु, मिनी, अंकीता, मनोज, राहुल, प्रसाद, दिपक, अनुज असे सारेच नेहमीच ऑनलाईन भेटु लागले. आपल्या कामाची सांगड घालत तिचा दिवसातला थोडा वेळ मस्त मजेत जाऊ लागला. या सर्वांबरोबरच मित्रांचे/ मैत्रिणींचे मित्र/ मैत्रिणी पण तिला रिक्वेस्ट टाकुन आपली मैत्रिण बनवु लागले. पण अर्थातच आपल्या ग्रुपपैकी कॉमन फ़्रेंड कोण आहे का हे मात्र ती आवर्जुन बघत होतीच. असेच काही दिवस गेले अन एक नवी रिक्वेस्ट आली. म्युच्युअल फ़्रेंडस मधे कोणीच नव्हते. काय करावे हे समजेना तिला... आलेल्या रिक्वेस्ट स्विकारताना खुपच चोखंदळ असायची अनु. तब्बल ३ आठवडे गेल्यावर तिने रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. ते सुद्धा त्या व्यक्तीचा मेसेज आल्यावरच. " काय हो फ़्रेंड रिक्वेस्ट स्विकारायला एवढे दिवस तर आयुष्याचा जोडीदार शोधायला किती वेळ घ्याल???"  मनाशीच ती विचार करते होती की साउंड्स इंटरेस्टीग... छान पर्सनॅलिटी दिसतेय. बघुया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट तरी करुया. अगदीच तसं काही वाटलं तर आपल्या लिस्ट मधुन काढुन टाकायचे. अशा रितीने हर्षीत तिच्या फ़्रेंड लिस्ट मधे आला.

सुरुवातीला काही दिवस मेसेज मधुन बोलताना दोघेही एकमेकांना अहो जाहो च्या औपचारीकतेने बोलत होते पण ही औपचारीकता केव्हा गळुन पडली ते दोघांना पण समजले नाही. या बोलण्यातुन एकमेकांच्या बद्दल जुजबी माहिती दोघांनाही झाली होती. हर्षीत एका फ़ॉरेन कोलॅबरेशनच्या आय टी कंपनीत मॅनेजर पदावर होता. अगदी वयाच्या २६ व्या वर्षीच त्याने हे पद त्याच्या हुशारीने आणि मेहनतीने कमावले होते. सोशल साईट्सवर अधुन मधुन यायचा तो. अन असच एकदा सर्फ़ींग करता करता अनुच्या डिपी ने त्याचे लक्ष वेधुन घेतले होते. एक अतीशय सुंदर असा सुर्योदयाचा टिपलेला फ़ोटो तिच्या डिपीवर विराजमान होता. मेसेजमधुन बोलता बोलता एकमेकांचा चॅट आयडी मागुन घेउन आता दोघेही चॅटवर बोलु लागले होते. खुप वेगवेगळ्या विषयावर दोघेही वेळ मिळेल तसे गप्पा मारत रहायचे पण अर्थातच आपापली कामे संभाळुनच.

सहा महिने होऊन गेले होते दोघांची ओळख होऊन. दोघांनाही एकमेकांशी बोलल्या वाचुन चैन पडत नव्हते एवढी सवय झालेली एकमेकांना. आज अनुराधाची राधा झाली होती तर हर्षीतचा हर्षु झालेला. ऑफ़ीसमधे आल्यावर कंप्युटर चालु करुन चॅट विंडो ओपन करुन पहिला गुड मॉर्नींगचा मेसेज एकमेकांना पाठवला जायचा. स्टेटस कसेही असो. अनु आलेली असो वा नसो. अनुचे ऑफ़ीस टायमींग १० चे असल्याने साहजीकच ती हर्षीत ऑनलाईन आल्यानंतरच यायची. अनु आल्यावर हर्षीतचा ऑफ़लाइन मेसेज बघुन आनंदीत व्हायची. अन मग ती पण तिथे विश करायची. मग आपापली कामे बघत अधुन मधुन एखाद दुसर्‍या वाक्याने संवाद चालु रहायचा ते साधारण दोन वाजे पर्य़ंत. दोन नंतर दोघेही तसे थोडेफ़ार मोकळे व्हायचे. अन मग छान गप्पा चालु व्हायच्या. आजवर दोघांनीही खरे तर फ़ोटोत पण एकमेकांना पाहिले नव्हते की सेलफ़ोन नंबर पण एक्सचेंज केले नव्हते. अशातच दोन तीन दिवस अनु आई जास्तच आजारी असल्याने ऑफ़ीसला गेलीच नाही. त्यामुळे हर्षीतला ती चॅटवर भेटलीही नाही. काही काम असु शकेल म्हणुन त्याचे पहिल्या दिवशी फ़ारशी काळजी केली नाही. पण दुसर्‍या दिवशी पण ती भेटली नाही म्हणल्यावर त्याला उगाचच अस्वस्थ वाटु लागले. तिच्या काळजीने तो बेचैन झाला. कामात लक्षही लागेना. बर तिचा नंबर नसल्याने तिचा काहीच अतापता समजेना. असे तीन दिवस गेले. अन या तीन दिवसातले त्याचे सगळे ऑफ़लाइन मेसेजेस बघुन ती पण बेचैन झाली. ही बेचैनी कसली हे समजेना. अनु तीन दिवस नसल्याने आजही ती येते का नाही कुणास ठाऊक म्हणून त्याने आज चॅटवर काहीच मेसेज टाकला नव्हता. पण अनुनेच सकाळची कामाची गडबड आवरुन १२ ला त्याला मेसेज टाकला की मी आज आलेय पण तुफ़ान कामे पेंडींग आहेत आपण लंच नंतर बोलुयात का? तिचा मेसेज बघुन तो हरकुन गेला आणि म्हणाला राधा काही हरकत नाही, टेक युवर ओन टाईम, फ़्री झालीस की बोल. पण मला हे सांग आधी की तु कशी आहेस? तुझी तब्बेत कशी आहे? त्यावर अनुने रिप्लाय टाकला मी ठीक आहे रे अन माझी तब्बेत पण उत्तम आहे. कामे निपटुन येतेच मी थोड्यावेळात.
अनु : " हाय हर्षु, बोल आता..."
हर्षु : अग काय हे कुठे पत्ता होता तुझा. तीन दिवस नव्हतीस तु तर ते मला तीन वर्षासारखे वाटले. किती मिस केले तुला मी. असे मला न सांगता गैरहजर रहात जाउ नकोस बाई तु."
अनु : "अरे अरे अरे !!! थांब थांब जरा..." अरे त्या दिवशी घरी गेले अन आईची तब्बेत जरा जास्तच बिघडली. तुला तर माहितीच आहे बाबा आणि दादा एका कार अपघातात गेल्यापासुन आईची मानसीक अवस्था थोडे नाजुकच झालीय. त्यात त्या दोघांचे पहिलेच वर्षश्राद्ध परवा होते त्याची पण सारी तयारी मला एकटीलाच करायची होती. मी खरे तर तुला सांगणार होते पण एक दिवस आधीच जास्तीची रजा अचानक पडल्याने तुला काहीच सांगता आले नाही. बर फ़ोन करावा तर आपले नंबरही एकमेकांकडे नाहीत.
हर्षु : "ओह...!!! सॉरी राधा... पण काय करु ग तुझ्याशी बोललो नाही तर चैन नाही पडत ग. बर माझा नंबर घे म्हणुन त्याने स्वताचा मोबाईल नंबर तिला दिला अन सांगितले जेव्हा तुला वाटेल की आपला नंबर द्यायला हरकत नाही तेव्हा तु मला तुझा नंबर देउ शकतेस. मला कधीही फ़ोन कर."
अनु : थॅंक्स हर्षु.

एवढ्या संवादानंतर अचानकच त्याला साहेबाने बोलवले म्हणुन " आलोच ग थोड्या वेळात बॉस हाका मारुन राहिलाय. " असे सांगुन तो चॅटवरुन ऑफ़ झाला. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. थोडीशी हिरमुसली होऊन ती ऑफ़ीसमधुन बाहेर पडली.

दुसर्‍या दिवशी तिने ऑफ़ीसला आल्यावर त्याचा मॉर्नींग मेसेज आहे का पाहिले. पण आज तो मेसेज नव्हताच. वाट बघुन तिने शेवटी १२ च्या दरम्यान, " हाय हर्षु, कुठे आहेस रे तु? किती वाट पहायची माणसाने?" असा मेसेज टाकला. त्यावर तब्बल एक तासाने उत्तर आले. " ओहो...!!! कुणीतरी आपली वाट पहातय ही भावनाच किती सुखकर असते नै?" राधे मी पण अशीच वाट पाहिली ग परवा. रोज बोलणारे आपण एक दिवस जरी बोललो नाही तर कसतरीच होतं गं. तुला नाही असे वाटतं?" अन हो म्हणत राधानेही कबुली देउन टाकली.
"  राधे ऐक नं जरा. समजा मी अचानक तुझ्या ऑफ़ीसमधे तुझ्या समोर आलो तर?"
"  अरे कधी येणारेस?"
"  ए वेडाबाई, समज मी आलो तर? असे विचारतोय ग. कसे स्वागत करशील माझे?"
राधा क्षणभर शांतच राहिली.
"  का ग नाही करणार का स्वागत माझे? मी आलो भेटायला तर आवडणार नाही का?"
"  नाही नाही रे तसं नाही हर्षु, मला तुला भेटायला आवडेल पण असे अचानकच तु विचारल्याने मी भांबावलेय रे. नेटवर भेटलेल्या अशा कोणाही व्यक्तीला मी अजुन प्रत्यक्ष भेटलेले नाहीय. माझ्या लिस्टमधे सारे माझ्या ओळखीचे रादर माझ्या कॉलेजमधले सिनीयर आणि ज्युनियर्स आहेत. या व्यतिरीक्त असलेला तु एकटाच असा आहेस की ज्याच्याशी मी मैत्री केलीय. अन ती पण मनापासुन. माझी सारी सुख दुःखे तुझ्याशी शेअर करतेय. एक प्रकारचा विश्वास वाटतो तुझ्याबद्दल मला म्हणुनच ना?"
"  हो ना राधे? मग सांग न मला. कसे स्वागत करशील? मी दिसल्यावर तुझ्या चेहर्‍यावर काय भाव असतील हे ऐकण्यास मी आतुर आहे ग."
" हर्षु आजवर आपण एकमेकांचा आवाजही ऐकलेला नाहीय की एकमेकांना फ़ोटोतुनही पाहिलेले नाहीय. तसा आग्रह आपण दोघांनीही कधी धरला नाही. पण आपल्या गप्पातुन आपल्या वेव्हलेंथ जुळत गेल्या अन आपली छान अशी मैत्री झाली. त्यामुळे तु कसा असशील याची मी जरी मनात कल्पना केलेली असली तरी जर तु प्रत्यक्षात तसा नसलास तरी मला काहीही फ़रक पडत नाही. सो तु भेटल्यावर माझ्या चेहर्‍यावर फ़क्त आणि फ़क्त आनंदाचेच भाव असतील की माझा एक छान मित्र मला भेटला. अन त्याच आनंदाच्या भरात मी तुझ्याशी मस्त शेकहॅंड करेन. आमच्या गेस्ट रुममधे आपण छानशी कॉफ़ी घेउ अन ती घेता घेताच मी पण तुझ्या चेहर्‍यावरचे भाव निरखत बसेन."
" अरे व्वा माझ्यासारखा एवढा छान मित्र प्रत्यक्षात भेटल्यावर फ़क्त एक कप कॉफ़ी? "
"  हो मग अजुन काय देणार मी? इथे बाकी काही ट्रीट मीळत नाही रे. "
"  ओक्के मॅडम कॉफ़ी तर कॉफ़ी... पण आता जरा घड्याळाकडे बघा. आज जायचे नाहीय का घरी? आई वाट पहात असेल न?"
"  हो रे. तुझ्याशी बोलता बोलता माझे टेबल आवरणे चालुच होते. निघतेच आता पाच मिनीटात. "
" ओके...! बाय राधे नीट जा गं. गाडी नीट चालव. जपुन जा. बाय."
" हो रे हर्षु. मी नीट जाईन. गाडी पण नीट जपुन चालवेन. बाय. "

असेच दिवस चाललेले. दोघांच्या रोजच मस्त गप्पा व्हायच्या अगदी सगळ्या विषयांवर. अन या गप्पांमधुन दोघे मनाने अजुनच जवळ जवळ येत चाललेले. पर्सनल गोष्टीही एकमेकांच्यात शेअर केल्या जाउ लागल्या. अन अशाच गप्पांमधे अनुने आपला फ़ोन नंबर पण त्याला शेअर केला होता. पण अजुनतरी एकमेकांचा फ़ोन झाला नव्हता. तसेच दोघांच्या बर्थ डेट्स पण शेअर झाल्या. हर्षीतचा वाढदिवस तारखेने १५ ऑगस्ट अन तिथीने गोकुळ अष्टमी. अन अनुचा वाढदिवस १४ जानेवारी संक्रांतीचा. यावर हर्षीत म्हणाला पण राधे तरीच तुझ्या बोलण्यात वागण्यात एक गोडवा असतो.

एकेदिवशी.....

"ए राधा आपले नंबर एकमेकांकडे असुनही आजवर आपण एकमेकांशी बोललेलो नाहीय. केव्हा बोलायचे ग आपण? तसही इथे बोलतोच ग आपण पण मला तुझा आवाज ऐकावासा वाटतोय ग."

" हर्षु तु करु शकतोस फ़ोन पण लंच मधे कर. म्हणजे मला निवांत बोलता येइल. म्हणजे साधारण १.३० ते २ च्या दरम्यान. ओके? "

हर्षभरीत झालेला हर्षुने लगेच सहमती दर्शवली. अन मग ती तिच्या कामाला लागली अन तो त्याचा कामात गढुन गेला. पण कामात कितीही गढुन गेले असले तरीही काम करताना मात्र मनात एकमेकांचे विचार चालुच होते. की काय बोलायचे तिच्याशी? कसे बोलायचे? माझा आवाज ऐकुन ती काय म्हणेल? तिचा आवाज कसा असेल?
अन तिच्या मनात तर आपन रोज तर बोलतो पण आता हा फ़ोनवर काय बोलेल? कसा असेल त्याचा आवाज? आज प्रथमच एकमेकांशी बोलणार आहोत तर आपण नीट बोलु शकु का? अन एवढे का धडधडतय मला...

ती दीडला लंचला गेली. अन पाच मिनीटातच तिचा सेलफ़ोन वाजला. नंबर तिने सेव्ह केलेला होताच. त्यामु्ळे त्याचाच फ़ोन आहे हे लगेचच समजले.

" हाssssय राधा"
" हाssssय़ हर्षु"
.
.
.
.
.
.
.
मधे काही क्षण शांतता...

" का ग राधे काय झाले बोलत का नाहीस?"
" काही नाही रे मी रोज ज्याच्याशी बोलते त्याचा प्रत्यक्ष आवाज ऐकुन मला एवढा आनंद झालाय ना शब्दच फ़ुटत नाहीयेत."
" राधे फ़ोनवर बोलल्यावर अशी अवस्था झालीय तुझी तर मग प्रत्यक्ष भेटशील तेव्हा??" इकडे अनु लाजुन चुर झाली.
" बाय द वे राधु तुझा आवाज खरच खुप गोड आहे ग."
" थॅंक्स हर्षु... आणि तुझाही एकदम भारदस्त आहे आवाज."
" झाले जेवण तुझे?"
" चालु आहे बघ तुझ्याशी बोलता बोलता. पण जातच नाहीय."
" का ग राधे? "
" तुझा आवाज ऐकुनच माझे पोट भरलय."
"  हायला... मग मी पुन्हा फ़ोन नाही करायचा हा..."
" का रे का?"
" अग नुसता माझा आवाज ऐकुन पोट भरले तर थोडे दिवसांनी दिसेनाशी होशील न तु. "
" इश्य काहीतरीच काय रे?"
" हाsssssय मार डाला, काय छान लाजतेस ग तु. ए राधु परत म्हण ना इश्य.:
" इश्य जा बाबा..."
" हाय हाय !!!"
" असे इश्य म्हणुन लाजलेले ऐकायला आता रोजच फ़ोन करावा लागेल मला."
.
.
.
.
.
" काय ग करु ना?? गप्प का झालीस? आवडले नाही का माझे बोलणे?"
" नाही रे हर्षु. तुच तर असा आहेस की मला ज्याच्याशी खुप बोलावेसे वाटते. पण खरच मला भांबावल्यासारखे झालेय."
" ह्म.... मी समजु शकतो. बर ऐक, आता शांतपणे जेवुन घे तु नाहीतर माझ्याशी बोलायच्या नादात टिफ़ीन तसाच राहील. आपण नंतर बोलु."
" ओके, ठीक आहे. तसही माझे लंच टाइम संपत आलाय. लंचनंतर एक मीट आहे माझी ऑफ़ीसमधे. ती झाली की मी तुला पिंग करेन. चालेल??"
"  यस बॉस, चालेल... "
" चल बाय ठेवु फ़ोन? "
" हो ठेव..."
" तु आधी ठेव बरे."
" नाही तु आधी. "
"  असे रे काय हर्षु? प्लीज ठेव ना तु आधी."
" ओके बर बाई मी आधी ठेवतो."

आता रोजच थोडावेळ फ़ोनवर बोलणे होऊ लागले. अन त्यामुळे ते दोघे अजुनच जवळ आले. आता दोघांनाही ओढ लागलेली ती एकमेकांना बघायची. पण दोघेही एकमेकांकडे तसा विषय काढत नव्हते. यातही बराच काळ निघुन गेला.

का असे कोणी मनात गुंतुन जाते?
का डोळ्यात असे भाव मनीचे फ़ुलते?
का गुज मनीचे ओठांवर येते?
अन ओठांवर हलके स्मित पसरते...
का तुझ्या मारव्याचा मनी ध्यास आहे?
का अजुनी श्रावणाचा मधुमास आहे?
का तुझ्या आठवानी गळा दाटताहे?
तुला भेटण्याची मनी आस आहे.

अन एकेदिवशी हर्षीत अनुला म्हणाला, " राधे आपण जवळ जवळ दीड दोन वर्ष होऊन गेले एकमेकांशी बोलतोय, गप्पा मारतोय, बर्‍यापैकी एकमेकांना ओळखतोय, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन आहोत. पण तुला असे कधी नाही वाटत का की आपण ज्याच्याशी बोलतो तो कसा आहे दिसायला त्याला बघावे म्हणुन."
" हर्षु मला तुला बघावेसे तर वाटतेच रे. पण एक अनामिक भितीही वाटते."
" कसली ग भिती??"
"  माहित नाही रे, पण वाटते. "
"  का ग काय झाले ग? "
" मी ज्यांना खुप जवळचे मानते ना? ती लोक काही न काही कारणाने माझ्यापासुन तुटतात रे. "
" ए वेडुले असे काही नसतं गं."
" माझे मन खरच फ़ार वेडे आहे रे. त्यात बाबा अन दादा गेल्यापासुन तर खुपच हळवे झालेय. "
" हे बघ असा काहीही विचार करु नकोस. ऐक, मी माझा फ़ोटो तुला मेल करतोय. बघ तु. तुझा मित्र कसा आहे ते. अन तुला जेव्हा वाटेल तेव्हा तु तुझा फ़ोटो मला मेल कर."    पण मला खरच एवढ्या गोड आवाजाची मालकीण कशी आहे ते बघायची खुप उत्सुकता आहे. "
" समजा मी माझ्या गोड आणि सुंदर आवाजाप्रमाणे तशी नसले तर?"
" राधा हेच ओळखलस का ग मला एवढ्या दिवसात?"
" असे नाही रे, मी सहजच विचारले रे. "
" हे बघ राधु तु कशीही असलीस दिसायला तरी आपल्या नात्यात कधीच दुरावा येणार नाही. "
" सेम हियर हर्षु. माझ्या लेखी दिसण्यापेक्षा स्वभाव कसा आहे, तुझे मन कसे आहे याला जास्त महत्व आहे."
" हो ना? मग उगाचच काहीही विचार करत बसु नकोस. "
" ह्म, माझा फ़ोटो मी उद्या मेल करेन तुला चालेल? "
" चालेल. मी थोड्यावेळात माझा फ़ोटो तुला पाठवत आहे. "
अन थोड्याच वेळात अनुच्या मेल मधे हर्षुचा मेल येउन धडकला. मेल ओपन करुन अनु त्याच्या फ़ोटोकडे पहातच राहिली. गोरापान अन एकदम राजबिंडा होता दिसायला हर्षु. अंदाजे उंची सहा फ़ुट तर असेलच असा तिचा अंदाज. आता मात्र स्वताचा फ़ोटो पाठवायला तिचे मन का कु करु लागले. पण हर्षुला कबुल केल्याप्रमाणे तिने स्वताचा फ़ोटो पाठवायचे ठरवलेच. मोबाईलवर असलेला कोणता फ़ोटो पाठवावा याचा विचार ती करु लागली. सेलफ़ोनमधे काढलेले बरेच फ़ोटो होते. त्यातला एक गुलाबी ड्रेसमधला फ़ोटो तीला स्वताला खुप आवडायचा, तोच फ़ोटो पाठवायचे ठरवले तिने. अन दुसर्‍या दिवशी सकाळे ऑफ़ीसमधे आल्या आल्या डाटा केबल आणुन तिने फ़ोनवरुन फ़ोटो कंप्युटरवर घेउन हर्षुला मेल केला.
    आज सकाळपासुन हर्षुचा काहीही मेसेज आलेला नव्हता की तिचा फ़ोटो मिळाल्याचा रिप्लायही आला नव्हता. दुपारचे तीन वाजुन गेले. आता मात्र ती कासावीस झाली. कुठे आहे हा? काहीच रिप्लाय कसा नाही? माझा फ़ोटो नसेल का आवडला? अशा विचारात ऑफ़ीस सुटायची वेळ होत आली तरी काहीही रिप्लाय नाही. आता ती टेबल आवरताना पीसीवरच्या ओपन असलेल्या विंडोज एक एक करत बंद करत असतानाच हर्षुची चॅट विंडो ओपन झाली.
अन " सॉरी राधुडे, आज सकाळपासुन एक क्लायंट येउन बसलेला, त्याच्याबरोबर एक मीट होती ती आत्ता आवरली." त्यामुळे आज दिवसभर तुझ्याशी बोलता आले नाही की तुझ्या मेल ला रिप्लाय देता आला नाही. सॉरी ग."
" इट्स ओके रे", असे म्हणत स्वताच्या मनाला मात्र तिने त्याच्या पासुन लपवले.
" असे कसे राधे मला माहितेय तु फ़ोटो पाठवल्यावर माझ्या रिप्लायची वाट नक्की पहात असणार अन माझा रिप्लाय आला नाही म्हणुन नाराज झाली असणार.  हो ना? "
" हर्षु........ "
" राधे मी तुला आता चांगलच ओळखायला लागलोय ग. असो.... माझ्या मैत्रीणीची जी छबी माझ्या मनात होती तशीच आहेस तु. अगदी स्मार्ट, निरागस, चेहर्‍यावर ओतप्रोत असलेला गोडवा..... आहाहा!!! " बर ऐक तुझी जायची वेळ होत आलीय, आपण उद्या बोलुया, माझे काम अजुन तास दोन तास चालणार आहे."
" हर्षु......... बर ओके... मी निघते आता. "
" नीट जा ग. गाडी हळु चालव. बाय. "
" बाय... टाटा. "
अनु एका वेगळ्या आनंदातच गाडीवरुन निघाली. त्या आनंदात घर केव्हा आले ते समजलच नाही. आई वाट पहातच होती. अन हल्ली आपल्या लेकीच्या चेहर्‍यावर पहिल्या पेक्षा जास्त उत्साह अन आनंद दिसतो. एकदम टवटवीत असते अनु हे तिच्यातल्या आईने जाणले होतेच. तरी पण तिने विचारलेच, " काय ग अनुबाळा आज कसला एवढा आनंद दिसतोय तुझ्या चेहर्‍यावर? तशी हल्ली प्रसन्न दिसतेसच पण आज मात्र जरा जास्तच दिसतेस." " काही नाही ग आई विशेष, हल्ली माझे सगळे फ़्रेंडसर्कल माझ्या संपर्कात असते ना म्हणुन असेल." असे सांगत वेळ मारुन नेली. पण आईला मात्र ते काही फ़ारसे पटले नाही असे तिच्या चेहर्‍यावरचे भावच सांगत होते. पण तिने अनुला फ़ारसे काही खोदुन खोदुन विचारले नाही. आपल्या लेकीवर खुप विश्वास होता. वेळ येताच पोर नक्की सांगेल जे काही असेल ते. असा विचार करुन ती शांत बसली. गाणी गुणगुणतच अनु फ़्रेश होउन स्वैपाकाला लागली. इन मिन दोन माणसांचा तो स्वैपाक पण आज मात्र तो करायलाच वेळ लागला. हर्षुच्या विचारात वेळ कसा गेला हे समजलेच नाही.
आपण हल्ली सारखाच हर्षुचा विचार करत असतो. काय झालेय काय आपल्याला? अन कालपासुन म्हणजे त्याचा फ़ोटो पाहिल्यापासुन तर त्याच्या विचाराने तिचा पिच्छाच सुटला नव्हता. आपण बोलतो रोज अन आता आपण एकमेकांना आपले फ़ोटो पण दिलेत पण........................... पुढे काय? हर्षुच्या मनात काय असेल? एक निखळ निरागस मैत्री की त्यापेक्षाही जास्त? अन आपले काय? आपण त्याच्याकडे अजुन तरी फ़क्त मैत्रीच्याच नात्याने बघत आहोत का? हे असे त्याचा विचार करणं, रोजच्या होणार्‍या गप्पा सारख्या सारख्या मनात घोळणं... हे आहे तरी काय? अशा विचारातच तिला सोशल साईटवर वाचलेली एक कविता उगाचच आठवुन गेली.

कुणा भाग्यवतीसाठी
तुझ्या श्वासाची प्रतिक्षा
माझी वेडी वाट
आसवांची लाट........... तुझ्यासाठी

तुला कळो वा ना कळो
मला सारखे जाणवे
माझा श्वास...हास्य...मौन
माझे नित्याचे जीवन.........तुझ्यासाठी

कुणा भाग्यवतीसाठी
तुझे शब्द.... तुझी प्रित
माझा श्वास.....माझी वाट
माझ्या आसवांचे दव....... तुझ्यासाठी

खरच ती भाग्यवती मी असेन का? जे माझ्या मनात आहे तेच त्याच्या मनात असु शकेल का? या विचारात रात्री केव्हा झोप लागली ते अनुला समजलचं नाही.
सकाळी सुद्धा अशाच छान मुडमधे प्रसन्न वातावरणात घरातली कामे अन स्वताचे आवरुन अनु ऑफ़ीसला जायला निघाली अन आईने हाक मारली, " अनुबेटा जरा इकडे ये ग. "
" काग ग आई? "
" अग तुला वेळ आहे ना ग? जरा इकडे येतेस? बोलायचेय तुझ्याशी. "
" आई मी गाडीवरुन जात असल्याने १०/१५ मिनीटे आहेत गं, बोल तु. तुझी तब्बेत बरी आहे ना गं? काही होतय का? "
" नाही ग बेटा, मला नाही काही होत. अन मी काय आता त्याने बोलवण्याची वाट बघतेय ग."
" आई............................................ नको ना ग असे बोलुस." असे म्हणत अनु जाम रडवेली झाली. अन आईला गळामिठी घातली.
" अग पोरी एक ना एक दिवस हे होणारच आहे. पण मला तुझी काळजी वाटतेय ग. अन तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्याशिवाय मी काही जायची नाही बघ. "
" आई बास झाले हा तुझे असे बोलणे. मी जातेच कशी ऑफ़ीसला. "
" अग थांब अनु. काल शेजारच्या काकु आलेल्या त्या तुझ्या लग्नाबद्दल विचारत होत्या. मी मेली इतके दिवस माझ्याच दुःखात चुर होऊन बसलेले. त्यांनी विचारल्यावर माझे डोळे उघडले बघ. पण मी त्यांना सांगितलेय की एक दोन दिवसात अनुशी बोलुन तुम्हाला काय ते सांगते. अग त्यांच्या ओळखी भरपुर आहेत त्यामुळे नात्यात अन ओळखीत काही मुले लग्नाची आहेत म्हणुन तुझ्याबद्द्ल विचारत होत्या."
" आई एवढ्यात काय ग मला घरातुन घालवायची घाई तुला?"
" अग पोरी सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बर्‍या. "
" बर ओके.... मी पळते आता. मला उशीर होईल अन बॉस उगाचच रागवेल मला. आपण यावर संध्याकाळी बोलु." असे म्हणुन अनु निघालीच लगेच.

आज ऑफ़ीसात एवढे काम आलेले की लंच पर्यंत अनुला डोके वर काढायलाही फ़ुरसत झाली नाही. हर्षुची चॅट विंडो दोन वेळा पॉप अप झाली. पण छे आज कामाचाच लोड एवढा होता की सर्व काम आवरायलाच एक वाजुन गेला. मग लंच टाइम. त्यामुळे तिने आज हर्षुला फ़ोन करायचे ठरवले. अन पटपट जेउन घेउन तिने फ़ोन लावलाच. फ़ोन उचलल्या उचलल्या अनुने बोलायच्या आधीच..... " ओहो आज स्वता फ़ोन केलाय? आज दिवस कुठे उगवलाय? अन सकाळपासुन कुठे गायब?"
" अरे काय करु? आज काम खुप आलय, जरा सुद्धा उसंत नाही. म्हणुन म्हणले आज आपणच फ़ोन लावावा अन गप्पा माराव्यात. "
" ओके ओके... कशी आहेस तु राधे?"
" मी काय? मस्तच अन आनंदात अन आत्ता तुझ्याशी बोलतेय त्यामुळे डबल आनंद."
" आहा...!!! अशीच आनंदात रहा."
" ती तर काय तु भेटल्यापासुन आहेच मी आनंदात. "
" भेटल्यापासुन? आपण कुठे कधी भेटलोय?"
" अरे देवा !!! तसं नाही रे."
" मग ग कसं राधे?"
" अरे आपली ओळख सोशल साईट वर झाली त्याबद्दल बोलतेय. ऑनलाईन भेट रे. "
"  अच्छा.... आय सी... असे आहे तर.... ह्म्म्म....." " पण राधुकले हा आनंद अजुन वाढावा द्विगुणीत व्हावा असे नाही वाटत का तुला?"
" म्हणजे रे काय हर्षु?" आनंद कुणाला नको असतो का रे?"
"  मग तु अजुन आपल्या प्रत्यक्ष भेटीला अनुकुल का नाहीयेस?"
" ...................."
"  काय ग राधे गप्प का? नाही भेटावेसे वाटत का?"
" वाटते रे हर्षु. खुप वाटते तुला भेटावेसे. पण.......... "
"  पण काय राधे? " अजुनही भिती आहे मनात? माझ्यावर विश्वास नाही?"
" नाही रे हर्षु, तुझ्यावर विश्वास आहे रे. पण मी अजुन अशी कधी कुणाला भेटायला गेलेले नाहीय ना."
" ओके, माझी काही जबरदस्ती नाहीय राधे, जेव्हा तुला वाटेल मनाला पटेल तेव्हा तु सांग मला. तेव्हा भेटु आपण. मला तुझ्या मनाविरुद्ध काही करायचे नाहीय. पण एक मात्र आहे मी आपल्या प्रत्यक्ष भेटीकडे डोळे लावुन बसलोय एवढे मात्र नक्की."
" सॉरी हर्षु. रागवु नकोस रे. प्लीज मला जरा समजुन घे रे. पण एक मात्र आहे तो दिवस माझ्यासाठीही आनंदाचा असेल. मी पण आपल्या भेटीकडे डोळे लावुन बसलेय. आपली पहिली भेट. "
" ए वेडाबाई मी का रागवु तुझ्यावर? टेक युवर ओन टाईम." " बर चल बराच वेळ झालाय. तुला काम आहे ना? आपण काम करत करत चॅट वर बोलु."
" ओके चल आलेच मी तिकडे. इथे तात्पुरता बाय."
अनु जागेवर जाउन बसली अन विचार करु लागली. काय करावे? जावे का भेटायला? पण एक मात्र नक्की की लवकरच आईच्या कानावर आपल्या आणि हर्षुच्या मैत्रीबद्दल सांगायला हवे. अन हो आईशी बोलुन तिच्या संम्मत्तीनेच हर्षुला भेटायचे की नाही ते ठरवु. त्याला भेटायला आई नाही म्हणणार नाही हे नक्की. एक मात्र होते की तिने अजुनपर्यंत आपली खास मैत्रिण कविता हिला पण हर्षुच्या मैत्रीबद्दल सांगितले नव्हते. सकाळी आईने काढलेला विषय संध्याकाळी परत निघणारच होता. तेव्हाच आईशी बोलायचे असे ठरवुन ती आपल्या कामाला लागली. लंचमधल्या फ़ोननंतर हर्षुशी थोडेफ़ार बोलणे झालेच. मात्र हा विषय सोडुन. इकडच्या तिकडच्या गप्पा. संध्याकाळी अनु नेहमीप्रमाणेच घरी आली तर आई तिची वाटच पहात होती. शेजारच्या काकुही आलेल्या होत्या. फ़्रेश होऊन दोघींना चहा केला. थोडे पोहे केले अन डिश घेउन ती आईच्या खोलीत आली.
" अनु तु पण घे ग पोहे आमच्याबरोबर." इती दामले काकु .
"  हो काकु, तुम्ही अन आई घ्या मी आलेच तोवर चहा घेउन. "
" ये लवकर, आपण एकदमच घेउ या. चहा कर सावकाशीने. "
"  आलेच काकु. आई तु चहा घेशील ना जरा?
"  हो बाळा अर्धा कपच. "
चहाचे आधण ठेवता ठेवता आईशी काय बोलायचे अन कसे बोलायचे याची मनात जुळवाजुळव चालु होतीच.
" अरे हे काय? पोहे गार होतात न, तुम्ही करा न सुरुवात. "
" अनु अग असु दे ग आपण तिघी करु एकदम सुरुवात खायला. रोज आपण दोघीच असतो. आज या दामले वहिनींबरोबर... "
" अनु पोहे मात्र झकासच झालेच हा. आता कांदेपोह्याची सुरुवात कधी करायची? " दामले काकुंनी डायरेक्ट विषयालाच हात घातला.
" काय हो काकु? मला नाही एवढ्यात लग्न करायचे."
" अग असे कसे? आता तु २३/२४ ची आहेस. वेळेवर लग्न झालेले बरे असते. अन आता सुरुवात करु तेव्हा कुठे वर्षभरात ठरेल लग्न."
" ह्म खरय काकु तुमचे पण मला विचार करायला जरा वेळ हवाय. चालेल ना?"
" चालेल ग. "
पोरीने आपल्याला अगदीच धुडकावुन लावले नाही यात समाधान मानत दामले काकुनी पोहे खाउन चहा घेउन निरोप घेतला. अन अनुच्या आईलाही थोडे हायसे वाटले. आज घरी आल्यावर थोडा नाश्ता झाल्याने अन सकाळचे थोडेफ़ार शिल्लक असल्याने स्वैपाकाची फ़ारशी गडबड नव्हती.  त्यामुळे अनु आईच्याच रुममधे घुटमळु लागलेली पाहताच आईने विचारले, " अनु बेटा काही बोलायचय का ग तुला?"
" ह्म, आई मला जरा तुझ्याशी बोलायचयं. "
"  आई, तुला माझे सर्व मित्र मैत्रिणी तर माहितच आहेत. जॉब लागल्यावर आम्ही सगळे सोशल साईट्सच्या माध्यमातुन एकमेकांच्या संपर्कात आलोय."
" अच्छा.... बरं झालं बाई. घरच्या परिस्थितीमुळे तु अगदीच एकटी पडलेली होतीस. मित्र मैत्रिणींमुळे तु जरा हसती खेळती राहु लागलीस. "
" हो आई. अन हे सारे कवितामुळे झाले. अन माझ्या या मित्र मैत्रिणींमुळे मला अजुन काही फ़्रेंडस मिळालेत."
" अरे व्वा!!! छानच की. पण बेटा या नेटवर मिळालेल्या फ़्रेंडस बाबत जागरुक आहेस ना तु? तशी तु हुशार आहेस तुला मी सांगायला नकोच. पण आजकाल काही घटना ऐकतो, पेपर मधे वाचतो म्हणुन काळजी ग. "
"  हो ग आई. सर्व नवे फ़्रेंड्स छान आहेत. माझ्यासाठी जरी ते नेटवरचे फ़्रेंड्स असले तरी माझ्या ग्रुपमधील कुणाच्या ना कुणाच्या वैयक्तीक ओळखी आहेतच. "
" मग ठिके. तु मजेत आहेस ना? मग झालं तर. "
"  ह्म. ऐक ना आई..... अग याच माध्यमातुन माझी अजुन एका मुलाशी ओळख झालीय अन तो पण माझा छान मित्र झालाय.............." असे म्हणत अनुने आईला आपल्या आणि हर्षुच्या झालेल्या ओळखी बद्दल अगदी सुरुवातीपासुन सांगितले. त्याची रिक्वेस्ट कधी आली आणि आपण किती उशीरा ती रिक्वेस्ट स्विकारली ते अगदी परवा फ़ोटो एकमेकांना शेअर केले इथपर्यंत सांगितले. त्याच्याबद्दल तिला असलेली सगळी माहिती तिने आईला सांगितली.
" अनु बेटा मला हे सारे तर सांगितलेस आता तु, पण तुला नक्की काय यातुन सुचीत करायचेय? "
" आई.... अग हर्षु म्हणतोय की आपण एकदा प्रत्यक्ष भेटुयात. "
"  बर मग तुझे काय म्हणणे आहे यावर? तुला त्याला भेटावेसे वाटतय का? "
"  हो आई मला पण त्याला भेटावेसे वाटतेय ग. पण तुझा निर्णय अंतीम असेल. तु भेट म्हणालीस तरच भेटेन मी, अन्यथा नाही भेटणार. "
"  हो??? अन मग त्याला वाईट नाही वाटणार? अन त्याला वाईट वाटल्यावर माझ्या छकुलीच्या चेहर्‍यावरे हसु जाऊन तिथे आसु आले तर? "
" हे ग काय आई? " म्हणत अनु लाजली. अन तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन आईने ओळखले की आपली पोर प्रेमात तर पडलीय पण अजुन तिने त्याला ते कळु दिले नाहीय. अन मुळात हर्षीतचे काय? त्याच्या मनात हिच्याबद्दल प्रेम असेल की नुसती मैत्री? देवा..... माझ्या लाडक्या लेकीला आता कोणतेही दुःख भोगावे लागु देउ नकोस रे बाबा. असे म्हणत त्या माऊलीने मनातच देवाचा धावा केला. अन अनुला म्हणाली, " अनु तु भेट त्याला. जेवढे काही तु त्याच्याबद्दल मला सांगत आहेस त्यावरुन तो एक चांगला मुलगा वाटत आहे. तो नाही कधी तुला दुखवायचा." अनुने आईला गळामिठीच घातली. अन ती आपल्या रुममधे आली. हर्षुला भेटायची आता तिला खरच खुप उत्सुकता होती. कधी एकदा त्याच्याशी हे सारे बोलेन असे तिला झालेले. आत्ताच फ़ोन करुन बोलावे का असाही विचार तिच्या मनात येउन गेला. पण छे आत्ता नकोच. उद्या ऑफ़ीसला गेल्यावरच बोलुया असा विचार करुन ती किचन मधे गेली. आई अन ती जेवण करुन आपापल्या रुम मधे गेल्या.
आईचे विचार हे की, हा मुलगा अनुच्या सांगण्यावरुन तरी सुसंस्कारीत दिसतोय. पण याच्या मनात नक्की काय असावे? अनुशी नुसती मैत्री की हा अनुवर प्रेम करतोय? याच्या घरी कोण कोण आहे? कारण तो विषय काही अनुच्या बोलण्यातुन आलेला नाही. असो काय आहे पोरीच्या नशिबी हे त्या जगन्नियंत्यालाच ठाउक. अन इकडे अनु, आपण भेटायला तयार आहोत हे कळल्यावर हर्षुची काय प्रतिक्रीया असेल? याच विचारात हरवुन गेली अन केव्हा झोप लागली हे तिचे तिलाच नाही समजले.
सकाळी उठुन ती घरासभोवती असलेल्या बागेत गेली तर आज अंगणात फ़ुललेले पारिजातकाचे झाड काही वेगळेच भासत होते. पारिजातकाचा मन तृप्त होइपर्यंत सुगंध घेत ती आज बागेतली सर्वच फ़ुलझाडे बारकाईने निरखत होती. जणु काही ती आपले गुपीत त्यांच्याशी शेअर करीत होती. आज ऑफ़ीसला गेल्या गेल्या याबाबत हर्षुशी बोलायचे ठरवुन ती घरात परतली अन स्वताचे अन आईचे सर्व काही आवरुन ऑफ़ीसला निघाली हर्षुच्या विचारातच. ऑफ़ीसमधे आल्या आल्या जी अर्जंट कामे समोर होती ती उरकुन तिने हर्षुला पिंग केले.
" हाय..... गुड मॉर्निंग. "
" हाय..... माय स्वीट फ़्रेंड हाउ आर यु? "
" आय अ‍ॅम फ़ाईन, व्हॉट अबाऊट यु? "
" मी टु..... काय ग आज खुप खुश दिसतेस? "
" अरेच्या तु कसे काय ओळखलेस? "
" ओळखलं असच. पण ओळखलं की नै सांग? "
"  हो रे. तसा तु मनकवडा आहेसच. "
"  बर सांग आता तुझ्या खुशीचे कारण. "
"  ओये, खुशी फ़क्त माझी एकटीचीच नाहीय हं. कारण कळल्यावर तु पण खुश होणार आहेस. "
अरेच्या ही काय आता लग्न ठरल्याचे सांगतेय की काय? असा विचार करत तो जरा हिरमुसला.
" राधुले सांग ग लवकर. मला ऐकायचेय तुझ्या खुशीचे कारण. "
" अरे ना मी काल आपल्या मैत्रीबद्दल अगदी आपल्या पहिल्या ऑनलाइन भेटीपासुन ते कालपर्यंतचे सगळे आईला सांगितले. "
" अरे बापरे!!!! "
" का रे ? अरे बापरे का? घाबरलास की काय? "
" अग नाही ग. पण एकदम असे आईला सांगितलेस म्हणल्यावर त्यांची काय प्रतिक्रीया असेल याचा विचार करुन जरा नर्व्हस झालो. "
"  ओके.... अरे तसे काही नाही. आपल्या मैत्रीबद्दल आई खुश. मी जे काही तुझ्याबद्दल तिला सांगितलेय त्यावरुन तिच्या मनात तुझी प्रतिमा एकदम छान झालीय. "
" गुड. आणि काय म्हणाल्या त्या? "
" बाकी काही नाही. पण मी आपल्या भेटीबद्दल विचारले तिला. अन तिने परवानगी दिलीय. "
"..............."
" का रे काय झाले?  शांत का झालास एकदम असा? "
"  काही नाही ग. तु मला भेटणार आहेस यावर अजुनही विश्वास बसत नाहीय. "
" अरे खरच,  माझा पण आधी विश्वास बसला नाही. "
"  ग्रेट, राधे. म्हणजे तु आईची परवानगी घेउनच मला भेटायचे म्हणुन एवढे दिवस मी भेटायचा विषय काढला की टाळत होतीस का? "
" असं नाही रे पण मी शक्यतो कोणतीही गोष्ट आईपासुन लपवुन ठेवत नाही. आपल्या मैत्रीबद्दल खरे तर मी आधीच सांगायला हवे होते आईला. कारण आपली ओळख होऊन साधारण दोन अडीच वर्षे झाली नं. पण बाबा अन दादा गेल्यानंतर आई एवढी खचलीय अन आजारी झालीय नं मग मला काही सांगवेना तिला. "
" ह्म, बरोबर आहे राधे तुझे. मग..........??? "
"  मग काय? "
"  अरे यार कधी भेटुयात आपण अन कुठे भेटुयात? "
" शक्यतो माझ्या घराच्या जवळपास कुठेही. एखाद्या कॉफ़ीशॉपमधे चालेल. "
" ओके आज बघ मंगळवार आहे. आपण शनिवारी भेटुया. मला सुट्टी असते. त्यामुळे संध्याकाळी ऑफ़ीसमधे अचानक काही काम आले म्हणुन बाहेर पडायला जमले नाही असे नाही व्हायचे. "
" यस, चालेल. शनिवारी भेटु. मला पण ऑफ़ीसमधे शनिवारी दुपारनंतर काम कमी असते जरा. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. "
"  मी सांगतो तुला कुठे भेटुयात ते. अन हो त्यादिवशी तु तुझी गाडी आणु नकोस. "
"  का रे? "
" अग मला तुझ्या ऑफ़ीसचा पत्ता माहितेय. मी तुला पिक करेन. चालेल ना? "
" इश्श्य न चालायला काय झाले? "
" आय हाय.......,  बर ऐक मी तुला पिक करेन अन मग घरी पण सोडेन. "
" घरी???????? "
"  हो. का ग???? आईला नाही आवडणार? "
" नाही तसं नाही रे. पण तुला उगाच उलट सुलट हेलपाटा. "
"  अग वेडे बाईक तर आहे कुठे चालत यायचयं? "
" ह्म, ते ही खरच म्हणा. चालेल मला घरी सोडले तरी. "
" सो फ़ायनली तो दिवस मिन्स संध्याकाळ उजाडतेय तर. "
" ह्म्म्म्म. बर चल कामाला लागते आता. नाहीतर बॉस ओरडायचा. "
" ओके. चल आज मी दुपारी नसेन बरं का एक आउटडोअर मीट आहे. "
" ओके. चल बाय. टाटा... उद्या भेटु. इथेच "
" बाय राधु. टाटा. टेक केअर. "
मधले तीन दिवस कसे संपले हे अनुला समजलेच नाही. नुसता विचार...विचार अन विचार..... कोणता ड्रेस? काय बोलायचे? किती अन काय.... अन अखेरीस शनिवार उजाडला... सकाळपासुन ड्रेसच्या विचारात हरवलेली अनु अखेरीस पांढर्‍या शुभ्र कापडावर असलेली फ़िकट केशरी रंगाची नाजुक डिझाईन असलेला टॉप अन त्याच केशरी रंगाची सलवार अन दुपट्टा असा ड्रेस घालुन आरशासमोर उभी राहिली स्वताचेच रुपडे न्याहाळत. आता ऑफ़ीसला जायचे असल्याने फ़ारसा मेकअप करता येणार नव्हताच म्हणुन माफ़क मेकअप करुन अन काही मेकअप चे साहित्य पर्समधे टाकुन आईला सांगुन अन नेहमीप्रमाणे तिला नमस्कार करुन ती बाहेर पडली.
आज खरे तर कशातच लक्ष लागत नव्हते. लंच मधे टिफ़ीन पण संपला नव्हता. डोळे वारंवार घड्याळाचा वेध घेत होते. कधी एकदा ऑफ़ीस सुटतेय असे झालेले. एक अनामिक हुरहुर, काहीशी धडधड...... अशी काही अवस्था झालेली अनुची. मोबाईलही वारंवार चेक केला जात होता. एखादा एस एम एस अथवा मिसकॉल तर नाही न आलेला. ऑफ़ीस सुटायला अजुन १५ मिनीट्स असताना अनुने लेडीजरुममधे जाऊन फ़्रेश होऊन हलकासा मेकअप केला. अन जागेवर येउन ती हर्षुच्या फ़ोनची वाट पाहु लागली. अन फ़ोन आलाच..... " राधे मी तुझ्या ऑफ़ीसच्या गेटबाहेर येउन थांबलोय ग."
" ओके हर्षु आलेच मी पाच मिनीटात. "
टेबल आवरलेले होतेच. बॉसला सांगुन ती बाहेर पडली. गेटच्या बाहेर हर्षु उभा होताच. स्काय ब्ल्यु कलरचा टीशर्ट, ब्लॅक पॅट अन डोळ्यावर रेबॅनचा गॉगल अन हलकेसे मिश्कील स्मीत त्याच्या ओठावर तर त्याला पाहताच एक लाजरे बुजरे स्मीत अनुच्या ओठांवर.
" हाsssय राधे, कशी आहेस? "
" हाsssय हर्षु मी मस्त अन खुप आनंदात. तु कसा आहेस? "
मिश्कील हसत, " कसा दिसतोय? "
" इश्श्य....!!! "
" आह हाय.... पण इथे नको ना लाजु अशी. बर चल निघुया? "
" हो चल. पण जायचेय कुठे आपण? "
" तु बैस तर खरे बाईकवर. "
अनु बाईकवर बसली खरी पण दादा अन बाबां व्यतिरीक्त एका पुरुषाबरोबर ती प्रथमच बाईकवर बसत असल्याने ती जरा संकोचुनच बसली होती. अन ते हर्षुला जाणवल्यावर बाईक स्टार्ट करण्याआधी तो अनुला म्हणाला, " राधे नीट बस ना अन कोणताही संकोच नको ग. उजवा हात माझ्या खांद्यावर ठेव बिन्धास्त. "
" नको असु दे रे, मी बसलेय नीट, " म्हणत ती परत एकदा सावरुन बसली.  हर्षु पण गाडी सावकाशच चालवत होता. पण एका खड्ड्याजवळ आल्यावर हर्षुने गाडीला थोडा ब्रेक
लावताच अनुने पटकन त्याच्या खांद्याचा आधार घेतला. अन ती लाजली. ते पाहुन हर्षु गालातल्या गालात हसला. रस्त्यावरील गर्दीच्या कोलाहलात गाडीवर फ़ारसे बोलणे झालेच नाही. हर्षुने एक वळण घेउन एका मंदिरासमोर गाडी थांबवली. अनुच्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहुन तो म्हणाला, " अग आपली पहिली भेट आहे ही, अन मला असे वाटले की राधाकृष्णाच्या साक्षीने आपण ही भेट अविस्मरणीय करुया. कसे? "
अनु लाजतच " अरे एवढे सुंदर मंदिर आहे अन खरच मला खुप आवडले. मी आधी कधी या मंदिरात आले नव्हते. म्हणुन मला प्रश्न पडला की हे कुठे आणलेस तु मला. "
"  अग मी बरेचदा येतो इथे. खुप शांत अन प्रसन्न वाटते इथे. म्हणले तुला प्रथम इथेच घेउन यावे. पण खरच तुला आवडले ना? का भ्रमनिरास झाला? "
" भ्रमनिरास? तो कसला? "
" अग तुला वाटले असेल की एखाद्या कॉफ़ीशॉपमधे नेईल हा. अन तसे न होता मी तुला मंदिरात आणले. "
" हो वाटलेले मला तसे की तु एखाद्या कॉफ़ीशॉपमधे नेशील म्हणुन, पण हा परिसर, हे मंदिर खरच एवढे सुरेख आहे की तुझ्या सिलेक्षन ला दाद द्यावी वाटते. "
" बर चल आपण आधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेउ. "
" हो चल. "
अन दोघेही मंदिराच्या गाभार्‍या समोर आले, अन अनु राधा-कृष्णाच्या मुर्तीकडे पहातच राहिली. अत्यंत रेखीव अशा राधा-कृष्णाच्या मुर्तीवर एक अलौकीक तेज दिसत होते. आपसुकच अनुचे हात जोडले गेले. " हे देवा मी अन हर्षु आज तुझ्या मंदिरात प्रथमच भेटत आहोत. माहित नाही आमची मैत्री पुढे कोणते वळण घेईल. पण आमची मैत्री अभंग राहु दे. आमच्या नात्यात कोणतेही गैरसमज, किंतु परंतु नकोत. " अन हर्षु..... " हे देवा मी नेहमीच तुझ्या मंदिरात येतो, पण आजच्या येण्याला एक विशेष महत्व आहे. माझ्या अन राधाच्या मैत्रीबद्दल तर मी नेहमीच तुला सांगत आलेलो आहे. आज त्याच राधेला आमच्या पहिल्या भेटीसाठी इथे घेउन आलोय. मला राधा खुप आवडते. जेवढी तुझी राधा तुला आवडते ना तेवढीच. पण मी अजुन तिला काहीच बोललेलो नाहीय. तिच्या मनात काय आहे रादर असावे याचा मला अंदाज आहेच पण मला कोणतीही घाई नकोय. तसेच कोणतेही गैरसमज व्हायला नको आहेत. अन हो एक मात्र आहे की पुढे काहीही होवो पण कोणतेही गैरसमजाने आमचे नाते तुटायला नको. आमची मैत्री अशीच अभंग राहु दे. अर्थातच जे काही होईल ते तुझ्या साक्षीनेच होईल. " एवढे मनातले मनातच पण देवाकडे बोलुन एकदमच " तु काय मागितलस देवाकडे " असे एकमेकांना विचारते झाले. अन " आपली मैत्री अभंग राहो हीच प्रार्थना केली " असेही एकदमच उत्तरते झाले. अन एकच उत्तर आल्यावर दोघांचेही चेहरे फ़ुलुन आले.
" अनु..."
" ह्म "
" चल आपण थोडावेळ इथे मागेच एक बांधिव तळे आहे त्याच्या काठावर बसु. "
" हो चल "
मंदिराच्या मागे एक विस्तीर्ण असा एक जलाशय होता. त्याच्या कडेला कमरे एवढा उंच असा कठडा होता.  त्या कठड्यावर दोघेही बसले. तळ्यामधे वेगवेगळ्या रंगांच्या कमळांची लागवड केली होती. लाल, गुलाबी, जांभळी अशी वेगवेगळ्या शेड्सची कितीतरी कमळे तळ्यात उमललेली होती. अन नुकताच अस्ताला चाललेल्या सुर्याची केशरी छटा थोडेफ़ार रंगबिरंगी झालेले आकाश याचे तळ्यात पडलेले प्रतिबिंब हे दृष्य खरच विलोभनीय होते. अनु भान हरपुन ते दृष्य पहात होती. अन ते पाहताना तिच्या चेहर्‍यावरचे होणारे
फ़ेरफ़ार हर्षु तल्लीन होऊन पहात होता. बराच वेळ आपण काहीच बोललो नाही याचे भान येउन अनु हलकेच त्याच्याकडे वळुन पहात असतानाच तो आपल्याकडे टक लावुन पहात आहे याची जाणीव तिला झाली. अन ती लाजेने चुर झाली अन म्हणाली, " काय रे काय एवढे पहात आहेस?
" अग तु निसर्गाचा अविष्कार पाहण्यात तल्लीन झालेलीस.  अन मी तुला. काय ग किती हरकलेलीस तु हे सारे पाहताना. "
" हो रे. अशी दृष्ये पाहताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते खरी. "
" हो पण मला विसरु नकोस. "
त्याच्या तोंडावर पटकन हात ठेवत अनु उत्तरली, " हर्षु नको असे बोलुस परत. तुला कशी काय विसरेन रे? तुझ्यासारखा मित्र मिळायला खरच भाग्य लागते. "
" अरे बापरे स्तुती पुरे आता. अन मी पण आहेच की भाग्यवान तुझ्यासारखी गोड मैत्रिण लाभली म्हणुन. "
"  इश्श्य... काहीही हा... "
" ओहो... क्या बात है. " " अनु एक सांगु? "
" हा बोल ना. "
" आज तुला या ड्रेसमधे पाहिले अन मला पारिजातकाच्या फ़ुलांची आठवण झाली."
" म्हणजे रे? "
तळ्याच्या काठावर असलेल्या पारिजातकाच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाला. " ते बघ... आत्ता त्या कळ्या दिसत आहेत ना तुला? त्या उमलल्यावर कशा दिसतात? अगदी तुझ्या ड्रेसचा रंग आहेना तसेच केशरी देठ अन नाजुकशा पांढर्‍या पाकळ्या. एकदम टवटवीत. जशी तु कायमच असतेस. अन अशीच तु कायम रहावीस असे मला वाटते. "
"  ................................."
"  काय ग? राधुले काय झाले बोल ना..."
" काही नाही रे आज तुझ्या या शब्दांनी मला माझ्या बाबांची आठवण झाली. ते माझ्या लहानपणापासुन कायमच मला नाजुक बाहुली म्हणायचे.. अगदी या पारिजातकासारखी नाजुक अन टवटवीत. अन अशीच कायम टवटवीत रहा म्हणायचे. पण बाबा गेल्यापासुन मी आमच्या घरच्या अंगणात असलेल्या पारिजातकाकडे लक्षच दिले नाही फ़ारसे. देवापुरती फ़ुले गोळा करणे एवढेच काम. "
"  ओह...!!! पण आता नाही हं असे चालणार. मला पारिजात खुप आवडतो तसच तु पण आवडतेस. अन माझी मैत्रिण मला कायम हसरी अन टवटवीत दिसायला हवी. "
"  ओक्के बॉस.... आजपासुन तुझ्या पारिजातकाची काळजी मी नक्की घेइन. "
" बर चल आता तिन्हीसांज होऊन गेलीय. आई वाट पहात असेल ना? "
" हो चल. ती माझ्या वाटेकडे डोळे लावुन बसली असेल. "
आता मात्र त्याच्या बाईकवर बसताना मगाचचा अवघडलेपणा नव्हता. त्याच्या खांद्यावर हात ठेवुन ती त्याच्या मागे बसली. पंधरा मिनीटातच घर आले. गाडीवरुन उतरुन ती गेटजवळ आली तसा तो म्हणाला " राधु निघु मी? "
" का रे? चल न आत. आईला नाही भेटणार? "
" अग तसं नाही पण..... "
" चल माझ्या आईला पण माझा मित्र कसा आहे हे पाहु दे न. "
" ओके चल. बाईक साईडला लावुन आलोच. "
गेटमधुन आत येताना मोगर्‍याच्या सुगंधाने त्याचे मन मोहुन गेले. गेटवर चढवलेल्या वेलावरील डबल मोगर्‍याच्या कळ्या हलकेच उमलु लागल्या होत्या अन त्याचा सुगंध आसमंतात हळु हळु दरवळु लागला होता. तो सुगंध मनात साठवुनच त्याने घरात प्रवेश केला. अनुची आई बाहेरच दिवाणावर बसलेली होती. हर्षुने तिच्या पायाला हात लावुन नमस्कार केला. " औक्षवंत व्हा!!! " असा आशिर्वाद तिने दिला. नाही म्हणलं तरी त्याला थोडे अवघडल्यासारखे झाले होते. आज प्रथमच तिच्या घरी तो आला होता. अनुच्या आईच्या लक्षात त्याचा अवघडलेपणा आला. अन तिनेच बोलायला सुरुवात केली.
" काय म्हणता हर्षित? कसे आहात? अनु सांगत असते हल्ली तुमच्याबद्दल. "
"  राधाच्या आई, मी छान आहे. पण प्लीज मला अहो जाहो नका ना बोलावु. राधा म्हणते तसे हर्षुच म्हणा नं. मी लहान आहे तुमच्या पेक्षा. "
" बर बाबा पण मी हर्षीत म्हणेन. "
" ओके चालेल. तुम्ही कशा आहात? तुमची तब्बेत कशी आहे? राधा सांगत असते तुमच्याबद्दल नेहमी. "
" अरेच्या माझ्या म्हातारीच्या गप्पा कशाला रे तुमच्यात? "
" राधाच्या आई असे नका न म्हणु. म्हातारे काय कुणी होत नाही काय? अन राधाच्या मनात तर कायमच तुमचा विचार चालु असतो. "
" हो रे पोर तशी खुप लाघवी आहेच. बर तुझ्या घरी कोण कोण असते? अनु कडुन याबद्दल मात्र काही उलगडा झाला नाही. अर्थात ती स्वताहुन कधी कुणाच्या फ़ारशा चौकशा करत नाही म्हणा. "
" ह्म, नाही तिला फ़ारसे काहीच माहिती नाहीय माझ्या घरच्यांबद्दल. अर्थात तिच्यापासुन काही लपवायचा उद्देश नाही. पण खरच असे कधी बोलणे नाही झाले. माझे आई बाबा एका बॅंकेत ऑफ़ीसर या पदावरुन निवृत्त झालेत. म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली. कारण आता बदल्यांच्या ठिकाणी जाणे झेपत नाही. माझी ताई ऋचा हिचे पाच वर्षापुर्वी लग्न झाले. ती असते कॅनडाला. अन माझा धाकटा भाऊ पिनाक मेडीकलच्या शेवटच्या वर्षाला आहे. "
" अरे व्वा !!! एज्युकेटेड फ़ॅमिली आहे म्हणायची. खुप छान वाटले ऐकुन. "
तोवर अनु कॉफ़ी अन बिस्कीटे घेउन आलीच. तिला पाहुन तो म्हणाला, " राधा घरात येताना मोगर्‍याचा दरवळ खरच मोहवुन टाकतो ग. "
" अरे तो मोगरा लावलाच आमच्या अनुने. आता या फ़ुलांच्या सिझनला खुप फ़ुले निघतात. आमची सर्व कॉलनी मोगर्‍याची फ़ुले घेउन जाते तरी खुप फ़ुले उरलेली असतात. मग अनु वेळ काढुन गाठीचे गजरे करते अन देवांच्या तसबिरी अन तिच्या बाबा अन दादाच्या तसबिरीला घालते. " हे सांगताना त्यांचा कंठ दाटुन आला होता. त्याने हलकेच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा तो आश्वासक स्पर्श त्यांना बरेच काही सांगुन गेला. बराच वेळ गप्पांमधे गेला. आता खरच खुप वेळ झाला होता. चला मी निघतो आता असे म्हणत तो उठलाच. येत जा रे अधुन मधुन असे अनुच्या आईने त्याला सांगितले. मग काय स्वारी खुशच. अनु त्याला सोडायला गेटपर्य़ंत गेली.
" राधे, तुझी आई छान आहे ग स्वभावाने. "
" हो रे खुप प्रेमळ आहे. ती मला आजवर कधीच नाही रागवलेली. "
" खुप कमी असतात अशी माणसे. बाय द वे तु कधी येशील माझ्या घरी? "
" तु नेशील तेव्हा. "
" लवकरच... " असे म्हणत तो गालातल्या गालात हसला. अन सुचकपणे म्हणाला " आता मलाही मोगर्‍याची काळजी घ्यायला हवीय. "
"  ..............."
"  काय ग ? खरे ना? "
" इश्श्य हे रे काय? "
"  अरे देवा आता तुझ्या इश्श्य मधे मला नको अडकवुस हा. आधीच खुप उशीर झालाय. मम्मी पप्पा वाट पहात असतील. "
"  बर ठीक आहे. ये तु. गुड नाईट. "
" ह्म, आज नाईट गुड जाणारच आहे. तुलाही गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स. "
बाईक स्टार्ट करुन तो निघाला अन अनु बराच वेळ तिथेच त्याच्या हळु हळु अस्पष्ट होत जाणार्‍या आकृतीकडे पहात राहिली. अगदी दिसेनासा झाल्यावर अनु घरात आली.
" आई कसा आहे माझा मित्र? "
" खुप चांगला आहे ग. अन खुप संस्कारी वाटतोय त्याच्या वागण्या बोलण्यातुन. "
" ह्म, खरय ग. आहेच तसा तो. बर चल ताटे घेउ का? बसुया का जेवायला? परत तुला औषधे पण घ्यायची आहेत ना? "
"  हो ग. चल आलेच मी आत हळु हळु. "
दोघीही जेवण करुन आपापल्या रुम मधे जाऊन निद्रेची आराधना करु लागल्या. पण छे आज दोघींनाही झोप येत नव्हती. अर्थात हर्षुची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनाही  एक प्रकारची हुरहुर लागुन राहिली होती. एकमेकांबद्दलच्या भावना मनात तरी स्पष्ट होत्याच पण अजुनही त्या एकमेकांजवळ बोलुन दाखवल्या नव्हत्या. राधाला आपल्याबद्दल प्रेम वाटत असेल का? कि नुसती मैत्री? अन सेम अनुला हर्षुबद्दल असेच वाटत होते. अर्थातच अजुन काही दिवस गेल्यावर हर्षु अनुजवळ आपल्या प्रेमाची कबुली देणार होताच. कारण अनु काही तिचा लाजरा स्वभाव बघता स्पष्ट बोलले असे वाटत नव्हते. तेव्हा पुढाकार हर्षुलाच घ्यायला हवा असे वाटत होते. रविवारचा दिवस सगळा आईबरोबर मस्त मजेत गेला.
सोमवारी पहाटेचे पाच वाजले अन अनुला जाग आली. खिडकीतुन पारिजातकाचा मंद सुवास येत होता, अन तिला हर्षुची आठवण तिव्रतेने झाली. अन त्याच तिव्रतेने तिने त्याला पहिला एस एम एस केला.
’ पारिजातकाच्या मंद सुवासानी तुझी सकाळ प्रफ़ुल्लीत होवो, शुभप्रभात. ’
अन त्याचाही एस एम एस आला.
’  सुप्रभात राधे. मोगर्‍यासारखी कायम तजेलदार अन हसमुख रहा. ’
आज मुड एकदम फ़्रेश फ़्रेश झाला. अन अनु घरकामाला लागली. सर्व आवरुन ती ऑफ़ीसला जायला निघाली. गाडी स्टार्ट करुन ती निघालीच पण गेटच्या बाहेर येउन थोडेच पुढे आल्यावर गाडी अचानक बंद पडली. अरे देवा हे काय झाले आता? आता उशीर होणार. काय करावे सुचत नव्हते. गाडी ढकलत आणुन तिने परत अंगणात लावली. अन आईला मी बसने अथवा रिक्षाने जातेय असे सांगुन बाहेर पडली. पटकन रिक्षा पण मिळेना. अन व्हायचा तो उशीर झालाच. आजवर कधीच उशीरा न गेलेली अनु अगदी बिचकतच ऑफ़ीसमधे गेली. पण आज बॉसची केबीन मोकळी पाहुन तिला हुश्श झाले. सर कधी रागवत नाहीत तिला कारण तिचे काम परफ़ेक्ट असे. पण तिला कधीच अशी उशीरा जायची सवय नसल्याने ती उगाचच कावरी बावरी झालेली.
सकाळची कामे उरकुन तिने चॅट विंडो ओपन केली तर हर्षुचा मेसेज आलेलाच. आल्यावर पिंग कर मी आहे ऑनलाईन म्हणुन.
"  हाय हर्षु. "
" हाय राधुडी. "
"  बोल कसा आहेस? "
" मी मस्तच, नेहमीसारखा. तु कशी आहेस? "
"  मी पण छान. पण आज लेट झाला रे. त्यामुळे उगाचच कसेतरी वाटतय. "
" का ग? का लेट झाला? "
" अरे गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. गेटबाहेर गाडी काढली अन थोडे अंतर जाताच बंद पडली. मग घरी परत जाऊन गाडी लावली अन रिक्षा करुन आले. "
"  ओह...!!!मग आता? "
"  आता काय? इथे पोचल्यावर घराजवळच्या आमच्या नेहमीच्या गॅरेज मधे फ़ोन केलाय. तो घेउन जातो म्हणाला गाडी अन संध्याकाळपर्यंत देतो म्हणालाय. "
" ओक्के. पण संध्याकाळी जाणार कशी तु? "
" मी बस अथवा रिक्षाने जाईन. "
" हो? मी असताना बस अथवा रिक्षा कशाला? मी नाही का सोडु शकत? अर्थातच इफ़ यु डोंट माईंड. "
" अरे हो.... तु सोडु शकतोस मला. आय डोंट माईंड. पण तुला माझ्यासाठी काम सोडुन लवकर बाहेर पडावे लागेल नं? "
" राधे आज मला फ़ारसे काम नाहीय. मी तुला पिक करु शकेन असे आत्ता तरी वाटतय. समजा तसे काही काम आलेच तर फ़ोन करुन कळवेन न तुला. "
" ओके बॉस... चलेगा, नही नही दौडेगा.... "
"  बर चल मी माझी कामे उरकायच्या मागे लागतो. दुपारी वेळ मिळाला तर पिंग करतो, नाहीतर मग डायरेक्ट संध्याकाळी भेटु. तुझ्या ऑफ़ीसजवळ. "
" ओके चालेल. चल बाय बाय बाय. "
" बाय. "
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अनु बाहेर आली तर तो येउन थांबलेलाच होता.
" चल निघायचे? "
"  हो चल. " म्हणत एक हात त्याच्या खांद्यावर ठेवत ती त्याच्या मागे बसली. आज कोणताही अवघडलेपणा तिच्या वागण्यात नव्हता. बाईकवरुन जाताना तो काही म्हणाला असे वाटुन ती बोलली, " काही म्हणालास काय मला? " अन हे बोलताना तिचा चेहरा थोडा त्याच्या कानाजवळ गेला. अन तिच्या केसांच्या बटा त्याच्या गालावर मुक्त संचार करु लागल्या. तिचा श्वासही त्याच्या कानाला जाणवला. तो क्षणभर धुंद होऊन गेला.
" काही नाही, मी म्हणालो की जाता जाता एक कॉफ़ी घेउया का? "
"  हो चल, घेउया कॉफ़ी पण फ़ार वेळ नको. आई काळजी करत बसेल. "
" हो ग राधुले. तुला वेळेत पोचवेन घरी मी. पण आज मला घरी यायचा आग्रह नको करुस. "
" का रे का? परवा काय त्रास झाला का माझ्या घरी तुला? "
" नाही ग, पण असे सारखे येणे बरे दिसणार नाही ग. "
" ह्म. ठीक आहे. "
अन मग थोडावेळ शांतता. बाईक एका कॉफ़ी शॉप समोर थांबवली. अन दोघेही आत गेले. फ़ॅमिली रुममधे जाउन दोघेही समोरासमोर बसले. ती शांत अन ओढणीच्या एका कोपर्‍याशी चाळा करत खाली मान घालुन तर तो तिच्याकडे एकटक बघत......
" काय ग रागावलीस? "
" का बुवा? "
" मी घरात येत नाही म्हणल्यावर? "
" छे मी का रागवु? तेवढा कुठला मला हक्क? "
" ए राधु नको ना रागवुस ग. तु रागवलीस की माझ्या काळजात कसे चर्र होते बघ. "
"  हो???? आला मोठा शहाणा. एवढी माझी काळजी आहे तर घरी का नाही येत म्हणालास? " अन कळत नकळत डोळे पाणावलेच तिचे.
" अग वेडे ऐक ना, आधी ते डोळे पुस पाहु. का मी पुसु? हे बघ.... मी एकदाच तुझ्या घरी आलेलो आहे अन ते पण परवाच्या दिवशीच. अन लगेच आज आलो काय वाटेल आईला अन शेजार्‍यापाजार्‍यांना पण? अन आजवर तुझ्या घरी बाबा दादाच्या माघारी इतर कोणी फ़ारसे आलेली नाही हे तु बोलली होतीस. त्यामुळे उगाच कुणी नावे ठेवायला नको ग माझ्यामुळे. समजुन घे ना जरा राणी. " असे म्हणत त्याने तिच्या ठेबलवर ठेवलेल्या हातावर आपला हात हलकेच ठेवला. अन ती त्या स्पर्षाने मोहरुन गेली. त्याचा असा झालेला पहिला स्पर्ष. अन ती झक्क लाजली. तिने आपला हात काढायला प्रयत्न केला नाही की त्यानेही. दोघेही एकमेकांकडे टक लावुन बघत असतानाच त्यांची तंद्री वेटरने भंग केली.
टेबलवर पाण्याचे ग्लास ठेवत त्याने विचारले " काय आणु साहेब?
" काही खायला मागवायचे का ग? "
" नको, नुसती कॉफ़ी. "
" हे बघ २ कॉफ़ी....  कडक आण मात्र. "
ओके म्हणत तो निघुन गेला.
" राधा तुझे केस नीट बांधत जा हं माझ्या गाडीवर बसताना. "
" का रे? नेहमी तसा स्कार्फ़ असतो माझा. पण आज गाडी नाही आणली त्यामुळे तो तसाच डिकीत राहिला. "
" अग तुझ्या बटांनी मगाशी माझ्या गालावर गुदगुल्या केल्या नं त्यामुळे माझा गाडीवरचा कंट्रोल जात होता न. "
" इश्श्य काहीतरीच काय रे हर्षु. "
" ए आता तु लाजुन माझ्या हॄदयाची धडधड अजुन वाढवु नकोस हं. "
" ............... "
दहाच मिनीटात कॉफ़ीचे दोन मग त्याने टेबलवर ठेवले. कॉफ़ी घेउन बिल पेड करुन ते निघालेच. बाहेर येउन पाहतात तो काय अवघ्या वीस मिनीटात वातावरण बदलेले होते. आभळ भरुन आलेले. तिला वेळेत घरी पोचवावे म्हणुन त्याने पटकन बाईक काढली. अन ते तेथुन निघालेच. अजुन एक दोन किलोमीतर जात नाही तोच मोठे टपोरे थेंब यायला सुरुवात झाली. अन थांबण्यासाठी आडोसा बघुन गाडी बाजुला घेइपर्यंत पाउस कोसळायला सुरुवात झाली. एका बंद दुकानाच्या पुढे असलेल्या मोकळ्य़ा शेड मधे जाऊन ते उभे राहिले खरे पण तिथे आधीच काही लोक येउन थांबल्यामुळे गर्दी झाली होती. त्यातच एका बाजुला पाऊस लागणार नाही अशी जागा पाहुन दोघे उभे राहिले. दोघात फ़ारसे अंतर नव्हतेच. दोघेही भिजले होते. तिच्या केसांच्या बटांमधुन ओघळणारे पाणी तिच्या गालावरुन खाली उतरत होते. तिने पर्समधुन रुमाल काढला पण नखशिखांत भिजलेल्या तिच्यापुढे तो एवढासा रुमाल बिचारा काय करणार? पावसाने जोर पकडला होता अन तो आता आडवा तिडवा कोसळु लागलेला. त्यात ती अजुन भिजत होती. अंग चोरुन ती अजुन जरा आत सरकली, पण छे ती भिजतच होती. आता गारवा चांगलाच आलेला अन भिजल्याने ती काकडु लागली.  तिची थरथर पाहुन त्याने आपला उजवा हात तिच्या उजव्या खांद्याजवळ घेउन हलकेच जवळ घेतले. दोघेही भिजलेले असले तरी त्याच्या जवळीकीने पण तिला जरा बरे वाटले अन ती अजुनच जरा जवळ सरकली, अन त्याने तिला आपल्या हाताने घट्ट लपेटुन घेतले. ती जवळीक तो स्पर्श दोघांनाही हवाहवासा वाटत होता. त्याच्या अर्धमिठीत असतानाच काही काव्यपंक्ती तिला आठवल्या....

पुष्कळदा ठरवल कि सांगाव तुला
पण धीरच होत नाही ,
मनातल सार मनातच रहात
ओठांवर काहीच येत नही !
अशी कशी काय हाक देऊ मी ,
सोप वाटतय का तुला ?
मैत्रीची रीत मनातली प्रित
सगळ्याचाच विचार करायचाय मला !

म्हणुनच अपेक्षा करतेय
तुच काही बोलण्याची ,
खर तर मी ही वाट पहातेय
तुला प्रतिसाद देण्याची !

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळल्यात ना तुला ,
सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत
थोडस समजुन घे नं मला !!!!!

थोड्याच वेळात पाऊस बारीक झाला पण अजुन पुर्णतः थांबला नव्हता. काही लोक निघाले. अजुन दहा मिनीटे पाऊस पुर्ण थांबायची वाट पाहु असे दोघांनी ठरवले. पण छे पाऊस काही थांबेना. शेवटी खुप उशीर होतोय निघुया असे म्हणत दोघेही निघाले. अनु पुर्णतः गप्पच होती पण त्याच्या पाठीवर डोके ठेवुन त्याच्या मागे त्याला घट्ट बिलगुन बसली होती. हलकेच हसत अन मागे तिच्याकडे वळून बघत गाडीला किक मारली अन ते निघाले. साधारण वीस पंचवीस मिनीटात अनुच्या घराजवळ त्याने तिला सोडले. बाईकवरुन उतरल्यावर मात्र तिला लाजल्यासारखे झाले. अन त्याच विचारात ती पटकन गेट मधुन आत आली अन थांबली. हे काय आपण त्याला आत ये सुद्धा म्हणालो नाही. अन परत फ़िरली. तिचा हा सारा अभिनिवेश तो डोळे भरुन पहात होता.
" ए चल ना आत. "
" नको ग राधु, किती भिजलोय बघ मी आता पाच दहा मिनीटात पोचतो घरी नाहीतर परत पाऊस सुरु झाला तर अडकुन बसेन. "
" ........................ "
काय नव्हते त्या मौनात............ नको ना जाऊस असा मला सोडुन. तुझ्याशिवाय सारे व्यर्थ वाटतय रे. पण तिच्या तोंडातुन शब्द मात्र फ़ुटले नाहीत. एक व्याकुळ नजर त्याला जाणवली.
" ए राधे..... असे काय ग? हे बघ मी गेल्यावर थोड्यावेळानी फ़ोन करतो. चालेल? "
" हो चालेल. नीट जा, सावकाश जा. " असे सांगुन बाय करुन ती घरात आली.
तीला पाहुन आईचा जीव भांद्यात पडला... " अनु आलीस बाळा.... हा पाऊस पाहुन वाटले आता तु अधे मधे चांगलीच अडकली असणार अन किती वेळ होईल देव जाणे. पण तु सुखरुप अन लवकर आलीस बयो. "
" अग आई, आज मी हर्षुमुळे घरी लवकर येउ शकले. आज माझ्याकडे गाडी नाहीय हे त्याला माझ्या बोलण्यातुन समजले. मग मला तो म्हणाला की मी तुला सोडतो घरी. अन आम्ही वाटेत असतानाच पाऊस सुरु झाला. एकेठिकाणी थांबेपर्यंत भिजलो. पाऊस कमी झाल्यावर मग निघालो. " का कुणास ठाउक पण कॉफ़ी शॉप मधे गेल्याचे सांगायचे तिने टाळले.
" अग मग त्याला आत बोलवायचेस ना? "
" आई मी बोलवणार नाही असे वाटले का? पण तो नाही म्हणाला, आधीच उशीर अन त्यात परत पाऊस लागला तर अजुन उशीर होईल म्हणुन मग मी फ़ार आग्रह नाही केला."
"  ह्म खरय ग. असो चल केस मोकळे करुन पुसुन घे. अन कपडे बदल. पावसाचे वातावरण अन तुला होत असलेला उशीर म्हणुन आज मी मुगाच्या डाळीची खिचडी अन कढी केलीय. गरम गरम खाऊन घेउ चल. "
" हो आई चल मी आलेच. " अन ती फ़्रेश व्हायला गेली ती विचार करतच. आई आज किचन पाशी कशी काय गेली? अन खिचडी कढी केली? उभे रहायची ताकद आली कुठुन हिच्यात? पण काही म्हणा हर्षुची भेट झाल्यापासुन आई पण फ़्रेश फ़्रेश दिसतेय. अन आज बर्‍याच वर्षानी आईच्या हातची खिचडी अन कढी खायला मिळणार म्हणुन ती खुपच खुश झाली. त्या आनंदातच ती जेवायला आली. अन आईला गळामिठी मारुन म्हणाली, " आई, आज किती वर्षानी मी तुझ्या हातची खिचडी खाणार आहे. मला आवडते तशी मऊ अन जरा पातळ खिचडी केली आहेस ना? "
" हो ग बबड्या. " अनुला ती कधी कधी बबड्या म्हणायची. पण बबड्या ही हाक गेल्या दोन तीन वर्षात तिने कधीच मारली नव्हती. त्यामुळे अनुला आज अगदीच आनंदाचे भरते आले होते.
" आई ग..... खिचडी बरोबर जरा पापड तळु? तु पण खाशील? "
" अग तळ ना. माझ्यासाठी दोन मुगाचे पापड अन तुला पोह्याचे पापड तळ. "
आज खुप दिवसांनी दोघीजणी एकमेकींशी बोलत बराच वेळ जेवत बसल्या होत्या. त्या नादात पर्समधे असलेल्या मोबाईलवर वाजत असलेला फ़ोन कळलाच नाही तिला. सर्व आवरुन दोघी झोपायला गेल्या तेव्हा तिने आपला फ़ोन चार्जींगला लावण्यासाठी काढला तेव्हा तिला हर्षुचे ५/६ मिसकॉल दिसले. अन एक मेसेज आलेला दिसला. ’ काय ग काही प्रॉब्लेम आहे का? फ़ोन उचलला नाहीस म्हणुन काळजी वाटली. आई बरी आहे ना? कितीही उशीर झाला तरी मला फ़ोन कर अथवा मेसेज मधे रिप्लाय दे. ’
आताशी साडेनऊच वाजत होते म्हणुन तिने फ़ोन करायचे ठरवले.
" हाय हर्षु. "
" हाय राधा....आई अन तु बर्‍या आहात ना ग? फ़ोन उचलला नाहीस मगाशी अन संध्याकाळी भिजलीस म्हणुन विचारले. "
" हो रे मी अन आई छान आहोत. आज आईने बर्‍याच दिवसांनी रादर वर्षांनी किचन मधे पाऊल ठेवले अन चक्क तिने आज माझ्या आवडीची मुगाच्या डा्ळीची खिचडी अन कढी केली मी घरी पोचेपर्यंत. सो आज आम्ही दोघी गप्पा मारत मनसोक्त जेवलो. अन मोबाईल पर्समधे अन पर्स माझ्या रुममधे. त्यामुळे मला कळलच नाही तुझा फ़ोन आलेला. "
" ओके ओके.... अन कढी खिचडी माझ्याही आवडीची आहे बरं का. त्यामुळे माझी आठवण काढत खाल्लीस ना? "
"  अरे व्वा तुला पण आवडते कढी खिचडी? ग्रेट..... अन हर्षु आठवण काढायला आधी विसरावे लागते ना? तु तर माझे मनच व्यापुन टाकले आहेस रे. "
" हायला हा काय कढी खिचडीचा इफ़ेक्ट आहे की काय? जोक्स अपार्ट पण माझ्याही बाबतीत असच आहे ग. मगाशी फ़ोन उचलला नाहीस तर किती शंका कुशंका मनात येउन गेल्या. मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणतात ना? "
" ह्म... अगदी खरय ते. बाय द वे काय करत आहेस आत्ता? "
" आजची अनुभवलेली संध्याकाळ परत परत इमॅजिन करतोय. "
" ...................... "
" काय ग????? "
" काही नाही. "
" मग गप्प झालीस. "
"  ह्म "
"  ह्म काय नुसते? बोल की. तुला नाही आवडली का आजची संध्याकाळ? "
" आवडली की. माझ्यासाठी तु, तुझ्याबरोबरच्या गप्पा, आत्ता नुकत्याच झालेल्या दोन भेटी हे खुपच महत्वाचे आहे. हेच माझे सुख अन आनंद आहे. हर्षु माझ्या या सुखाला कुणाची दृष्ट तर लागणार नाही ना रे ? "
" ए वेडु असं काही नसतं. अन जरी असेल तरी असे काहिही होणार नाही. "
" अरे तु जेवलास की नाहीस? गप्पांच्या नादात मी विचारलच नाही. "
" अग जेवलो मी नुकताच. हात धुतच होतो की तुझा फ़ोन आला. आज आईने भरलं वांगं केलेले. गरमागरम भाकरी, बरोबर दही खर्डा, अन मस्तपैकी कांदाभजी. "
" आहाहा... काय मस्त मेन्यु आहे रे. पण...... "
" पण? काय ग? "
" अरे मला वांग्याची भाजी नाही आवडत. "
" बापरे..... "
" वांगं आवडत नाही म्हणुन बापरे काय रे लगेच? "
" अग मला भरले वांगे खुप आवडते अन तुला आवडत नाही ना म्हणुन बापरे आले तोंडातुन. अन माझी आई एवढे मस्त करते ना भरले वांगे की तु नुसती बोटं चाटत बसशील. "
" ह्म.... "
" बरं आज आईने काही विचारले का? उशीर झाला वगैरे.... "
" नाही रे तिला पावसामुळे अंदाज होताच, मला उशीर होईल असा. पण मीच आल्या आल्या सांगितले की तु मला घरापर्यंत सोडले म्हणुन. मग तुला आत का नाही बोलवले असे म्हणाली."
" मग? "
" मग काय तु जे कारण सांगितलेस तेच तिला सांगितले. "
" ह्म्म्म ओक्के. "
" बर हर्षु ठेवु फ़ोन आता? "
" का ग ? कंटाळलीस? "
" तुझ्याशी बोलायला कंटाळा? छे आजिबात नाही. पण आता रात्र झालीय सकाळी लवकर उठावे लागते ना म्हणुन. अन एवढावेळ कुणाशी गप्पा चालल्यात म्हणुन घरी पण विचारतीलच की तुझ्या. "
" नाही विचारणार मला. मी माझ्या आई बाबांना सांगितलय तुझ्याबद्दल. "
" अरे बापरे काय सांगितलयस? "
" अग घाबरतेस काय एवढी? माझी राधा नावाची एक छानशी गोड मैत्रिण आहे असे सांगितलय. "
" ओके, मग? "
" मग काय? काही नाही. त्यांचे कशालाही फ़ारसे ऑब्जेक्शन नसते. फ़क्त त्यांची मान खाली जाईल असे वर्तन कुणाशीही नको एवढच त्यांचे संगणे असते. "
" ह्म.... खरय. माझी आई पण असच म्हणते. "
" बर चल राधे तुला झोप आलीय ना? झोप शांतपणे. गुड नाईट.... स्वीट ड्रीम्स..... बाय. "
" यस..... तुला पण स्वीट ड्रीम, गुड नाईट.... बाय बाय बाय... "
फ़ोन ठेवुन अनु आजच्या संध्याकाळच्या वातावरणात हरवुन गेली. कॅफ़े मधील कॉफ़ी, आपल्या हातावरचा त्याचा आश्वासक हात, त्याच्या पाठीवर डोके ठेवुन त्याच्या मागे बसलेलो आपण, पावसात एक हात लपेटुन त्याने हलकेच जवळ ओढलेले....... सारे काही.... परत अनुभवु पहात होती ती. अन मुख्य म्हणजे कुठेही त्याचा स्पर्श वखवखलेला वाटत नव्हता. आपण त्याच्या प्रेमात पडलो तर आहोत, पण त्याच्या स्पर्शाने तो पण आपल्यावर प्रेम करतोय याची जाणीव तिला झालेली होती. फ़क्त स्पष्टपणे दोघेही बोलत नव्हते. आईने पण तिचे मन जाणले होते पण तिही त्याबाबत बोलत नव्हती. हर्षुकडुनच प्रस्ताव आलेला बरा असे वाट्त असेल का तिला? छे काय कुठे विचार करत गेलोय आपण? चला आता झोपलच पाहिले नाही तर उद्या उशीर होइल असा विचार करुन ती झोपली.
हर्षुचा वाढदिवस जवळ आलेला. तशा एकमेकांच्या वाढदिवसाला चॅट मधुन मेलमधुन शुभेच्छा दिल्या जायच्याच. पण आता येणार्‍या वाढदिवसाला एक वेगळेच महत्व असणार होते. कारण आता नुसत्या मेलमधुन ग्रीटींग देउन अन अन चॅटवर शुभेच्छा देउन वाढदिवस साजरा होणार नव्हता तर नवलच. त्याच्या बर्थडेला काय गिफ़्ट घ्यावे अन तो कसा साजरा करावा याचा विचार ती गेले चार दिवस करत होती. अर्थातच त्या दिवसाचा थोडाच वेळ ती मागणार होती त्याच्याकडे. कारण त्याच्या घरी पण सेलीब्रेशन असणार होते. आईशी बोलुन ठरवावे का त्याला काय गिफ़्ट घ्यायचे ते, असाही विचार तिच्या मनात आलेला. पण तिने तो विचार थोडा बाजुला सारला. गिफ़्ट घ्यायचेय त्याला एवढेच सांगावे अन काय घ्यायचे आहे ते स्वताच ठरवावे, कारण आई गिफ़्ट घ्यायला नाही म्हणणार नाही याची तिला खात्री होती. पण काय घ्यायचे याचा विचार करुन करुन ती थकली. टाय पीन अन कफ़लिंक्स घ्यावी तर तो रोज काही टाय, सुट वापरत नाही. एखादी सेंटची बाटली घ्यावी तर काही दिवसातच ती संपणार. एखादा शो पीस घ्यावा तर तो घरात भिंतीवर अथवा शोकेसमधे जाउन बसणार. काहीच सुचत नव्हते. एखादा टीशर्ट घ्यावा का की एखादे त्याचे आवडते पुस्तक घ्यावे? छे काही म्हणजे काही सुचत नव्हते. विचार करकरुन ती थकली. अन त्याच्या वाढदिवशी त्याला भेटायचे हा विचार मनात येताच त्याच्याबरोबरची पहिली भेट आठवली. अन तिच्या डोक्यात पटकन काहीतरी क्लीक झाले. हायला हे कसे लक्षात आले नाही आपल्या? हर्षुचा वाढदिवस तारखेने जरी १५ ऑगस्टचा असला तरी तिथीने गोकुळ अष्टमीचा आहे. अन आपली पहिली भेट ही राधाकृष्णाच्या मंदिरात झालीय. तेव्हा त्याला एक छानशी कृष्णाची मुर्ती द्यावी. त्याला नक्की आवडेल. गिफ़्टचे फ़ायनल झाल्यावर तिने बरीच दुकाने पालथी घातली पण मनासारखी कृष्णाची मुर्ती काही मिळेना. कुठे बालकृष्ण तर कुठे राधासमवेत असलेला. कुठे पुर्ण काळा तर कुठे संगमरवरी कृष्णाची मुर्ती. खुप दुकाने फ़िरल्यावर शेवटी एका दुकानात ती आली. अन तिथे एका सुबक अशा मुर्तीने तिचे लक्ष वेधुन घेतले. मुर्ती होती संगमरवराचीच. पण शांत अशा गोमातेबरोबर होती. दोघांच्याही चेहर्‍यावरचे भाव अतिशय सुंदर होते. तिने ती मुर्ती पॅक करायला सांगितली. अन गिफ़्ट पॅक न करता तो पेपर वेगळा घेउन ती घरी आली. बॉक्समधुन मुर्ती काढुन आईला दाखवली अन हर्षुला वाढदिवसाचे गिफ़्ट घेतल्याचे सांगितले. आईला पण ती मुर्ती खुपच आवडली. अनुने ती मुर्ती व्यवस्थित पॅक करुन त्यावर गिफ़्ट पेपर पॅक केला. १५ ऑगस्ट शनिवारी आलेला असल्याने तिला सलग दोन दिवस सुट्टीच होती अन त्याचा तर काय पाच दिवसाचा आठवडा.
शुक्रवारी चॅटवर गप्पा मारताना तिने विचारले, " उद्याचा काय प्लॅन आहे रे तुझा? "
" उद्या? काही विशेष नाही ग. का ग? "
" नाही उद्या कुठे बाहेर जायचा प्लॅन तर नाहीय ना घरच्यांचा? सगळेच घरी असतील न सुट्टीमुळे, म्हणुन विचारतेय. "
"  नाही ग, घरीच आहे उद्या दिवसभर. तु जाणार आहेस का कुठे? कि ऑफ़ीसमधे झेंडावंदन आहे? "
"  छे नाही रे. ऑफ़ीसमधे नसते झेंडावंदन. अन मी कुठे जाणार आईला सोडुन? तसा माझ्या कॉलेज ग्रुपचा ट्रेकला जायचा विचार आहे. पण मला नाझी झेपत ते. न आईला एकटीला ठेवुन नाहीच. आधीच मी ऑफ़ीसला जाते तेव्हा ती एकटीच असते सो सुट्टीच्या दिवशी मी घरीच थांबते. "
" ह्म, ओके. पण तु का विचारलेस मला असे? "
" अरे उद्या तुझा वाढदिवस आहे ना? म्हणुन..... "
" ओहो.... लक्षात आहे तर तुझ्या... "
" असे रे काय? मी कशी विसरेन तुझा वाढदिवस? "
" बर सांग मला काय प्लॅन करुया उद्याचा? "
" हे बघ तुझा वाढदिवस आहे सो घरच्यांनी पण काहीतरी ठरवलच असेल ना? तेव्हा मला उद्याच्या दिवसातला एखादा तासभर दे. अन तो तास आपण कुठे जायचे ते तु ठरव. "
" अरे व्वा !!! आमची राधाराणी बरीच बोल्ड झालीय की. आज आपणहुन बाहेर जाउया म्हणतेय. लाजाळुचे रोपटे मोठं झालय म्हणा. "
" इश्श्य हे रे काय हर्षु. "
" ओय होय..... ते इश्श्य उद्यासाठी राखुन ठेव बरे. "
" ......................"
" बर ऐक.... उद्या तुला मी चार वाजता घरातुन पिक करेन अन संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत घरी आणुन सोडेन. चालेल? "
" क्काय? एवढा वेळ? "
" हो... का ग ? आई रागवेल एवढ्या उशीरपर्यंत नको म्हणुन? "
"  नाही रे, आई रागवणार नाही. मी तुझ्याबरोबर आहे म्हणल्यावर ती तशी निर्धास्त असेल. अन मला उशीर होणार म्हणल्यावर शेजारच्या कुणालातरी घरी बोलवुन घेईल ती. "  " ओके मग ठरलं तर. आणि आज घरी गेल्यावर आईशी सविस्तर बोल अन आपण रात्री बोलुच फ़ोनवर. "
" हो चालेल. रात्री बोलुया आपण. तु करशील फ़ोन का मी करु? "
" मी करेन माझे जेवण अन किचनमधली आवराआवर झाली की. "
" ओके चालेल. चल आता कामे आटपुया इथली. रात्री निवांत बोलु. "
" हो चल बाय.... "
संध्याकाळी घरी आल्यावर तिने आईला शनिवारच्या प्लॅनची कल्पना दिली. अन यायला रात्री ९ वाजुन जातील असे सांगितले. त्यावर आई म्हणाली, " अग जा तु पण फ़ार उशीर करु नकोस ग. "
" हो आई मी त्या आधीच यायचा प्रयत्न करेन ग. पण एवढा वेळ तु एकटीच घरात त्यामुळे मला कसेतरीच होतेय ग. "
" अनु नको काळजी करुस. दामले काकु येतील त्यांच्या घरचे आवरुन, माझ्याशी गप्पा मारायला. अन उद्या सकाळीच जास्ती्चा स्वैपाक करुन ठेव. नाहीतर मी करुन खाईन काहीतरी थोडेसे. "
" अग आई तु कशाल किचन मधे जातेस. मी करुन ठेवते सकाळीच. दामले काकुंना भाजी आमटी गरम करुन द्यायला सांग फ़क्त. "
" अग सारखे काय दुसर्‍याला त्रास. मला आता जमते काम. मी करेन. अन तसही आता मला सवय करुन घ्यायला नको का? आज ना उद्या तु जाणार सासरी. "
" हे काय ग आई? मी तुला माझ्या बरोबर घेउन जाईन. "
" अरे व्वा... बयो तु मस्त नेशील ग. पण तुझ्या सासरचे लोक? ते कसे तयार होतील? "
" मग मी लग्नच नै करायची. "
" असे नसते ग पोरी. "
" बर आता हा विषय नको बरे माझ्या लग्नाचा. त्याला अजुन अवकाश आहे. बर चल जेवायला बसुया? "
"  अरेच्या एवढ्या लवकर? काय फ़ोन यायचाय की काय त्याचा? " अनु अवाक.....
" आई............ तु कसे ओळखलस? "
" पोरी मांजराला वाटतं आपण डोळे मिटुन दुध पितोय......... असो हल्ली अधुन मधुन रात्री त्याचा फ़ोन येतो एवढे माहितेय मला. "
" हो... तीन चार वेळा आलेला. "
" बोल ग फ़ोनवर. मला माहितेय तु काही अगोचर नाहीस वागण्या बोलण्यात. माझा पुर्ण विश्वास आहे तुझ्यावर. "
" अन आई तुझ्या माझ्यावरच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. "
" माझी शहाणी बयो ती. " असे म्हणत आईने अनुची अला बला काढली. अन दोघीही आपापल्या रुममधे गेल्या.
रुममधे जाताच तिने हर्षुला फ़ोन लावला. बराच वेळ रिंग वाजत होती. त्याने काही फ़ोन उचलला नाही. काही कामात असेल म्हणुन तिने परत फ़ोन लावला नाही. ती त्याच्या फ़ोनची वाट पाहु लागली. पंधरा वीस मिनीटातच त्याचा फ़ोन आला.
" हाय राधा, सॉरी अग मी जेवायला बसलेलो अन जेवताना उद्याचे प्लॅनींग चालु होते. सो ..... "
" ओके रे.... सॉरी काय त्यात? "
" बर ऐक.... उद्या बद्दल आईशी बोललीस? काय म्हणाली? "
" हो बोलले मी. तिचा काहीच प्रॉब्लेम नाहीय. फ़क्त फ़ार उशीर करु नकोस एवढे म्हणाली. शेजारच्या काकुंना बोलावुन घेते म्हणालीय. "
" ओके. मग मी तुला संध्याकाळी चार ला पिक करेन. तिथुन आपण मंदिरात जाऊ, जिथे प्रथम भेटलो. नंतर मग जरा भटकु..... मग जेवण करु... आईस्क्रीम खाऊ मग तुला घरी सोडेन. चालेल? "
" हो चालेल की. "
" बाय द वे उद्या कोणता ड्रेस असणार आहे? "
" का रे? "
" काही नाही ग सहजच विचारतोय. "
" छे छे सहज नाही हं हे. "
" अग खरच. नेहमी तु पंजाबी सुटच वापरतेस? का जिन्स आणि टॉप पण वापरतेस? "
" जनरली पंजाबी सुट आणि तत्सम ड्रेस. जिन्स फ़्रेंड सर्कल बरोबर कुठे जायचे असेल तर अथवा प्रवासात. "
" अन साडी???? "
" साडी ऑकेजनलीच. काही फ़ंक्शन असेल तरच. "
" ह्म्म. "
" का रे ?"
" मी काही सांगितलं तर ऐकशील? "
" बोल ना. तु सांगितले अन मी ऐकणार नाही असे होइल का हर्षु? "
" उद्या साडी नेसशील? "
" ...................."
" का ग गप्प का? नाही जमणार का? "
" अरे तसे नाही रे. "
" मग कसे ग? "
" अरे बरेच महिने झाले मी साडी नेसली नाहीय ना त्यामुळे साडीची काहीच तयारी नसेल नाही म्हणून विचारात पडले. "
"  हात्तेच्या एवढच ना? उद्या सकाळपासुन दुपारी चार पर्यंत वेळच वेळ आहे की बाईसाहेब. "
" हो, पण उद्या दुकाने नसतील ना चालु साडी प्रेस करुन आणायची म्हणले तर. बट एनीवेज मी प्रयत्न करते. पण खरच नाही जमले तर रागवु नकोस. "
" नाही ग राधे मी तुझ्यावर नाही रागवु शकत ग. बर चल मस्त छान झोप तु आता. "
"  हो... गुड नाईट अन स्वीट ड्रीम्स. "
" बाय राधे गुड नाईट, स्वीट ड्रीम्स "
रात्री बाराला त्याला फ़ोन करावा की नको या विचारात ती झोपुन गेली. अन गजर लावल्याप्रमाणे बाराला काही मिनीटे कमी असतानाच तिला जाग आली. अन तिने बरोबर बाराला फ़ोन लावलाच.
" हर्षु..... वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा !!! तुझे आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे अन आरोग्यपुर्ण जावो. तुझ्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होवोत ही सदिच्छा. "
"  थॅंक्यु राधुले थॅंक्यु सो मच. आज तुच पहिली आहेस मला शुभेच्छा देणारी. "
" अरे व्वा.... घरी नाही कुणी विश केले अजुन? "
" अग करतात की. येतच असतील माझ्या रुममधे. पिनाक तर जाम तयारीत असतो. रात्री बारालाच केक कापतो आम्ही सगळ्यांच्या वाढदिवसाला. जाम मजा येते. "
"  मस्तच रे. बर चल ठेवते मी आता. एन्जॉय युवरसेल्फ़. अन परत एकदा मनापासुन शुभेच्छा. अन गुडनाईट स्वीट ड्रीम्स. "
"  ओक्के मॅडम.... परत एकदा थॅंक्स अन गुड नाईट स्वीट ड्रीम्स. "
फ़ोन ठेवुन अनु उद्याच्या दिवसाचा विचार करत हळु हळु निद्रादेवीच्या अधीन झाली. सकाळी तिला जाग आली तीच आईच्या हाकांनी.
" अनsssssssss ए अनु...... उठतेस न बाळा, सुर्य बघ डोक्यावर आला. कितीवेळ झोपणार आहेस? आवरायचे नाही का? आजची तयारी पण करायची असे ना ग? " आजची तयारी हे शब्द कानावर पडताच अनु ताडकन उठुन बसली. बघते तो काय आठ वाजलेले.
" आई काय ग हे मला लवकर उठवायचे नाहीस का? किती उशीर झाला, मी झोपलेय आज. "
" अग आज सुट्टी आहे न तुला म्हणुनच मी नाही उठवले आज. म्हणले रोजची धावपळ आहेच तुझी. झोपु दे आज निवांत. अन मी पण नुकतीच उठलेय. तुला आवडते तशी कॉफ़ी केलीय बघ. पटकन आवरुन ये. "
"  आई....... वॉव तु तर मला एकावर एक धक्केच देत आहेस. आलेच मी पाच मिनीटात. "
"  हो ये. नाश्त्याला काय करायचे ग? "
" आई मी करते नाश्ता. तु बस आता. पाय अन गुढगे दुखत असतील. "
" नाही ग.... मनाला आता जरा उभारी आलीय बघ. त्यामुळे दुखणे जाणवत नाहीय. "
" ओके. तरीपण नाश्ता मीच बनवते. काय बनवु सांग. "
" तांदळाच्या पिठाचे घावन बनवुया? त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी. जमेल तुला? "
"  यस. जमेल की कुठे दहा बारा लोकांचे करायचेय? आपण दोघीच तर आहोत. माझी झालीय कॉफ़ी पिउन तांदळाचे पिठ भिजवते अन सडा रांगोळी करुन आंघोळीला जाउन येते."
" हो चालेल. " असे म्हणत ती अनुचा विचार करु लागली. आपली पोर लाखात एक आहे. अकालीच आपल्या संसाराची जबबदारी तिच्या अंगावर पडल्यामुळे सगळ्या कामात तरबेज झालीय. स्वैपाकात सुद्धा तिला रुची आहे अन तिच्या हाताला चवही आहे. ज्या घरात पडेल त्या घराचे सोने होइल. देवा तिला तिच्या मनासारखा जोदीदार मिळुन सुखी होऊ दे पोर. आता तिला कोणत्याच दुःखाची झळ नकोय. माझे आयुष्य, माझे आजवरचे सारे पुण्य पोरीच्या पदरी पडु दे. म्हणत ओलावलेले डोळे हलकेच आपल्या पदराने पुसले.
तेवढ्यात आंघोळ आवरुन आलेल्या अनुने आईला डोळे पुसताना पाहिलेच.
" आई काय ग हे? का डोळ्यात पाणी? "
" काही नाही ग असच. चल मी तुला खोबरे खोवुन देते. " म्हणत ती किचन कडे वळली. अनुने आधी चणणी करुन घेतली अन गरम गरम घावन करुन आईला दिले. अन लगेचच दुसरे करुन आपणही घेतले. नाश्ता पोटभर झाल्यावर आता किचन मधे लवकर फ़िरकायला नको असा विचार करत ती संध्याकाळच्या तयारीला लागली. साडी कोणती नेसावी असा विचार करत ती कपाटामधुन एक एक साडी काढुन बघु लागली. ही नेसावी का ती नेसावी असा विचार करत खुप कन्फ़्युज झाली. अन तिने आईला हाक मारली.
" आई...... अग इकडे येतेस का जरा. मला कोणती साडी नेसावी समजतच नाहीय. तु सांग ना. "
" अरे व्वा आज साडी? का ग काय विशेष? "
" अग हर्षु म्हणाला काल रात्री की उद्या साडी नेसुन येशील का? मी बघु जमले तर येते असे म्हणालेय. कारण इस्त्री करायची तर दुकाने बंद आहेत आज. "
" अग तु हलकी अन सिल्क मधली साडी निवड. ज्याला इस्त्रीची गरज भासणार नाही अन तुला चार पाच तास त्या साडीत कंफ़र्ट वाटेल. "
"  ह्म्म मी तोच विचार करतेय. कारण मला काही फ़ारशी सवय नाहीय ना साडीची. "
" हे बघ ती गुलाबी रंगाची साडी आहे बघ अन त्यावर फ़िकट जांभळ्या रंगाचे नाजुक डिझाईन आहे ती बघ. त्याच्या काठ अन पदराला वर्क आहे जरा पण तेवडःयाने काही जड वाटणार नाही साडी तुला. "
" ओके तु म्हणतेस तर तीच नेसते. "
" बर वाढदिवसाला अजुन कुणी येणार आहे का ग? म्हणजे त्याच्या फ़्रेंडसर्कल मधले? "
" नाही ग आई. आम्ही दोघेच आहोत. नेहमी त्याच्या मित्रमंडळाबरोबर साजरा करतो पण यावेळी नाही कुणी. आम्ही दोघेच आहोत. अन संध्याकाळी मी लवकर येते तु नको काळजी करुस. "
" काळजी नाही ग. उलट खुप दिवसांनी तु अशी नटुन बाहेर जात आहेस त्यामुळे मला खुप बरे वाटतेय ग. बर चल आवर तुझे आता मी जरावेळ पडते आता. "
" हो. अन स्वैपाक मी करतेय तु आता उठु नकोस. शांत झोप जरावेळ. "
ती साडीला मॅचींग बांगड्या काढु लागली. कानात अन गळ्यात ती वेगळे असे कधीच घालत नव्हती. कानात सोन्याचे झुबे होते अन गळ्यात सोन्याची चेन. पण आज साडीवर मॅच असे खड्याचे कानातले, गळ्यातले अन बांगड्याचा सेट काढुन ठेवला. साडी नेसल्यावर ते घालुन आईला दाखवु बरे दिसत असले तर ठिक नाहीतर सोन्याचेच घालुन जाउ. असा विचार करुन ती बाकीचे आवरायला लागली. सुट्टी असल्याने बाकीची पण बरीच कामे होती. तरी काल संध्याकाळी आल्यावर मोगर्‍याच्या कळ्या काढुन त्याचा गाठीचा गजरा करुन ठेवला होताच तिने. त्यामुळे ते एक काम नव्हते. स्वैपाकपाणी आवरुन जेवण करुन ती जरा विश्रांती घ्यायला आडवी झाली. तोच हर्षुचा फ़ोन, " काय बाईसाहेब काय चाललय? जेवण झाले का? "
" हो झाले की. जरा विश्रांती घेत होते. तुझे झाले जेवण? "
" छे. मला कुठाय भुक? आज आपण बराच वेळ बरोबर असणार आहोत ना त्यामुळे आधीच पोट भरलय ग. "
" आहाहा !!! जेव बरे तु आधी. अन आईंनी छान गोडधोडाचा स्वैपाक केला असेल नं तुझ्या वाढदिवसानिमित्त्य? मग असे का? चल मी फ़ोन ठेवले आधी जेऊन घे. "
" अग मी जेवलोय. तुझी गम्मत करत होतो. पण हे ही खरय की माझे पोट भरलेय त्यामुळे मी नेहमीप्रमाणे जेवलो नाहीय. संध्याकाळसाठी भुक शिल्लक ठेवलीय. "
" हो क्का? बर बर... "
" बर हे बघ आवरायला घे तु आता. मी शार्प चार वाजता पोचेन तिथे. अन त्यावेळी थांब जरा अजुन आवरायचेय माझे असे म्हणशील. "
" आत्ता कुठे दोन वाजत आहेत. एवढ्या लवकर कशाला ते? "
" तुम्हा बायकांना आवरायला वेळ लागतो ना म्हणुन म्हणालो ग. "
" हो???? असा काय अनुभव आहे रे तुला बायकांचा? "
"  अग आमच्या बहिणाबाईंचा आहे की अनुभव फ़ार लांब कशाला जायला हवयं? अन आईला पण वेळ लागतो. घरातलेच दोन जबरदस्त अनुभव असताना इतर अनुभव कशाला घेत बसु? "
"  ए पण मला नाही ह वेळ लागत आवरायला. जास्तीत जास्त अर्धा तास पुरेसा होतो मला. "
" बघुया.... कळेलच चार वाजता. चल मी ठेवतो फ़ोन. बाय...."
"  हो बघच तु. तु यायच्या आधी मी तयार असेन. बाय. "
अनुने उशीर व्हायला नको म्हणुन जरा लवकरच आवरायला घेतले. साडी नेसुन झाल्यावर केसांचा एक सैलसर शेपटा घालुन अन चेहर्‍यावर हलकासा मेकअप करुन तिने काढुन ठेवलेली खड्याची ज्वेलरी घालायला घेतली तेवढ्यात आईच तिच्या रुममधे आली.
" अनु  आवरले का ग बाळा? "
" हो आई.... आवरत आलेले आहेच. पण ही खड्याची ज्वेलरी कशी दिसतेय सांग ना या साडीवर? का सोन्याचे झुबे अन चेनच घालु? "
"  अग खुप छान दिसतेय तुझ्यामुळे ज्वेलरीला शोभा आलीय. "
"  आई तुझे आपले काहीतरीच हं. तुला माझे सगळच सुंदर दिसत असते. "
" अग खरय अनु बाळा, आईला आपले मुल कसेही असले तरी चांगलच दिसतं गं पण खरच आज तु खुप गोड दिसतेयस. माझीच दृष्ट लागायची. "
"  आई......... नाही दृष्ट लागत ग. आईची आपल्या लेकराला कधी लागते का दृष्ट? "
" बर बाई... तु बोलण्यात थोडीच ऐकणार आहेस? चल आवर पटकन पावणेचार झालेत. येइलच तुझा मित्र एवढ्यात. "
" हो आई. अन वेळेचा पक्का आहे तो. "
अनु बाहेर हॉलमधे आवरुन बसलीच होती. हर्षुला आणलेले गिफ़्ट एका कॅरी बॅगमधे घेउन. छोटीशी मनीपर्स ज्यात मोबाईलपण बसेल अशी पण घेतली तिने. अन केस विसकटु नयेत म्हणून बरोबर स्कार्फ़ पण होताच.
" अग अनु काल केलेला गजरा नाही घातलास? "
" अरेच्या हो की, राहिलाच बघ. बरे झाले आठवण करुन दिलीस. " म्हणत ती फ़्रिजमधे ठेवलेला गजरा काढुन केसांच्या शेपट्यावर माळतच होती की बाहेर हॉर्न वाजलाच हर्षुच्या गाडीचा. पटकन बाहेर येउन दरवाजा उघडत होतीच तोवर तो आलाच दरवाज्यापर्यंत. दोघेही एकमेकांकडे बघतच उभे. बघ आवरले की नाही वेळेत असे भाव अनुच्या चेहर्‍यावर. तर त्याच्या डोळ्यात काय सुंदर दिसतेस आज तु. कलीजा खलास झाला. अन ते भाव जाणुन ती लाजलीच. तो आत आला. अनुची आई हॉलमधेच बसलेली होती.
" कशा आहात राधाच्या आई? "
" मी छान आहे. तुला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा. तुला उदंड दिर्घायुरारोग्य लाभो. "
" धन्यवाद. " म्हणत तो त्यांचे आशिर्वाद घ्यायला नमस्काराला वाकला.
" आई आज थोडा उशीर झाला तर चालेल ना? राधाला मी घरापर्यंत आणुन पोचवेल व्यवस्थित. "
" हो रे चालेल. मला बोललीय तसे ती. पण तरीही फ़ार उशीर नको. आज काही एक किस्से ऐकतो न आपण. म्हणुन काळजी वाटते रे. "
" हो लवकर येतो. नाही फ़ार उशीर करणार. चल राधा निघुया? "
" हो चल.... आई जाऊन येते ग मी. "
" हो बाळा. "
त्याच्या बाईकवर बसताना जरा तारांबळच झाली तिची. आज साडी होती ना. जरा सावरुनच बसायला हवय. त्याच्या खांद्याचा आधार घेत ती त्याच्या मागे बसली. घरातुन बाहेर पडुन बाईकपर्यंत येताना त्याने सांगितलेले की राधे आज स्कार्फ़ नको बांधुस, त्यामुळे तिने डोक्याला स्कार्फ़ बांधला नव्हता. तिचे केस त्याच्या मानेशी अन गालाशी हळुवार स्पर्श करत उडत होते. केसांचा गंध अन त्याच बरोबर मोगर्‍याचा गंध त्याला धुंद करुन टाकत होता. घरापासुन मंदिरापर्यंतचे अंतर संपुच नये असे त्याला वाटत होते. घरापासुन देवळापर्यंतची १५ ते २० मिनीटेच पण आज चक्क ३० ते ३५ मिनीटे लागली ते सुद्धा ट्रॅफ़िक नसताना. अन अनुने पण नंतर त्याच्या खांद्यावरुन हात काढुन त्याच्या पोटाला घरुन बसली. त्यामुळे ती अजुनच त्याच्या जवळ आली. राधा कृष्णाचे मंदिर आल्यावर त्याने बाईक थांबवली तरी ती अजुन बसुनच होती गाडीवर.
" काय मॅडम आज काय गाडीवरच बसायचा विचार आहे की काय? " अन ती भानावर आली. दोघांनी मंदिरात जाऊन मुर्तीसमोर नमस्कार केला. अन अनुने त्याचे गिफ़्ट त्याच्या हातात ठेवले ते राधाकृष्णाच्या साक्षीनेच.
" राधे काय आहे ग हे.? "
" बघ न तुच ओपन करुन. अन सांग मला आवडले का गिफ़्ट ते. " बॉक्स ओपन करुन त्याने आतली कृष्णाची मुर्ती बघताच जाम हरकुन गेला तो.
" राधे हेच गिफ़्ट घ्यावे हे कसे काय सुचले ग? "
" खरं सांगु? एक तर तुझा वाढदिवस तिथीने गोकुळ अष्टमीचा. अन आपली पहिली भेट ही याच मंदिरात झालेली. म्हणुन माझ्या मनात आले तुझी ज्याच्यावर एवढी भक्ती आहे  त्या कृष्णाची मुर्तीच तुला द्यावी. आवडली? "
" म्हणजे काय? हे काय विचारणे झाले? अर्थातच आवडली. खुप सुंदर आहे मुर्ती. थॅंक्यु सो मच. " मुर्ती परत बॉक्स मधे ठेवुन प्रसाद घेउन ते तळ्याच्या काठी आले. तेथील कठड्यावर बाकावर बसुन तेथील विहंगम दृष्य निरखत असतानाच एकमेकांचे हात हातात कधी गुंफ़ले गेले हे त्यांचे त्यांना समजलेच नाही. अजुन सुर्यास्ताला वेळ होता. पण आकाशात हळु हळु रंगांनी दाटी करायला सुरुवात केलेलीच होती. अनुची नजर समोर अन त्याची अनुच्या चेहर्‍यावर. तो आपल्याकडेच पाहतोय हे लक्षात आल्याबरोबर अनुने त्याच्याकडॆ पाहिले अन तीने सलज्ज स्मीत केले अन तिची नजर आपोआपच खाली झाली. एका हाताने तिची हनुवटी घरुन तिचा चेहरा वर घेतला. पण तिचे डोळे मिटलेलेच होते. एका हातात तिचा हात होताच. तो हात वर घेउन त्यावर हलकेच आपले ओठ त्याने टेकवले. ती अजुनच लाजली.
" हर्षु...... "
" काय ग? "
" इथेच काळ थांबावा असे वाटतेय. "
" बस? एवढ्यातच? "
" इश्श्य म्हणत आपल्या दोन्ही हातात तिने चेहरा झाकुन घेतला. "
" अग किती लाजतेस तु? अशा लाजणार्‍या तुला मी असाच बघत बसेन. अन मग आपली पार्टी राहुन जाईल. आई वाट बघेल......................................."
" ............................"
" चल निघुया? की इथला सुर्यास्त पाहुन जायचे? "
" नको चल. मग अजुन उशीर होईल. "
अन मग ते तेथुन निघाले ते आईस्क्रीम पार्लरमधे आले.
" राधा तुला कोणता फ़्लेवर सांगायचा? "
" मला सर्वच फ़्लेवर आवडात. कोणताही सांग. "
" मला पण सगळेच फ़्लेवर आवडतात पण बटरस्कॉच जास्त आवडतो. "
" ओके मग तेच सांग. तु कधी नॅचरल्सचे सिताफ़ळ आइस्क्रीम खाल्लेस? "
" नाही ग. "
" आहा... काय मस्त असते ते. तु कधी ट्राय करुन बघ. "
" ओक्के. आज आपण बटर स्कॉच खाउया. " अन त्याने दोन बटरस्कॉच मागवले. गप्पा मारत आईस्क्रीम खाताना तिच्या ओठांच्या कडेला लागलेले त्याने खुण करुन सांगितले अन तिला रुमाल पुढे केला. अरे असु दे आहे माझ्याकडॆ रुमाल म्हणत ती पर्समधुन काढणार एवढ्यात त्याने पुढे होऊन स्वताच्या रुमालाने पुसलेच. अन ती झक्क लाजलीच. आईस्कीम खाऊन बाहेर आल्यावर चला आता नॅचरल्स मधे जाऊया असे हर्षु म्हणताच राधाने त्याला नकार दिला.
" आत्ताच आपण भरपेट आइस्क्रीम खाल्लय. परत कधीतरी ते खाउ. "
" ओके. सिताफ़ळ आईस्क्रीम उधार राहिलं. त्यानिमित्ताने परत एक भेट. "
" इश्श्य जा बाबा. "
" कुठे जाउ मी? चला आता घराकडं. आई वाट बघत असेल तुझी. उशीर झाला तर मला रागवेल. " आत्ताशी कुठे साडेसहाच वाजत होते. याने तर नऊपर्यंत सोडतो घरी असे मला अन आईलापण सांगितले होते. ती जरा हिरमुसली. तिला तशी पाहताना त्याला जरा हसुच फ़ुटत होते. पण तिला एक सरप्राइज द्यायचे ठरवलेले असल्याने त्याने गालातच हसत विचारले, " काय ग नाही का जायचे घरी? अजुन भटकायचेय का? " त्यावर थोडेसे हिरमुसुन ती म्हणाली, " नको चल घरी जाउ. आई वाट पहात असेलच. "
" ओके चल. " म्हणत त्याने बाईक स्टार्ट केली. ती मागे बसली खरी. पण आता वीस पंचवीस मिनीटातच त्याचा सहवास संपणार. परत कधी भेटु असे निवांत कोण जाणे. असा विचार करुन डोळे भरुन आले. त्याच विचारात त्याची बाईक केव्हा थांबली कळलेच नाही. ती गाडीवरुन उतरली खरी पण परिसर काही ओळखीचा वाटेना. तिच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव. हे काय कुठे आलोय आपण? अन त्याने डोळ्यानेच सांगितले काळजी नको करुस. बाईक पार्क करुन तिला त्या घराच्या पोर्च मधे घेउन आला. अजुनही ती संभमावस्थेतच होती. पण त्याच्यावर तिचा अपार विश्वास होता त्यामुळे ती त्याच्या मागुन जाऊ लागली. त्याने बेल वाजवली, अन आतुन एका पन्नाशी उलटलेल्या एका गृहस्थाने दार उघडले. तीच्या चेहर्‍यावर अजुनही प्रश्नचिन्ह.
तो आत गेला अन उंबर्‍याच्या बाहेर असलेल्या तिला म्हणाला, " वेलकम टु माय होम राधा. " ती अवाकच. आश्चर्यचकीत झालेल्या तिला त्याने विचारले, " कसे वाटले सरप्राईज? " पण जवळच ते दार उघडलेले गृहस्थ असल्याने ती बोलली नाही. तिने लाजुन मान खाली घातली.
" राधा हे माझे बाबा. अन बाबा ही राधा जिच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. " अनुने त्यांना वाकुन नमस्कार केला तशी मनोहरपंतांच्या मनात आले पोर संस्कारी दिसतेय, अन त्यांनी तिला सुखी रहा असा आशिर्वाद दिला. ती सगळीकडे कावर्‍या बावर्‍या नजरेने पहात होती. तेवढ्यात पिनाक बाहेरुन आला.
" हाय राधा....मी पिनाक. हाउ आर यु? बाय द वे तु दादाची मैत्रिण आहेस पण मी तुला ए राधाच म्हणणार चालेल ना? "
" आय अ‍ॅम फ़ाईन. चालेल की मला तुम्ही पण राधा म्हणलेले. " ती मनात विचार करतच होती की हर्षु आज मला घरी आणणार आहे हे घरातील सर्वांना माहिती दिसतेय. मला का नाही बोलला हा.
तेवढ्यात पिनाक म्हणाला, " राधा आपण बहुदा बरोबरीचे आहोत तेव्हा मला अहो जाहो न करता तु नुसते पिनाक म्हण अथवा माझे निक नेम बंटी आहे त्याने हाक मारलीस तरी चालेल. "
" ओके चालेल मी पिनाक म्हणेन. "
" फ़्रेंड्स? " असे म्हणत त्याने हात पुढे केला. हर्षुकडे बघत त्याने डोळ्यानी होकार देताच तिनेही हात पुढे केला.
एवढ्या सरप्राईजने ही एवढी भांबावलीय अन आता पुढच्या सरप्राईजने काय होईल हिचे असा विचार करत त्याने तिला आत यायला सांगितले. ती निमुट त्याच्या मागे गेली. त्याने तिला किचन मधे नेले तर काय......... चक्क तिची आई.... तीला भोवळ यायचीच बाकी होती. अन हर्षु तिच्याकडे बघत मिश्कील हसत होता. तिच्या चेहर्‍यावरचे होणारे फ़ेरफ़ार बघताना त्याला जाम मजा येत होती.
" आई अग तु कशी इथे? अन एकटी कशी आलीस? "
" अग हो हो..... दम घे जरा. " तेवढ्यात हर्षुच्या आईने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला अन आधी पाणी पी अन शांत बस बरे जरा असे म्हणाल्या. ती अजुनही प्रचंड संभ्रमीत होती. हे काय चाललय काय? आई कशी काय इथे? तेवढ्यात हर्षुने त्याच्या आईची ओळख करुन दिली. " राधा ही माझी आई. " राधाने त्यांनाही वाकुन नमस्कार केला. " सुखी रहा " असा आशिर्वाद त्यांनी पण दिला. तिच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या " राधा बस इथे निवांत. अन आजिबात गडबडुन जाऊ नकोस. मी सांगते तुला सगळे. हर्षु तु पण बैस. बाबा अन पिनाकला पण बोलव.  तुलाही एक गम्मत कळेल आता. "
" अग आमच्या हर्षीतने तुझ्या अन त्याच्या मैत्रीबद्दल तुमच्या झालेल्या दोन चार भेटीबद्दल सारे काही सांगितलेय. मग त्याला आम्ही सर्वांनीच सांगितले की तुझ्या वाढदिवसाला राधाला घरी घेउन ये. तो हो म्हणाला पण मग रात्री पोचायला उशीर होणार अन तु आईची काळजी करत बसणार अन आई तुझी, म्हणुन मग त्याच्याकडुन पत्ता घेउन पिनाकला घरी पाठवले अन तुझ्या आईला इथे बोलवुन घेतले. कशी वाटली आयडिया?  अन सरप्राईज? "
" मी... मला तर काहीच सुचेनासे झालेय हे सारे एवढे अकल्पीत आहे ना...... "
" अग खरी गम्मत तर पुढेच आहे. " इती हर्षुच्या आई.
" ते काय? "
" ही अश्विनी तुझी आई माझी बालमैत्रिण आहे. आम्ही एका वर्गात एका बाकावर बसुन शिकलोय. ते ग्रॅज्युएट होइपर्यंत एकत्रच होतो. आज जेव्हा तिला घरी आल्यावर पाहिले ना तेव्हा हिला कुठेतरी पाहिलय असे वाटत होते पण हिचा चेहरा मोहरा अगदीच बदललाय त्यामुळे मी पटकन ओळखु शकले नाही. पण हि मात्र अग उर्मी तु ??? असे म्हणत मला गळामिठीच मारली. अन मला अशी मिठी मारणारी माझी एकमेव जोवलग मैत्रिण म्हणजे अश्विनी.. अन आशु ना तु? हो तुच असणार, तुझ्याशिवाय माझी कोणतीच मैत्रिण मला अशी गळामिठी मारत नाही असे म्हणत ती मिठी अजुनच घट्ट झाली "
"  आई......................? "
" हो पोरी, आज कित्येक वर्षानंतर मला माझी मैत्रिण भेटली. माझे लग्न झाले अन मी सासरी जशी आले तशी संसारात एवढी गुरफ़टले की कुणाशीच फ़ारसा संपर्क राहिला नाही. नंतर माझे आई बाबा गेले अन दादाने पण गाव सोडले नोकरीसाठी. मग तर काहीच संपर्क नाही. अशात आज इथे आल्यावर उर्मीला भेटल्यावर सगळे शालेय अन कॉलेज जीवन
डोळ्यासमोर तरळुन गेले. माझी जिवाभावाची सखी मला भेटली. खरच त्या जगन्नियंत्याची लिला अगाध आहे. "
" आई आय अ‍ॅम सो हॅप्पी फ़ॉर यु. " म्हणत डोळ्यात आलेले आनंदाश्रुंना वाट देत ती आईच्या कुशीत शिरली. मायलेकींची ती अशी भेट बघताना सारेच हळवे झाले होते. सगळ्यांचे डोळे आनंदाने भरले होते.
" आशु एक विचारु तुला? राग नाही ना यायचा? "
" उर्मी आजवर मी कधी तुझ्यावर रागवलेय का ग? "
" तसं नाही ग. पण मला वाटले उगाचच. "
" नाही ग, बोल तु. "
" हे बघ आशु, आपली मैत्री आपल्या कॉलेजचे एक भुषण होती. अन ही मैत्री आता नात्यात बांधली जावे असे माझे मत आहे. अर्थातच तुझ्या मनात असेल तरच. "
" उर्मी..........म्हणजे? मला नाही समजले. " साधारण अंदाज होताच पण तरिही गैरसमज नकोत म्हणुन अनिच्या आईने विचारले.
" आशु, हर्षीत काही माझ्या शब्दाबाहेर नाही  अन मला आजवरच्या त्याच्या राधाबद्दलच्या बोलण्यातुन असे वाटतेय की राधा त्याच्या मनात भरलीय. अन बहुदा राधाच्या मनातही हेच असावे असे तो मला म्हणालाय. आपली मुले आपल्या परस्पर एकमेकांना असे काही विचारायची नाहीत. म्हणुन मीच पुढाकार घेतेय. काय रे मनोहर बरोबर बोलतेय ना मी? " असे आपल्या पतीकडे वळुन त्या म्हणाल्या. त्यावर मनोहरपंतांनी आपली संम्मती दर्शवली अन म्हणाले, " अश्विनीताई, अगदी बरोबर बोलतेय उर्मीला. पण आपल्यासमोर तरी त्या दोघांनी या प्रस्तावाला सहमती दाखवावी असे मला वाटते. "
" उर्मी तु तर माझे टेंशनच कमी केलेस ग. राधे तुझे काय मत आहे यावर? " त्यावर राधा अजुनच लाजली अन आईच्या पदराआड चेहरा लपवत त्या पदराआडुन हळुच सलज्ज मुद्रेने हर्षुकडे बघत राहिली अन नेमके त्याच क्षणी हर्षुने तिच्याकडे पाहिल्यावर ती अजुनच लाजेने लाल झाली. एवढ्यात पिनाक तिच्या जवळ येत, " मग काय राधा आज दोन दोन नाती मिळाली आपल्याला. कधी येतेस माझी वहिनी बनुन या घरात? "
" पिनाक तु पण ना........ "
" चला तोंड गोड करुया सर्वांची. " म्हणत उर्मीलाने सर्वांच्या हातावर ठेवली. अन ती सर्वांची जेवणासाठी पाने घ्यायला लागली. अन अनु लगेचच उठुन तिच्या मदतीला गेली. अन उर्मीला कौतुकभरल्या नजरेने आपल्या भावी सुनेला न्याहाळत राहिली. " राधा बस तु. मी घेते पाने. अन जेवल्यावर लगेच निघायचे नाहीय हा. " मधेच पिनाक म्हणाला, " हो राधा, आज सगळे खुप गप्पा मारु. त्यापेक्षा तुम्ही दोघी इथेच रहा ना. " अन आईकडे बघत म्हणाला, " आई चालेल ना ग? "
" अरे लबाडा आधी रहा म्हणतोस अन मग मला विचारतोस होय? " " पण आशु अन राधा खरच मुक्काम करा तुम्ही दोघी, सकाळचा नाश्ता करुन निघा. चालेल ना? "
" उर्मी चालेल ग. तुझ्याशी खुप खुप बोलायचय मला. अर्थात त्यासाठी रात्र अपुरीच आहे. पण हे ही नसे थोडके. पण....."
" पण काय ग आशु? "
"  अग अनुला एवढावेळ साडीची सवय नाहीय ग. त्यामुळे आम्ही गप्पा मारुन उशीरा का होईना घरी जातो. हर्षु अथवा पिनाक सोडतीलच ना गाडीने घरी एवढ्या रात्री. "
"  आशु राधाची काळजी नको करुस. ऋचाचे ड्रेस आहेत इथे स्वछ धुवुन इस्त्री करुन ठेवलेले. ते होतील तीला व्यवस्थित. अर्थात तिला चालणार असेल तर. "
" मावशी चालेल ग मला. "
" हो ना? थांब जरा तुला हर्षु ऋचाच्या रुममधे घेउन जाईल. तिथे कपाटात असलेल्या ड्रेसपैकी कोणताही ड्रेस घाल अन ये लवकर जेवायला. " तो काय आता तिला एकटीला गाठायची संधीच पहात होता. तो अनुला ऋचाच्या रुममधे घेउन गेला. अन तिचे कपाट दाखवले. त्यातील एक ड्रेस घेउन ती मागे वळणार तोच हर्षुने अलगद तिला मिठीत घेतले.
"  राधे..... "
" ह्म ....."
"  खुश आहेस ना ग तु? "
" ह्म. वेगळे सांगायला हवय का रे हे? माझ्या चेहर्‍यावर माझा आनंद माझी खुशी दिसत नाहीय का तुला? "
"  दिसतेय ग राधे पण मला तुझ्या मुखातुनच ऐकायचेय. "
" हो रे हर्षु. आज मी खुप खुप खुश आहे. माझा या अडीच तीन वर्षातला माझा सखा आता आयुष्यभरासाठी माझाच होणार आहे त्यापेक्षा अजुन वेगळे ते काय सुख? "
" आय लव्ह यु राधा....... "
" आय लव्ह यु टु हर्षु....... "
" हर्षु मला काही सुचलय.... सांगु? "
" हो सांग की... "
" चल त्या खिडकीजवळ जाउय़ा. "
अन खिडकीतुन आकाशाकडे बोट दाखवत तिच्या तोंडुन सहजच काही काव्यपंक्ती बाहेर पडल्या.

या चांदण्या आहेत ना नभी
त्या उतरतील तुझ्या अंगणी
घेउन येतील सुख समृद्धी
आणि बरसात आनंदाची

भावना ह्या राधेच्या सर्व
फ़क्त उमलतात हर्षसाठी
आणि हि आसवे ओघळतात
फ़क्त तुझ्या मिलनासाठी

नयनातल्या माझ्या ज्योती
ओवाळतील तुला मनोमनी
मागतील तुझे दिर्घायुष्य
ईश्वराकडे क्षणोक्षणी

आजच्या या मंगल दिनी
औक्षण करते मी शब्दांनी
स्वीकार करुन त्याचा तु
धन्य करावे मला या जीवनी


अन त्याने तिला अजुनच आपल्या मिठीत जखडत तिच्या कपाळावर आपले ओठ टेकले. एक गोड शिरशिरी तिच्या अंगावर आली. दोघेही काही वेळ असेच एकमेकांच्या मिठीत होते . पण अनु भानावर आली अन म्हणाली, " हर्षु चल बाहेर सगळे वाट बघत असतील आपली. "
" हो. चल.... ये आवरुन तु पटकन. " म्हणत परत एकदा तिच्या गालावर ओठ ठेवत तो बाहेर गेला. ती अजुनही थरथरत होती. तिच्या गालावर गुलाब फ़ुललेले होते. चेंज करुन बाहेर येताच तिच्या फ़ुललेल्या चेहर्‍याने तिचे गुपीत सर्वांनाच कळले. अन सर्वांनीच तिला चिडवुन बेजार केले. त्यात पिनाक सर्वात पुढे.
आज हर्षुच्या वाढदिवसानिमित्त्य जेवणात खास त्याच्या आवडीचे गुलाबजाम होते. अन जेवणानंतर आइस्क्रीम. अन ते सुद्धा नॅचरल्स चे सिताफ़ळ. अनुने हर्षुकडे पाहिले. अन तो नजरेनेच म्हणाला बघ तुला आजच खाऊ घातले ना तुझ्या आवडीचे आइस्क्रीम? तिनेही गालातल्या गालात स्मित केले. त्याने सर्वांनाच राधाने दिलेले गिफ़्ट दाखवले. सर्वांनाच ते खुप आवडले. उर्मीलाला तर खुप कौतुक वाटले राधाचे. तिने ती सुंदर असलेली कृष्णाची मुर्ती हर्षुला त्याच्याच रुममधे ठेवायला सांगितली.
सगळे हॉलमधे येउन बसले. आज अनुच्या आईला कोणताच त्रास जाणवत नव्हता. जणु तिच्या आनंदाने दुखण्यावर विजय मिळवला. सर्वांच्या गप्पा, हसणे खिदळणे चालुच होते. अन राधा - हर्षुच्या कुणाच्याही नकळत खाणाखुणा.... तर बर्‍याच वर्षांनी दोन सख्या एकमेकींना भेटल्याने त्यांच्या गप्पा संपतच नव्हत्या. अनुच्या बाबांचे अन दादाचे कळल्यावर उर्मीलाच्या काळजात अगदी चर्र झाले. कसे काय आपल्या या सखीने सोसले सगळे याच विचारांनी ती हेलावुन गेली. पण आता मात्र हा विषय बंद अन आता झाले ते झाले त्यावर आता दुःख नको.... आता राधाच्या अन हर्षुच्या लग्नाचा विचार कर असे सांगुन तिने अश्विनीच्या खांद्यावर हात ठेवला. अन मनोहररावांनी पण तेच सांगितले. अनुचा आवाज छान आहे असे तिच्या आई कडुन समजल्यावर सर्वांनीच तिला गाण्याचा आग्रह केला. अन तिनेही फ़ारसे आढेवेढे न घेता, आज प्रितीला पंख हे लाभले रे झेप घेउनी पाखरु चालले रे हे गाणे म्हणायला सुरुवात करताच गाणे डुएट असल्याने हर्षुनेही त्यात साथ दिली. सर्वांनाच दोघांनी उत्स्फ़ुर्त म्हणलेले हे प्रेमगीत खुप आवडले. साधारण १२ ते १ वाजेपर्य़ंत गप्पा मारुन उर्मीलाच्या रुममधे तिघीही झोपायला गेल्या. तर मनोहरपंत अन हर्षु आज त्याच्या रुममधे. एवढी झोप डोळ्यावर आली तरीही दोघी अजुनही बोलतच होत्या. अनु मात्र लगेचच झोपुन गेली.
सकाळी सगळ्यांना जाग आली तीच श्री राधे शरणम मम हे पंडित जसराजजींच्या भजनाने. हर्षुच्या घरात सर्वांचेच आवडते भजन हे. अन अनुने अन तिच्या आईने प्रथमच हे भज ऐकले. त्या दोघींना पण हे खुप आवडले. सर्वांचीच सकाळची आन्हिके उरकुन झाली. अन नाश्त्याला आत किचन मधे डायनिंग टेबलजवळ आले. उर्मीला कांदेपोह्याच्या डिश भरत होती न अनु त्यावर ओले खोबरे कोथिंबीर घालुन सर्वांना देत होती. अन मनोहरपंत म्हणाले " अरे व्वा आज काय पारंपारीक कांदेपोह्याचा कार्यक्रम काय? " त्यावर अनु लाजली. न हर्षु तिच्याकडे बघतच राह्यला. सर्वांचे पोहे खाउन झाले आणि त्या दोघी निघाल्या. निघताना अनुच्या आईने त्या सर्वांना आपल्याकडे यायचे आमंत्रण दिले. हर्षु गाडीने त्यांना सोडायला होताच तयार. वीस मिनीटातच त्याने त्या दोघींना घरापाशी सोडले. तो पण आज न बोलवता त्यांच्याबरोबर घरी आला.
" हर्षु थोड्याच वेळात स्वैपाक तयार होईल. जेवुनच जा तु आता. "
" नको ग राधे आई वाट पहत बसेल. "
" मी सांगु का मावशीला तु येथेच जेवत आहेस ते. "
" अग मी येथे जेवणार आहे त्याला ती थोडीच नाही म्हणणार आहे? "
" मग झाले तर. सांग फ़ोन करुन येथेच जेवत आहेस ते. "
" ओके मॅम... सांगतो..... अन काय ग तु माझ्या आईला आई म्हण ना. मावशी का म्हणतेस? "
" अरे आईला बहिण नाही त्यामुळे मी अजुन कुणालाच मावशी म्हणलेले नाहीय. अन तसही अजुन आपले लग्न व्हायचेय तोपर्यंत मला मावशीचे सुख अनुभवु दे न. "
" जैसी आपकी मर्जी .... "
" बर चल मी किचनमधे जातेय पटकन स्वैपाक उरकते. मग आपण बसु जेवायला. "
" हो चालेल की. पण मी पण येतो न आत. तुझा स्वैपाक होईपर्यंत मी गप्पा मारतो. कारण आई पण झोपल्यात बहुदा त्यांच्या रुममधे. "
"  बर चल. " दोघेही किचन मधे गेले.
" हर्षु एक विचारु का रे? "
" हो विचार की बिन्दास्त. "
" तु कसे काय मला प्रपोज केले नाहीस? मला वाटलेले तुच करशील प्रपोज. "
" खरे सांगु का? एक भिती होती मनात. तु हो म्हणशील का नाही त्याबद्दल. अन तु नाही म्हणाली असतीस तर मी पार कोलमडुन गेलो असतो. मला जाणवत होते की तुही माझ्यावर प्रेम करतेस ते. पण तरिही मनाच्या एका कोपर्‍यात होतेच की ही नुसती मैत्रीही असु शकते. म्हणुन मग मी आईजवळ माझे मन मोकळे केले. तुझ्याबद्दल मी तिला सर्व काही सांगितलेले. मग तिने तुला घरी बोलवावे असे सुचवले. पण मी असे अचानक कसे सांगणार ना की चल बै घरी. मला काहीच सुचत नव्हते. मग आईनेच प्लॅन आखला. अन त्यात तुही आपणहुन म्हणालीस आपण बाहेर जाऊ मग काय...... "
"  ह्म्म अन आईला बोलवायचे कसे सुचले? "
" अग तु माझ्याबरोबर असणार, मग आपण घरी जाणार साहजिकच उशीर होणार अन मग आई तुझी वाट पहात एकट्या बसणार. मग मीच आईला बोललो की त्यांना पण बोलवुया म्हणुन. मग आई म्हणाली पिनाक जाऊन आणेल मग मी अजुन निर्धास्त झालो. पण त्या दोघी बालमैत्रिणी असतील असे स्वप्नातही नव्हते. ते मात्र मला आईने सगळ्यांना सांगितले तेव्हाच कळले. "
" हो रे.... बरे झाले आईला तिची मैत्रिण भेटली ते. इथे दामले काकु असतात. पण तरीही फ़रक पडतोच ना रे. "
" हो ना. अन राधे एक सांगु तुला? "
"  हो सांग ना. "
" राधु तु आता तुझ्या आईची काळजी आजिबात करु नकोस. जशा त्या तुझ्या आई आहेत तशाच माझ्याही. त्यामुळे त्यांची जबाबदारी आता माझी. आपल्या लग्नानंतर ती एकटी कशी राहील? काय करेल? असे विचारही मनात नकोत. त्या आपल्या बरोबर आपल्या घरी राहतील. "
" हर्षु............ तु माझ्या मनावरचे ओझे कमी केलेस रे. आईने मागे एकदा माझ्या लग्नाचा विषय काढलेला तेव्हापासुन मी विचार करत होते. एक दडपण आलेले मनावर. आईला सोडुन जायच्या विचाराने गेल्या कित्येक रात्री मी जागुन काढलेल्या आहेत. "
" हो ना? मग आता कसलाच विचार नको. "
" अरे हो पण ती इतकी स्वाभिमानी आहे न, कशी काय तयार होईल याला, मला नाही माहित. "
" ते काम आई कडे लागले. तु त्याबाबत आजिबात काळजी नको करुस. अन याबद्दल आत्ताच आईंना काही बोलु नकोस. "
" ओके. नाही बोलत मी. "
" गुड गर्ल.... "
" बर महारज चला आता जेवायला पाने घेते. आईला पण बोलवुन आणते. "
"  तु घे पाने तोवर मी आणतो उठवुन आईंना. "
साधासाच केलेला स्वैपाक. पोळी, बटाट्याच्या काचर्‍यांची सुकी भाजी, आमटी, भात. पण त्यानेही तो खुश. कारण त्याच्या राधेने केलेला स्वैपाक प्रथमच जेवणार होता तो.
" अनु अग हर्षु आज आपल्याकडे पहिल्यांदाच जेवणार आहे तर काही गोड नाही का करायचे? शिरा अथवा खीर. नाहीतर मग कोपर्‍यावरुन आम्रखंड तरी आणायचेस. "
" अग विचार होता तोच पण मग अजुन उशीर झाला असता ना? अन तुझी औषधे पण घ्यायचीत. काल तु बरोबर औषधे न आणल्याने कालचा डोस घेतला नाहीस तु. "
" अनु मी आता एकदम मस्त आहे बघ. माझ्या मनाला एक उभारी आलीय आता त्यामुळे औषधे पण कमी होतील हळू हळु. "
"  अरे व्वा राधाच्या आई... ही तर खुपच चांगली गोष्ट आहे. तरी पण डॉक्टरना कन्सल्ट करुनच कमी करा औषधे. "
" हो रे बाळा..... "
" तुम्ही आज अगदी माझ्या आईसारखे म्हणालात. ती पण कधी कधी मला बाळा अशी बोलते. "
" हो का? अरे आमच्या बर्‍याच आवडी अन सवयी लहानपणापासुनच खुप सारख्या आहेत. त्यामुळे कधी कधी आम्हाला जुळ्या म्हणुन चिडवायच्या मैत्रिणी. "
" आई .... इट्स इंटरेस्टींग. मला पण सांग ना ग आता तुमच्या मैत्रितले किस्से. "
" हो जरुर... अग पण आता स्वैपाक होऊन जाईल गार. तेव्हा आधी जेउया. अन हो हापुसचा मुरांबा काढ जरा. "
" वॉव.... अगदी माझ्या आवडीचा आहे हं.... "
" हो? पण आमच्या अनुला नाही फ़ारसा आवडत. "
"  का ग राधे? "
" अरे आंब्याच्या फ़ोडीची चव त्या मुरांब्याला येते का? "
"  ते वेगळे अन हे वेगळे. "
" बर पोरांनो जेवा आता लवकर. "
जेवण करुन मात्र लगेचच तो जायला निघाला.
नंतरच्या आठवड्यात मनोहर आणि उर्मीला अनुच्या घरी आले. आधी कळवुनच आल्याने अन जेवायलाच या असे अनु आणि तिच्या आईने आग्रहाने सांगितल्याने त्या दोघांसाठी छान बेत केला होता. इतर नेहमीच्या स्वैपाकाबरोबरच उर्मीच्या आवडीच्या ओल्या नारळाच्या करंज्या केल्या होत्या अन तिच्याकडुनच समजल्याने मनोहररावांच्या आवडीचे उकडीचे मोदक. ते मात्र अनुच्या आईने हातावर केले होते. बेत पाहुन दोघेही खुश. " राधा आत्तापासुनच सासु सासर्‍यांना खुश करतेस की काय? " इती उर्मीला अन मनोहरपंत.
" नाही हो असे काही नाही हं मावशी अन काका. आज प्रथमच तुम्ही घरी येत आहात ना? मग जरा वेगळा बेत केला इतकचं. "
" हो ग पोरी. पण तरीही दुसर्‍याच्या मनातले मात्र तु पटकन समजुन उमजुन घेतेस याचे मला फ़ार कौतुक वाटते हो. "
" मावशी, हरबर्‍याच्या झाडावर चढवु नकोस हं. "
" बरं बरं हं.... "
जेवणावर आडवा हात मारुन तिघेजण हॉलमधे येउन बसले. " आशु आज आम्ही तुझ्याशी लग्नाबद्दल काही बोलायला आलो आहोत. " अन क्षणभर अनुच्या आईच्या मनात धडधड सुरु झाली. अर्थातच तिचा तिच्या मैत्रीवर अन उर्मीवर विश्वास होताच त्यामुळे ती जरा निशंक झाली खरी पण शेवटी ही लग्नाबद्दलची बोलणी. " अग आशु एवढी काही टेंन्स होऊ नकोस ग. रिलॅक्स रहा. " अन मनोहरपंतांनीही त्याच अपेक्षेने अनुच्या आईला नजरेनेच आधार दिला. तेवढ्यात अनुही किचनमधले आवरुन बाहेर आली. आपल्याच लग्नाबद्दल बोलणी चालु असताना आपण हॉलमधे जावे की न जावे या विचारात ती थबकली असतानाच उर्मीलाने तिला बोलावलेच.
" आशु आणि राधा तुम्हा दोघींशीही आम्हाला बोलायचे आहे. अन कोणतेही टेंशन नको. हे बघ राधाच्या लग्नाबद्दल तुम्ही कुणाशी बोलला आहात का? कारण घरात तुम्ही दोघीच आहात. सगळ्या कार्याचा भार दोघीच कसे काय पेलवणार आहात तुम्ही? आशु तुझा भाऊ अन वहिनी इथे येउन कितपत मदत करतील? म्हणजे त्यांना त्यांच्या नोकरीतुन किती सवड मिळेल इथे येउन रहायला ? कारण लग्नघर म्हणले की मनुष्यबळ महत्वाचे आहे. तसेच भाऊजींच्याकडचे कोणी आहेत का येणारे? "
" उर्मी, दादा अन वहिनी अन अनुची आत्या यांनाच मी काल फ़ोनवरुन सारे बोलले आहे. दादा म्हणाला त्याला फ़ार आधी नाही जमणार पण वहिनी अन मुली येउ शकतील. अनुची आत्या आणि त्यांचे मिस्टर मात्र पंधरा दिवस आधी येतो म्हणालेत. त्यामुळे बाहेरची कामाची जबाबदारी वन्संचे मिस्टर घेतील. घरची कामे वन्सं, मी अन वहिनी. दादाच्या मुली पण तशा मोठ्या आहेत तेव्हा त्या पण मदतीला असतीलच घरच्या अन बाहेरच्या कामासाठी. "
" ओके गुड. पण अश्विनीताई तरीही काहीही मदत लागली तर निसंकोच सांगा. " इती मनोहरपंत.
" बर आशु तुझ्या डोक्यात काल प्लॅन आहे? राधाचे लग्न कसे करायचे आहे? माझ्या मते लग्न अगदी साधेपणाने व्हावे. आमची पंधरा वीस माणसे अन तुमची पंधरा वीस माणसे. तुझे काय मत आहे? "
" उर्मी आर्थिक परिस्थितीचा विचार करुन जर तु असे म्हणत असशील तर मात्र तशी काळजी नको. अग यांचा बिझनेस असल्याने भरपुर कमवुन शिलकीत ठेवले आहे. अन बिझनेस पार्टनरशिपमधे होता. पण हे गेल्यावर मी अथवा अनु काही त्यात लक्ष घालु शकणार नाही त्यामुळे पार्टनशीप रद्द केल्याने बरेच पैसे मिळालेत आणि ते दादाने व्यवस्थित गुंतवले आहेत. त्यामुळे लग्नासाठी पैशाची ददात असणार नाही. मला माझ्या लेकीची अन जावयाची सारी हौस मौज करायची आहे. मला तरी या दोघांशिवाय अन तुमच्याशिवाय कोण आहे ग ? "
" अग हो ग... पण साधेपणाने लग्न करुन सुद्धा तु हौस मौज करु शकतेसच की. अन मी मुळात पैशापेक्षा मनुष्यबळाचा विचार करतेय. अन वहिनी अन वन्संनी येउन मदत केली तरी अशा कितीशा त्या पुरेशा पडणार? लग्नघर म्हणजे काय कमी कामे असतात का? "
" ह्म, हा मुद्दा पटतोय तुझा मला. अर्थातच आमची काही फ़ार माणसे असणार नाहीतच. अन जी काही आहेत ती सारी ऐनवेळी कार्यालयातच येणारी आहेत. "
"  ओके. आपण असे करु तुझी जे कोणी येणारे नातेवाईक आहेत त्याची यादी कर. त्या सर्वांना लग्नाचे बोलावणे करायचे का हे पक्के कर. यात काही मदत हवी तर सांग. मी करते मदत.... अन त्याआधी महत्वाचे म्हणजे साखरपुडा. तो कधी करुया? "
"  तुझ्या सार्‍या नातेवाईकांच्या सवडीने तारीख ठरव. कारण साखरपुड्याला अनुच्या मित्रमैत्रिणींशिवाय आमच्याकडचे कोणी येणार नाहीत. "
" चालेल.... मग लवकरचाच मुहुर्त पाहुन आपण साखरपुडा करुन घेउ. काय ग राधा तुझे काय मत आहे या सगळ्या चर्चेवर? "
" मावशी तुम्ही मोठे जे ठरवाल ते योग्यच असेल ग. "
" ओके तर मग अश्विनीताई अन आमच्या होणार्‍या सुनबाई कोणतीही काळजी करु नका. काही मदत लागली तर हक्काने सांगा. "
" होय हो भाऊजी. तुम्ही दोघेच तर आहात आता जवळचे. "
" चल तर मग आशु आम्ही निघतो आता. बराच वेळ झाला."
उर्मीला अन मनोहरपंत निघाले. लग्नाचे आलेले टेंशन या दोघांनी घालवल्याने दोघीही जरा निश्चिंत झाल्या होत्या. अनुने पण आपल्या सगळ्या ग्रुपला लग्नाबद्दल सांगितले होते. कविता तर खुप खुश होती. तिच्या बेस्ट फ़्रेंडचे लग्न ठरले होते. सर्वजण हर्षुला भेटायला उत्सुक होते. पण अनुने सार्‍यांनाच साखरपुड्याला बोलवले होतेच त्यामुळे सारेजण त्या दिवसाची वाट पहात होते. मधल्या काळात हर्षु कंपनीच्या कामासाठी बंगलोरला जाऊन आला. त्या वेळी दोघेही फ़ोनवरुन संपर्कात होतेच. किती बोलु अन काय बोलु असे होऊन जायचे दोघांना. येताना त्याने अनुसाठी एक सुंदरसे गिफ़्ट आणलेले. ते तिला देउन केव्हा एकदा तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखतो असे त्याला झालेले. पण आल्यावर कंपनीत रिपोर्टींग अन त्या कामासंदर्भात मिटींग्ज यामुळे त्याला अनुला भेटायला सवडच मिळत नव्हती. रात्री फ़ोनवर बोलणे व्हायचे तेवढेच. अन अशातच तो दिवस उजाडला पण. अनुची मैत्रिण कविता तिला छानसे सजवायला होतीच. अन ती तर दोन तीन दिवस आधी रहायलाच आली होती. तिनेच अनुला मेहंदी काढली. तिचा पार्लरचा कोर्स झाला असल्याने ब्युटी ट्रिटमेंट पण दिल्या. साखरपुड्यासाठी अनुने कविताच्या मदतीने एक छान साडी खरेदी केली. पिवळसर गोल्डन रंगाच्या साडीला चॉकलेटी लाल रंगाचे काठ अन पदर अन त्यावर नाजुक कलाकुसर. कविताने अनुचा छान मेकप करुन तिला साडी नेसवुन केसांची सुंदर हेअरस्टाईल केली. त्यावर मोती अन फ़ुलांची सुरेखशी गुंफ़ण केली. अनुची आई आपल्या लेकीकडे बघतच राहिली.
" काकु खरच आज अनुची मीठ मोहर्‍यांनी दृष्टच काढा. आपलीच दृष्ट लागायची. किती सुंदर दिसतेय. "
" हो ग. आलेच मी थांब जरा. " त्या मीठ मोहर्‍या आणायला किचनकडे गेल्या. तोपर्यंत उर्मीलाने त्या तिघींसाठी पाठवलेली गाडी आलीच. बाकी सारे मित्रमंडळ डायरेक्ट हर्षुच्या घरीच येणार होते. सकाळचा कार्यक्रम असल्याने सगळेच वातावरण प्रसन्न होते. उर्मीलाने सर्वांच्या मदतीने घर खुप छान सजवले होते. सारेजण अनुच्या येण्याची वाट पहातच होते की गाडी दारात उभी राहिली. अनुला पाहुन उर्मीला इतकी अवाक झाली की हिच का आपली राधा असा प्रश्न तिला पडला. हर्षुच्या आत्या, मावशी, मामा अन काका आणि त्यांची कुटुंबे सारीच हजर होती. उर्मीलाने अनुची अन तिच्या आईची सार्‍यांनाच ओळख करुन दिली. मग सर्वांनाच तिने वाकुन नमस्कार केला. तिची नजर मात्र इकडे तिकडॆ भिरभिरत होती. हर्षु कुठे दिसतोय का हे ती पहात होती अन ते जाणुन की काय हर्षुच्या आलेल्या बहिणी तिची चेष्टा करत होत्या. काय वहिनी आमच्या दादाला शोधतेस ना? पण तो तुला आता भेटणारच नाही...... ए वहिनी किती लाजतेय बघा..... सगळ्यांच्या चेष्टेने अनु मात्र लाजुन चुर. पण तिने सगळ्या बहिणींची ओळख करुन घेतली. तरी तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होतेच. ते ओळखुन की काय कुणीतरी तिला ऋचा आली नसल्याचे सांगितले. तशी ती थोडी हिरमुसली. पण परदेशी असलेल्या ऋचाला आत्ता अन परत लग्नाला यायला जमणार नसल्याचे कळल्यावर ती अजुनच खट्टु झाली. हर्षुकडुन तिने ऋचाबद्दल खुप ऐकले होते. बहिण भावात अपार प्रेम होते. एकमेकाबद्दलच्या बारीक सारीक गोष्टी पण परस्परांना सांगितल्या जायच्या. ऋचाताई येणार नाहीत म्हणल्यावर हर्षुला काय वाटले असेल याची कल्पना तिला होतीच. अन तोच विचार करत असताना हर्षु रुममधुन बाहेर आला अन तिच्याकडे बघतच राहिला. सारे असल्याने नजरेनेच तु आज खुप सुंदर दिसतेस अशी पावती देउन रिकामा झाला. ती पण त्याच्याकडॆ बघत राहिली. किती देखणा दिसत होता तो. मरुन कलरची शेरवानी त्याला खुप छान दिसत होती. तिनेही त्याला नजरेनीच पावती दिली. त्यांचा हा नजरेचा खेळ कविता अन मित्रमंडळ अन त्याच्या बहिणी पहातच राहिल्या. हर्षुच्या आत्याने उर्मीलाला दोघांनाही काळी तिट लावायला सांगितली.
कार्यक्रमाला सुरुवात झाली. एकमेकांना अंगठी घालुन पेढा भरवला. उर्मीलाने प्रथेप्रमाणे रुपयाचे नाणे कुंकवात बुडवुन तिच्या कपाळी लावले. दोघांनी जोडीने सर्वांना नमस्कार केला.  जेवणासाठी पाने घेइपर्यंत दोघांना देवाला जाउन यायला सांगितले. दोघेही अर्थातच त्यांच्या नेहमीच्या राधाकृष्णाच्याच मंदीरात गेले. मंदीर तेच पण आज दोघांनाही ते वेगळे भासत होते. मुर्ती तीच पण त्या मुर्तीमधे एक वेगळेच तेज दिसत होते. नमस्कार करुन एकमेकांचा हात हातात घेउन मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. नेहमीच्या तलावाकडे जाऊन बसले ते हात हातात घेउनच. आता हे हात कधीच सोडायचे नाहीत असा पणच जणु त्यातुन व्यक्त होत होता. अन अनुचे मन परत एका कवितेत गुंगुन गेले.

तुझे गीत गाताना वाटे
सुर कधीच संपु नये
चंद्र नभाचा पाहता वाटे
रात्र कधी संपुच नये
तुझे मधुर स्वप्न पाहता वाटे
नयन कधी उघडु नये
तुझ्या संगतीत असता वाटे
विरह कधीच येउ नये
तुझ्याच बरोबर जीवन जगतान
मृत्यु कधीच येउ नये

" राधे...."
" ह्म.... "
" खरच आज खुप सुंदर दिसतेयस तु. "
" तु पण खुप रुबाबदार दिसत आहेस. "
" ह्म.... राधे, आज खरच ताई इथे असायला हवी होती ग. तसही पिनाकने वेब कॅमवर सारा सोहळा दाखवलाय पण तरिही........ "
" हो रे.... मला वाटले त्या येणार आहेत. "
" अग साखरपुडा अन लग्न यात बराच अवधी आहे न मग एवढे दिवस तिला नाही इथे थांबता येणार न म्हणुन. "
" ए आपण असे करुयात का? "
" कसे ग राधे ? "
" आज जेवण झाल्यावर त्यांच्याशी वेबकॅमवर बोलुयात? "
" अरे ग्रेट. काहीच हरकत नाही. तिलाही आवडेल. "
"  ओके चल निघुया आता? सगळी वाट पहात असतील आपली अन जेवायची खोळंबली असतील. "
" हो चल. " दोघेही आज मोठ्या गाडीतुन आले होते.
" राधा एक सांगु? "
" ह्म बोल ना. "
" मला खुप मैत्रिणी आहेत. पण खरच आजवर कोणाही मैत्रिणीबद्दल असे वाटले नाही जे तुझ्याबद्दल वाटले अन एक मैत्रिण म्हणुनही कोणीही लेडीज आज माझ्या शेजारी अथवा मागे बाईकवर पण कुणीही बसलेली नाहीय. अगदी सुरुवातीपासुनच मला तुझ्याविषयी ओढ वाटत होती, आपले खुप जुने काही नाते असावे असे वाटायचे पण कधी बोलायची हिंम्मत नाही झाली. असे वाटायचे की समजा तुझ्या मनात जर माझ्याबद्दल तशी ओढ नसेल अन तु दुखावली गेलीस तर एक मैत्रिण गमावुन बसेन मी. "
" हर्षु माझ्याबाबतीतही असेच होते. जेव्हा तु मला रिक्वेस्ट पाठव्लीस ना तेव्हाच मला जाणवले की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे. या व्यक्तीशी ओळख करुन घ्यायला काहीच हरकत नाही. अन खरे सांगु? तु म्हणायचास ना की मी का भिते प्रत्यक्ष भेटीला? तर आजवर असे प्रसंग वाचलेत त्यामुळे एक भिती वाटायची सुरुवातीला. मी तर तुझ्यावर मन जडवुन बसले होते. अन जर तु खरच एखादी फ़सवी व्यक्ती निघाला असतास ना तर मी कोलमडुन गेले असते. माझा माणसांवरचा त्यांच्या चांगुलपणावरचा विश्वास नक्कीच गेला असता. मी खरच आज खुप सुखी आहे की मला तुझ्यासारखा समंजस जोडीदार मिळाला अन मुख्यतः तुझ्या घरची सर्वच माणसे खुप छान आहेत. "
" ए तुझ्या घरची काय म्हणतेस ग? आपल्या म्हण ना आता. "
"  अरे हा सॉरी... आपल्या घरची माणसे खरच खुप छान आहेत. प्रेमळ आहेत अन खुप समजदार आहेत. "
"  हो हे मात्र खरे आहे. आई अन बाबांनी आम्हा तिघांवरही खुप छान संस्कार केले आहेत. "
" हो अन तुम्हा सर्वात एक कमीटमेंट जाणवते, न सांगताच एकमेकांच्या मनातले ओळखता तुम्ही. "
" खरय अगदी. अन तु पण तशीच आहेस थोडीफ़ार आपल्या घरात पटकन सामावुन जाशील. " एवढ्यात घर आलेच. सारेजण या दोघांची वाटच पहात होते. हसत खेळत चेष्टामस्करीत सर्वांची जेवणे झाल्यावर दोघांचेही मित्र मैत्रिणी अन आलेले नातेवाईक सर्वांचा निरोप घेउन गेले अन घरात उरले फ़क्त घरचे पाच जण.
" उर्मीला तु अन राधाच्या आई आता विश्रांती घ्या. बच्चे लोग बसतील गप्पा मारत अथवा त्यांना घ्यायची असेल विश्रांती तर तसे. मी आता जरा मॅच बघत बसणार आहे. "
" अहो आता विश्रांती कसली? पुढच्या तयारीला लागले पाहिजे. मगाशी कार्यक्रम झाल्यावर मी अन आशुने गुरुजींशी बोलणे केलय. त्यांना लग्नाच्या तिथी काढायला सांगितल्या होत्या. ते म्हणतात लग्नाचे मुहुर्त तुळशी विवाहानंतरचे आहेत. म्हणजे अजुन दोन ते तीन महिने आहेत. पण तरीही ते हा हा म्हणता भुर्रकन निघुन जातील. "
" हो ग उर्मी हे मात्र अगदी खरे आहे. अनुच्या साड्या त्यावरचे ब्लाउज, मॅचिंग ज्वेलरी, सोन्याचे दागिने, जावईबापुंचे कपडे बरीच खरेदी असणार आहे ग. "
" आशु तु आजिबात काळजी करु नकोस. मी आहे न तुझ्या मदतीला. आपण आता विहिणी होणार असलो तरी आधी मैत्रिणी आहोत ना? "
" हो ते आहेच ग. अनु साठी केलेले दागिने आहेतच. ते तिला आवडतात का पाहुन नवे करायचे की कसे ते ठरवायला हवेत. कारण मी केलेले जुन्या फ़ॅशनचे आहेत. "
" अग जुनेच असु दे म्हणजे काही कार्यक्रमांना जुने दागिने खुप छान वाटतात. मी तिला सगळे नव्या फ़ॅशनचे दागिने करणार आहे. "
"  आशु अजुन एक बोलायचेय मला तुझ्याशी. अन अगदी महत्वाचे. "
" काय ग??? " जराशी धास्तावलेली अनुची आई.
" अग लगेच धास्तावतेस काय अशी तु? "
" ................... "
" बर ऐक. आता राधा लग्न होऊन आमच्या घरी येणार. तर तिच्या बरोबर तु पण इथेच यावेस असे माझे मत आहे. "
" उर्मी..... काहीतरीच काय हे? मी आपली आमच्या घरीच राहीन. "
" हो???? अन इथे माझा अन राधाचा जीव शांत राहील का तुला तिथे एकट्याने ठेवुन? "
" अग पण लोक काय म्हणतील? अन इतर लोकांचे जाऊ दे, पण तुझे सासरचे अन माहेरचे इतर नातेवाईक काय म्हणतील? "
" हे बघ माझ्यासाठी तु पण तितकीच महत्वाची आहेस. मी काही तुला त्या घरी एकट्याने ठेवायची नाही. फ़ार तर लग्न झाल्यावर तुझ्याकडचे नातेवाईक असेपर्यंत तुला मुभा देते. पण सारे नातेवाईक आपापल्या घरी गेल्यावर तु इथेच यायचे आहेस. मला पण माझ्या प्रिय सखीचा सहवास लाभु दे न. अन ते घरही काही बंद नाही ठेवायचे. आपण सारेस महिन्यातुन एक दोन दिवस तिथे रहायला जाऊ. तेवढे राधालाही माहेरपण झाल्यासारखे वाटेल. "
" मी नाही म्हणल्यावर तु थोडीच ऐकणार आहेस? अजुनही तशीच हट्टी आहेस पहिल्यासारखी. " अन त्यांनी या प्रस्तावास होकार दिला.
अनु आणि हर्षु दोघेही त्याच्या रुममधे गेले होते. आज ऋचाशी दोघेही वेबकॅमवरुन बोलणार होते. लॅपी ओपन करुन ऋचा कॅमवर येइपर्यंत हर्षु राधाकडे एकटक पहात होता.
" काय रे काय एवढे पहात आहेस? "
" काही नाही हा चांदसा मुखडा आज अजुन जवळुन पाहतोय. अजुनही विश्वास बसत नाहीय की खरच आपण आज एका नात्यात बांधले गेलो आहोत. "
" हो ना रे.... सारे कसे स्वप्नवत वाटतेय. "
" ओय होय.... आता माझ्याशी बोला. " ऋचाचा आवाज कानी पडताच दोघेही मंद स्मीत करत एकदम लॅपी कडे पाहु लागले.
" ऋचाताई कशा आहात तुम्ही .... आज खुप मिस केले आम्ही सर्वांनी तुम्हाला. "
" हो ग वहिनी मी पण खुप मिस केले तुम्हा सर्वांना... स्पेशली दादाला. "
" ऋचाताई नात्याने वहिनी असले तरी मला तुम्ही राधाच म्हणा नं. "
" एका अटीवर म्हणेन. "
" ती कोणती अट? "
" तु पण मला ऋचा म्हण. "
" ओके ऋचा....आता कसे नणंदा भावजयापेक्षा मैत्रिणी, सख्या शोभतोय.  "
"  अरे मला काही बोलु देणार आहात का नाही? का माझा पत्ता कट आता? "
"  असे कसे दादा तुझ्यामुळेच तर मला एवढी गोड मैत्रिण मिळालीय. "
" ऋचा खरच ग आज तु हवी होतीस इथे. खुप खुप मिस करतोय तुला मी. "
" हो रे दादा, मी जरी इकडे असले न तरी मनाने तिकडेच होते रे. त्यातुन साखरपुडा अन लग्न यामधील अवधी कमी असता तर आम्ही आलोही असतो. पण ऋषी ला एवढी रजा नाही मिळणार नं अन मग त्याला एकट्याला ठेवुन आले की मग त्याचे हाल होतात रे जेवणाचे. "
" हो ग तायडु समजु शकतो मी. पण लग्नाच्यावेळी मात्र तु आधी यायला हवेस हा... "
" हो रे नक्की... बर दादा आणि राधा आता बास... खुप कामे पडलीत सकाळपासुन, कारण मी आपल्या घरातच वावरतेय मनाने."
" हो चल बाय...."
" बाय ऋचा.... "
" बाय दादा अन राधा... " अन त्याने लॅपी बंद केला.
" हर्षु आता आम्हाला निघायला हवे रे. "
" का ग कंटाळलीस इतक्यात? "
" हर्षु....... असे रे काय? आईला आज दिवसभर दगदग झाली ना? घरी जाऊन जरा विश्रांती घेइल न ती. "
" ते तर काय आत्ताही इथे घेउ शकतात. अन आज रात्रीचे जेवण करुनच जायचेय तुम्ही. मी येणार आहे सोडायला. "
"  बर बाबा... तु म्हणतोस तसे. पण चल ना बाहेर जाऊया. हे असे बरे नाही दिसणार रे. "
" काय बरे नाही दिसणार? "
" आपण असे तुझ्या रुममधे. "
" अग राधुले आपल्या घरचे एवढे कुणी जुन्या विचारांचे नाहीत. तु नको काळजी करुस. " असे म्हणत त्याने हलकेच तिला मिठीत घेउन तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.
" हर्षु....... प्लीज. "
" का ग? काय झाले? "
" काही नाही... चल न आपण बाहेर जाउया. "
" बर चल. "
" रागवलास? "
" नाही ग....तुझ्या मनाविरुद्ध मला काहिही नाही करायचेय. अन तुझ्यावर मी कसा रागवेन ग? तु तर माझा प्राण आहेस ग. "
"  हर्षु..... म्हणत ती आपणहुन त्याच्या मिठीत शिरली. काय नव्हते त्या स्पर्शात? भरपुर सारे प्रेम आणि खुप सारा विश्वास.

विरघळावे बाहुत तुझ्या
स्पर्शात चिंब न्हावे
प्रत्येक सीमा पार करुनी
मनसोक्त मी व्हावे.....


विसरुनी भान स्व:तचे
प्रेमात बुडुनी जावे
माझ्या मनाचे गीत
मग तुझ्याच ओठांनी गावे...

स्पर्श्याच्या हिंदोळ्यावरती
अंग अंग झुलावे
डोळ्यातील काजव्यानी
मग रोमा रोमात फुलावे....

प्रेमाच्या या वर्षावात
दोघांनी पुरते भिजावे...
मग तु माझ्यात आणि
मी फक्त तुझ्या आणि तुझ्यातच दिसावे !...

दोघेही बाहेर हॉलमधे आले अन ऋचाशी गप्पा मारल्याचे सांगितले. अन त्याचवेळी हर्षुने अनुच्या आईला सांगुन टाकले की आज रात्रीचे जेवण करुनच दोघींनी जायचेय. त्यावर अनुची आईने होकार दर्शवला.
मधले दिवस लग्नाच्या तयारीत भु्रकन उडुन गेले. दोघांच्या भेटीगाठी, फ़ोनवरच्या गप्पा चालुच होत्या. एकमेकांच्या बोलण्यातुन अन भेटीमधुन दोघे मनाने अजुनच जवळ आले. दोघांनाही केव्हा एकदा लग्नाचा दिवस उजाडतोय असे झालेले. ऋचाही आठ दिवस आधी आली होती. तिच्या चेष्टामस्करीने दोन्हीही घरे आनंदाने बहरत होती.अन बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला पण.
राधा अन हर्षित दोघेही पवित्र अशा लग्नबंधनात बांधले गेले. अनुराधा कुलकर्णीची राधिका हर्षित देशपांडे होऊन हर्षुच्या घरच्या उंबर्‍याचे माप ओलांडुन प्रवेशकर्ती झाली.







दोघेही सुखाने संसार करु लागले हे काही वेगळे सांगायला नकोच. आजकाल सोशल साईटवर खुप वाईट अनुभव येतात पण असेही गोड अनुभव येऊ शकतात हेच मला या कथेतुन सांगायचे आहे.